जानेवारी ते मार्च या काळात जेव्हा अदाणी समूहाच्या कंपन्यांचे नुकसान होत होते, तेव्हा देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी दररोज अदाणी एंटरप्रायझेसचे सुमारे ३९०० शेअर्स खरेदी करत होती. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, अदाणी समूह ज्या प्रकारे जवळजवळ ६० टक्क्यांनी कोसळला होता, विशेष म्हणजे त्याच काळात समूहाच्या प्रमुख कंपनीचे हजारो शेअर्स खरेदी करणे हे एलआयसीचे सर्वात मोठे धाडस मानले जात आहे. जो अहवाल समोर आला आहे तोसुद्धा धक्कादायक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५७,५०० शेअर्स खरेदी केले

हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने मार्च तिमाहीत अब्जाधीश गौतम अदाणी यांची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेसमधील हिस्सेदारी वाढवली आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या तिमाहीत अदाणी एंटरप्रायझेसचा शेअर्स फार वधारलेलाही नव्हता. एलआयसीने अदाणी कंपनीचे ३५७,५०० शेअर्स खरेदी केलेत.

मार्च तिमाहीत हिस्सा वाढून ४.२६ टक्के झाला

अदाणी एंटरप्रायझेसमधील PSU विमा कंपनीचा हिस्सा डिसेंबर तिमाहीत ४.२३ टक्क्यांवरून मार्च तिमाहीत ४.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. एलआयसीने या तिमाहीत अदाणी ट्रान्समिशन, अदाणी ग्रीन आणि अदाणी टोटल गॅसमध्येही हिस्सा वाढवला. दुसरीकडे विमा कंपनीकडे अदाणी पोर्ट्स, एसीसी आणि अंबुजा या समूहाच्या दोन सिमेंट कंपन्यांमध्येही हिस्सेदारी आहे.

जानेवारीअखेर ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती

जानेवारी २०२३ अखेरीस अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक ३०,१२७ कोटी रुपये होती. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदाणी समूहाला वाचवण्यासाठी एसबीआय आणि एलआयसी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर एलआयसीने आपल्या बचावात म्हटले होते की, ते दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करते आणि तपासाच्या आधारावर गुंतवणूक करते. एलआयसीने असेही म्हटले होते की, अदाणी समूहातील त्यांचे एकूण एक्सपोजर एकूण व्यवस्थापनातील संपत्तीच्या एक टक्काही नाही.

किरकोळ गुंतवणूकदार अदाणी शेअर्सकडे झुकले

दरम्यान, अदाणी एंटरप्रायझेसमध्ये २ लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या छोट्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या जवळपास ३ पटीने वाढून ७.२९ लाख झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा कंपनीचा हिस्सा आता ३.४१ टक्के आहे जो तिसऱ्या तिमाहीत १.८६ टक्के होता. म्युच्युअल फंडाने गेल्या डिसेंबर तिमाहीत हिस्सा १.१९ टक्क्यांवरून ०.८७ टक्क्यांपर्यंत कमी करून स्वतःला सुरक्षित ठेवले. MF गुंतवणूकदारांची संख्या देखील ३१ वरून २७ वर आली आहे.

अमेरिकन फर्मने १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी एंटरप्रायझेसला आपला एफपीओ रद्द करावा लागला. त्यानंतर कर्ज कमी करण्यासाठी अदाणी समूहाने US आधारित GQG भागीदारांसोबत १५,००० कोटी रुपयांचा करार केला होता. अदाणी एंटरप्रायझेस ही चार कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवर्तकांनी त्यांचे शेअर्स कमी केले आहेत. GQG ने ५,४६० कोटी रुपयांना अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी केले होते. त्या काळात अमेरिकन कंपनीने १,४१०.८६ रुपये प्रति शेअर या दराने करार केला होता.

हेही वाचाः कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून GPFचे व्याजदर निश्चित

शेअर्समधील तेजी थांबली

या करारानंतर अदाणीच्या शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला. अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स मंगळवारी १,८००.५५ रुपयांवर व्यवहार करत होते आणि ४,१८९.५५ रुपयांच्या त्यांच्या उच्चांकावरून ५७ टक्क्यांनी घसरले होते. GQG चे गुंतवणूकदार राजीव जैन यांनी अलीकडेच सांगितले की, अदाणी कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधीत मल्टिबॅगर परतावा देईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचाः गौतम अदाणींसाठी मोठी बातमी, देशातील ७० कंपन्यांना मागे टाकत ‘ही’ कंपनी ठरली नंबर वन

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic biggest achievement of the year buys 3900 shares of adani enterprises every day vrd
First published on: 11-04-2023 at 17:44 IST