Maha Kumbh 2024 Economic Benefits for Uttar Pradesh : जगातील सर्वांत मोठा मेळावा असलेल्या महाकुंभला आज (१३ जानेवारी), सोमवारपासून पहिल्या शाही स्नानाने सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा ४५ दिवस चालेल. दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यांत तब्बल ४० कोटी भाविक या मेळ्याला येतील, अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या सोहळ्याची तयारी केली आहे. श्रद्धा, व्यापार व आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगतीस चालना देत आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने महाकुंभसाठी ६,९९० कोटी रुपये खर्च करून ५४९ प्रकल्प सुरू केले आहेत. याअंतर्गत विकासापासून स्वच्छतेपर्यंतची अनेक कामं चालू आहेत. २०१९ मधील कुंभमेळ्याशी तुलना केल्यास त्यावेळी ३,७०० कोटी रुपये खर्च करून ७०० प्रकल्प हाती घेण्यात आले होते.
हे ही वाचा >> जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए
दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज
महाकुंभ मेळ्याच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या सोहळ्याद्वारे उत्तर प्रदेश सरकारला २५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल. महाकुंभ २०२५ च्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी, आर्थिक वाढीसाठी २ लाख कोटी रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या सोहळ्यासाठी ४० कोटी लोक येतील. या लोकांनी सरासरी ५,००० रुपये जरी खर्च केले तरी त्यातून दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल.
हे ही वाचा >> ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
केवळ श्रद्धा नव्हे तर कुंभ हा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव ठरला आहे. ४० दिवस चालणारा हा मेळा लाखो लोकांना रोजगाराची संधी देतो आणि व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करतो. महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. लाखो भाविक व हजारो व्यावसायिकांच्या सहभागामुळे महाकुंभ जागतिक स्तरावर महत्त्वाचा उत्सव ठरतो. श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापनाचा हा संगम भारताच्या आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करतो. महाकुंभ हा श्रद्धेइतकाच आर्थिकदृष्ट्याही भारताचा वारसा आहे. या ठिकाणी धार्मिकता आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. स्थानिकांपासून जागतिक ब्रँड्सपर्यंत, सर्वांसाठी संधीचा मेळ हा कुंभ आहे.