Shankar Sharma on Make in India: प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा हे सोशल मीडियाद्वारे अर्थशास्त्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत असतात. त्यांनी जीक्वांट आणि फर्स्ट ग्लोबल सारख्या संस्थांची स्थापना केलेली आहे. काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्यानंतर त्यांनी दिलेला सल्ला चांगलाच चर्चेत होता. आता त्यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाची परिस्थिती समोर आणली आहे. २०१४ साली मेक इन इंडिया उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी भारतात येऊन उत्पादन करावे, अशी त्यामागची संकल्पना होती. पण १० वर्षांनंतर भारत उत्पादनाचा हब बनला आहे का? असा प्रश्न शंकर शर्मा यांनी उपस्थित केला आहे.
शंकर शर्मा यांनी नुकताच मुंबईतीली एका वस्तीचा दौरा केला. वस्तीत फिरत असताना त्यांना एकेठिकाणी एक छोटे वर्कशॉप नजरेस पडले. जिमसाठी लागणारी उपकरणे वर्कशॉपमध्ये तयार करण्यात येत होती. त्या उपकरणांचा दर्जा आणि फिनिशिंग पाहून त्यांना आश्चर्य वाटले. एवढी चांगली उत्पादने खरंच भारतात तयार होत असतील तर आनंदाची बाब आहे, असा विचार करून शर्मा यांनी त्या वर्कशॉपच्या प्रमुखाशी संवाद साधला.
शंकर शर्मा यांनी एक्स पोस्टमध्ये काय लिहिले?
शंकर शर्मा यांनी वर्कशॉपच्या प्रमुखाशी संवाद साधताना म्हटले की, तुम्ही या वस्तू इथेच बनविल्या का? त्यावर समोरच्या व्यक्तीने सांगितले की, या वस्तू आम्ही चीनमधून आयात केल्या आहेत. इथे आणून फक्त ते जोडण्याचे काम केले जाते. चीनच्या वस्तूंचा दर्जा, फिनिशिंगला तोड नाही. त्यांच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही.
मेक इन इंडियाचं वास्तव
शंकर शर्मा यांनी या पोस्टच्या माध्यमातून भारतातील मेक इन इंडियाचं वास्तव्य मांडल्याचं बोललं जात आहे. मेक इन इंडियाबाबत जे दावे केले जात आहेत, ते सर्व वर्कशॉपमधील त्या व्यक्तीच्या विधानामुळे उघडे पडतात. शंकर शर्मा पुढे म्हणाले की, ही ताजी घटना आहे. बऱ्याच लोकांना वरवर सर्व काही ठिक चालल्याचं दिसतं. पण सत्य हेच आहे की, आपण आजही आयातीवर अवलंबून आहोत.
लोकांनी काय कमेंट केल्या?
शंकर शर्मा यांच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटले की, आपण चीनमध्ये तयार होणारे नेल क्लिपर, लगेज बॅग, बाथरूममध्ये लागणाऱ्या दैनंदिन वस्तू अद्याप बनवू शकलेलो नाहीत. वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तर दूरच राहिल्या. तर दुसऱ्या युझरने म्हटले की, जगाने चीनबद्दलचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे.
आज चीनला पर्याय शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. विशेषतः अमेरिका आता चीनवर अवलंबून राहण्याऐवजी उत्पादन वाढीसाठी इतर ठिकाणे शोधत आहेत. अमेरिकेने नुकतेच चीनवर १४५ टक्के आयातशुल्क लादले आहे. भारताला मात्र काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. भारतासाठी ही चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. मात्र शंकर शर्मा यांच्या पोस्टमधून भारत यासाठी तयार आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना काही युझर्स व्यक्त करत आहेत.