मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यामागे मुंबई शेअर बाजाराचे मोठे योगदान राहिले आहे. १४७ वर्षांपूर्वी म्हणजेच ९ जुलै १८७५ रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. शेअर बाजारात प्रथम कोणती कंपनी सूचिबद्ध झाली हे शेअर बाजराची संबंध असलेल्या व्यक्तीला माहिती असायलाच हवे. डी.एस.प्रभुदास अँड कंपनी ही मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होणारी पहिली कंपनी आहे. पुढे या कंपनीचे डीएसपी असे नामकरण करण्यात आले. त्यांनतर पुढे डीएसपी मेरिल लिंच झाले. तर कधी डीएसपी ब्लॅकरॉक झाले. पुढे ब्लॅकरॉक हे नावदेखील गाळून पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात हेमेंद्र कोठारी नाशिकला आले. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी अनेक मोठ्या व्यक्ती भेटीची प्रतीक्षा करत असतात त्या व्यक्तीची सहज भेट होणे, याला ग्रेट भेट असेच म्हणावे लागेल. हेमेंद्र कोठारी यांना नाशिकवर विशेष प्रेम असून त्यांनी नाशिकमधील कोठारी कन्या विद्यालय या पेठे हायस्कुलच्या शाळेसाठी मदत केली आहे. मात्र त्यांना या विषयावर जास्त बोललेले आवडत नाही. शेअर बाजाराने मला भरपूर दिले आहे, मी फक्त त्यातून थोडेसे समाजाला परत केले आहे. कोठारी यांचे आजोबा मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक होते. दुसरे संस्थापक जमनादास मुरारजी, तिसरे चंपकलाल देविदास आणि चौथे ब्रिजमोहन लक्ष्मी नारायण आणि पाचवे फिरोजजी जी भाय अशा चार गुजराथी आणि एका पारशी व्यक्तीने मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली.

१९७५ ते २०२३ या ४८ वर्षांच्या कालखंडात बाजाराने अनेक चढ-उतार बघितले. वर्ष १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फेरा कायदा आणला. त्या आधी परदेशी कंपन्या भारतातील भांडवली बाजारात आपले समभाग सूचिबद्ध करण्यास देखील तयार नव्हते. कोका कोला आणि आयबीएम या दोन कंपन्यांनी भारतातून बाहेर पडायचे ठरवले. मात्र या काळात भारतीय भांडवली बाजारात अनेक परदेशी कंपन्यांनी त्यांचे समभाग सूचिबद्ध केले. त्यांनतर उद्योग मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी सिमेंटचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांना आमंत्रित केले आणि सिमेंट उद्योगासाठी फेरा कायदा आड येणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे अनेक कंपन्यांनी सिमेंट क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मोठ्या प्रमाणावर सिमेंट व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज् नावाची संस्था अस्तित्वात होती. या संस्थेने अनेक कंपन्यांवर अन्याय केला. मात्र त्यावेळी जे हुशार गुंतवणूकदार होते, त्यांनी या कंपन्यांच्या समभाग विक्रीला अर्ज करून मिळवलेले समभाग नंतर खुला बाजारात विकून भरपूर नफा मिळविला.

डीएसपीचे हेमेंद्र कोठारी यांनी योग्य वेळी भांडवली बाजारात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना मर्चंट बँकर म्हणून भरपूर पैसे कमवता आले. १९८६ मध्ये डीएसपी मेरिल लिंच आणि भारतीय युनिट ट्रस्ट या दोन संस्थांनी अनिवासी भारतीय परदेशी वित्त संस्था यांचा निधी भारतीय भांडवली बाजारामध्ये आणला. १९९२ मध्ये बाजारात हर्षद मेहता प्रकरण घडले. हेमेंद्र कोठारी या काळात मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष होते. बाजारात काही तरी चुकीचे घडले असून अर्थमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी तत्कालीन अर्थमंत्र्यांना पाठवले होते. मात्र त्याकाळात तेजीवाल्यांनी हेमेंद्र कोठारी हे मंदीवाले आहेत, म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांना पत्र पाठवले, असा प्रचार केला.

हेमेंद्र कोठारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी बाजारातील सगळ्या घटना आणि आठवणींना उजाळा दिला. भारतीय भांडवली बाजाराबरोबर जागतिक बाजारात देखील त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे. स्टॉक ब्रोकर, मर्चंट बँकर, ठेव योजना आणि आता डीएसपी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर सामान्यांसाठी देखील विविध आर्थिक सेवा देऊ केल्या आहेत. हेमेंद्र कोठारी यांच्या कुटुंबीयांना त्यांनी नोकरी करावी आणि भांडवली बाजारात येऊ नये असे वाटत होते. म्हणून काही दिवस त्यांनी मोरारजी मिल्समध्ये देखील नोकरी केली. मात्र शेअर बाजाराची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी बाजारात प्रवेश केला आणि अजूनही ते त्यात सक्रिय आहेत.

pramodpuranik5@gmail.com

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market people hemendra kothari stock market financial capital mumbai stock market contribution ysh