Why market is falling today: गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह दिसत असून त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमध्ये दिसत आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने गटांगळी खाल्लानंतर मंगळवारीही बाजाराची सुरुवात निराशाजनक झालेली दिसली. बीएसई सेन्सेक्स आज १,१०६ अंशांनी कोसळला. १.४३ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्सने ७६,२०५.५२ चा तळ गाठला. तर निफ्टी५० मध्ये ३४९ अंशानी घसरण पाहायला मिळाली. दुपारी १.३० च्या आसपास निफ्टी५० निर्देशांक २३,०३२ वर घसरला.
व्यापक बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे ३.५ टक्के आणि ३.९ टक्के इतकी घसरण झाली. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य आज ९.८७ लाख कोटींनी घटून ते ४०७.८५ लाख कोटींवर पोहोचले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. हे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्सच्या उतरत्या कळीला या क्षेत्राने २७० अंशाचा हातभार लावला.
शेअर बाजार आज का घसरला?
१) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्टिल आणि अल्युमिनियम धातूवरील आयात शुल्क कोणताही अपवाद किंवा सूट न देता २५ टक्क्यांनी वाढवले. नवे आयात शुल्क दर ४ मार्च पासून लागू केले जातील, असे व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि इतर देशातून आयात होणाऱ्या धातूवर हा कर लावला जाणार आहे.
२) अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (FED) चे अध्यक्ष जेरोम पॉवेल हे अमेरिकन संसदेत बँक, गृह आणि शहर व्यवहार समितीसमोर निवेदन करणार आहेत. आयात शुल्क आणि महागाईबाबत ते काय बोलतात, याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
३) एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, विदेशी वित्त संस्थांनी या वर्षात ९.९४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली आहे. त्याचाही फटका बाजाराला बसला आहे.