लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा भारतीय जनता पक्षाने कमी जागा जिंकल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. त्याचा प्रतिकूल परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांवर दिसून आला. अदानी समूहातील दहाही सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.
समूहातील कंपन्यांत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारा हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपन्यांचे समभाग कोसळले होते. कंपन्यांच्या समभाग मूल्याने सोमवारी पुन्हा या अहवालाच्या आधीची पातळी गाठत दहा सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य १९.४२ लाख कोटी रुपयांवर गेले होते. मंगळवारच्या सत्रातील घसरणीने अदानी समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य १५.३५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच एका सत्रात ४.०७ लाख कोटी रुपयांचा तोटा समूहाला सोसावा लागला.
आणखी वाचा-एनडीएला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात पडझड, ७२ हजारांच्या पातळीवर बंद
अदानी पोर्ट्सचा समभाग २१.१५ टक्क्यांनी म्हणजेच ३३५ रुपयांनी घसरून १,२४८.९५ रुपयांवर बंद झाला. तर त्यापाठोपाठ समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १९.३१ टक्क्यांनी म्हणजेच तब्बल ७०८ रुपयांच्या घसरणीच्या २,९४१.२५ रुपयांवर स्थिरावला. अंबुजा सिमेंटचा समभाग १७.०२ टक्क्यांनी घसरून ५५६.६० रुपयांवर बंद झाला. दिवसभरात त्याने ५१८.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली आला होता. अदानी एनर्जी सोल्युशन्स २० टक्क्यांनी घसरून ९७७.६० रुपयांवर विसावला. याबरोबर अदानी टोटल गॅस १८.८२ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी १९.२३ टक्के, एनडीटीव्ही १८.९३ टक्के, एसीसी १४.४९ टक्के आणि अदानी विल्मर ९.९९ टक्क्यांनी घसरले.