करोना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’चा ट्रेंड वाढला. जी कामं इंटरनेटवरून करणं शक्य आहे, त्या कामांना घरूनच करण्यास प्राधान्य देण्यात आलं. अनेक घरांमध्ये पती-पत्नी दोघेही घरातून काम करणारे आहेत. अशावेळी एकमेकांच्या कामातील बाबी दोघांच्याही कानावर पडत असतात. टेक्सासमध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथील टायलर लाउडन या व्यक्तीने त्याची पत्नी कार्यालयीन कॉलवर बोलत असताना तिचे बोलणे ऐकले आणि त्यानुसार शेअर बाजारात पैसे गुंतविले. या गुंतवणुकीतून त्याने थोडी-थोडकी नाही तर २ दशलक्ष डॉलरची (१४ कोटी रुपये) कमाई केली. मात्र त्यानंतर ही कमाई त्याच्या अंगलट आली आहे.
पत्नीचं फोनवरील संभाषण ऐकून केली गुंतवणूक
आपल्याकडे शेअर बाजारामधील चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) हे नियामक मंडळ काम करते. तसेच अमेरिकेत शेअर बाजारावर नियामक म्हणून काम करणाऱ्या ‘यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ने (SEC) हे प्रकरण उजेडात आणले आहे. गुरुवारी एसईसीने सांगितले की, टायलर लाउडन याने फेब्रुवारी २०२३ पूर्वी ट्रॅव्हलसेंटर्स ऑफ अमेरिका आयएनसी. या कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये बीपी पीएलसी या कंपनीने ट्रॅव्हलसेंटर्स ऑफ अमेरिका कंपनीला विकत घेतले. त्यानंतर ट्रॅव्हलसेंटर्सच्या शेअरचे भाव अचानक वधारले. ज्यातून टायलर लाउडनने १.७६ दशलक्ष मिलियन डॉलर्सची कमाई केली.
टायलर लाउडनची पत्नी बीपी पीएलसी या कंपनीत काम करत आहे. ट्रॅव्हलसेंटर्सच्या अधिग्रहनावर ती काम करत होती. ती घरी असताना याबद्दल तिच्या सहकाऱ्यांशी मीटिंगमध्ये बोलत असताना पतीने गुपचूप तिचे संभाषण ऐकले आणि त्यानुसार शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मात्र पत्नीला पतीच्या या कारस्थानाबाबत माहिती नव्हती.
पत्नीला सत्य समजल्यावर दिला घटस्फोट
एसईसीने दाखल केलेल्या खटल्यानुसार, टायलर लाउडनने तिच्या पत्नीचे संभाषण एकून योग्य वेळी बाजारात गुंतवणूक केली आणि प्रचंड नफा कमावला. ज्यावेळी पत्नीला ही बाब समजली, तेव्हा तिला धक्का बसला आणि तिने तडक पतीचे घर सोडले आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली.
पत्नीची नोकरी मात्र गेली
पत्नीच्या कंपनीला जेव्हा तिच्या नवऱ्याचा हा प्रताप कळला, तेव्हा त्यांनी तिला कोणतीही सबब न विचारता कामावरून काढून टाकले. तिनेच अधिग्रहन कराराची माहिती नवऱ्याला दिली असावी, असा आरोप तिच्यावर ठेवला आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, टायलर लाउडनने कमावलेला नफा त्याला परत द्यावा लागणार आहे, तसेच त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे.
बीपी पीएलसीने तब्बल १.३ अब्ज डॉलर्स खर्च करून ट्रॅव्हलसेंटर्स ऑफ अमेरिका आयएनसी. कंपनीला विकत घेतले होते. ज्यामुळे ब्रिटिश ऑईल प्रमुखांना यूएसच्या गॅस स्टेशनच्या साखळीत प्रवेश मिळाला आहे. ट्रॅव्हलसेंटर्स कंपनीचे अमेरिकेच्या ४४ राज्यामध्ये एकूण २८१ शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे.