Share Market Update Today : भारतीय शेअर बाजारात लार्ज-कॅप शेअर्सची घसरण सुरू असतानाही २७ सप्टेंबर २०२४ रोजी सेन्सेक्सने ८५,९७८.८४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतरच्या चार महिन्यांतच बेंचमार्क निर्देशांक असलेला सेन्सेक्स मात्र, १०,००० अंकांनी किंवा ११.७९ टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. याच कालावधीत एनएसई निफ्टी निर्देशांकालाही मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये १२.३८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दरम्यानच्या काळात परदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने लार्ज-कॅप शेअर्सना याचा सर्वाधिक फटका बसला, परिणामी चार महिन्यांत एनएसई लार्ज-कॅप निर्देशांकात १३.२७ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयटी क्षेत्रावर परिणाम नाही

शेअर बाजारातील या पडझडीमुळे मोठ्या, मध्यम आणि लघु भांडवली कंपन्यांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या काळात एनएसई मिड-कॅप निर्देशांक १२.८५ टक्क्यांनी घसरला आहे, तर स्मॉल-कॅप निर्देशांक ९.८७ टक्क्यांनी घसरला आहे. बाजारात इतकी मोठी घसरण होऊनही आयटी शेअर्सवर याचा कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. मात्र, ऑटोमोबाईल व तेल आणि वायू सारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे.

शेअर बाजार घसरणीची कारणे

दरम्यान बाजारातील या पडझडीमागे बदलेली आर्थिक परिस्थिती, भारताची मंदावलेली जीडीपी वाढ यासरखी कारणे दिसत आहेत. या कारणांमुळे निर्देशक आणखी तळाशी जाण्याची चिन्हे असली तरी, शेअर बाजाराला या व्यतिरिक्त इतर अडचणींचाही सामना करावा लागणार आहे. त्यामध्ये अन्नधान्यांची महागाई, रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होणे आणि किरकोळ वस्तूंच्या किमतींमधील वाढ यांचा समावेश आहे. आता यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याज दर कपातीची शक्यताही कमी झाली आहे.

ट्रम्प फॅक्टर

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कारण गुंतवणूकदार डॉलरच्या मालमत्तेकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतासह अनेक उदयोन्मुख बाजारपेठेतील आपले समभाग विकले आहेत.

यावर बोलताना जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट, व्ही के विजयकुमार म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकन डॉलर भक्कम झाला आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतरही १० वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्न १०० बेसिस पॉइंट्सने वाढले. जेव्हा १० वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्न ४.७ टक्के मिळत असते, तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांना उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याचे कोणतेही कारण नाही, विशेषतः जेव्हा मूल्यांकन जास्त असते. यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली.”

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 percent stock market crash sensex nifty 50 bank nifty mid cap large cap small cap bse nse aam