L&T chairman SN Subrahmanyan: बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन संचालक एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी काही दिवसांपूर्वी रविवारीही कर्मचाऱ्यांनी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. रविवारी पत्नीला किती वेळ एकटक पाहत राहणार, त्यापेक्षा कामावर या, असे ते म्हणाले होते. या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. काही उद्योगपतींनीही कामांच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा अशा आशयाच्या पोस्ट केल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुब्रह्मण्यन यांनी भारतीय कामगारांना बोल लावले आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे बांधकाम मूजर आता बाहेर जाऊन काम करण्यास तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लार्सन अँड टुब्रो ही भारतातील आघाडीची कंपनी असून अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन, तंत्रज्ञान आणि आर्थिस सेवा या क्षेत्रात अग्रेसर आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात कंपनीचा सर्वात मोठा वाटा आहे. विमानतळ, महामार्ग, पूल आणि ऊर्जा प्रकल्प उभारण्याची कामे लार्सन अँड टुब्रोतर्फे करण्यात आली आहेत.

कामगारांबाबत काय म्हणाले?

“आमची कंपनी अडीच लाख कर्मचारी आणि ४ लाख कामगारांना रोजगार देते. कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आमच्यासाठी त्रासदायक गोष्ट असली तरी कामगारांची उपलब्धता न होणे हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे”, अशी प्रतिक्रिया सुब्रह्मण्यन यांनी बिझनेस टुडेशी बोलताना दिली. ते म्हणाले, “कामगार रोजगाराच्या संधीसाठी स्थलांतर करण्यास तयार नाहीत. कदातिच त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था चांगली असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होत असेल. पण कामगार आता आपले शहर किंवा गाव सोडून जाण्यास तयार नसतात.”

सुब्रह्मण्यन यांनी पुढे म्हटले, “कामगारांची भरती आणि त्यांना सुविधा पुरविण्यासाठी एल अँड टीकडे स्वतःची एचआर टीम आहे. पण असे असतानाही कामगारांची उपलब्धता हल्ली होत नाही. बांधकाम मजुरांची भरती करत असताना अनेक अडचणी येत आहेत.”

सुब्रह्मण्यन यांच्या विधानामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे कामगार आळशी झाले आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

व्हाइट कॉलर मजुरांबाबत काय म्हणाले?

सुब्रह्मण्यन यांनी असेही म्हटले की, कामासाठी स्थलांतर करण्याची अनिच्छा ही आता केवळ ब्लू कॉलर (मजूर) कामगारांपुरती मर्यादीत नाही. तर व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांमध्येही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येत आहे. याचा दाखला देताना सुब्रह्मण्यन यांनी स्वतःच्या नोकरी काळातले अनुभव कथन केले. ते म्हणाले, मी जेव्हा एल अँड टीमध्ये अभियंता म्हणून रुजू झालो, तेव्हा मला माझ्या बॉसने सांगितले की, तू चेन्नईचा असशील तर तुला दिल्ली जाऊन काम केले पाहीजे. पण आज जर मी चेन्नईच्या व्यक्तीला दिल्लीला जायला सांगितले तर तो थेट नोकरी सोडतो. आजचे जग बदलले आहे, त्यानुसार आपल्याला आता धोरण बनवावे लागेल.