नववर्षाच्या पहिल्या महिन्याच्या या चौथ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे बाजारातील प्रमुख घटकांवर लक्ष हवे. डिसेंबर तिमाहीसाठी आणखी काही प्रमुख कंपन्यांचे आर्थिक कामगिरीचे निकाल, कोणकोणत्या कंपन्यांकडून भागधारकांना बोनस, लाभांश व तत्सम धनलाभ या आठवड्यात होईल, हे जाणून घेऊ. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे पदग्रहण, देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी, बरोबरीने परकीय गुंतवणूकदार संस्थांनी धरलेला बाहेर रस्ता, रुपयाचे ढासळते आरोग्यमान, खनिज तेलाच्या जागतिक किमतींचा ताप अशा आधीपासून पाठलाग करीत असलेल्या समस्यांसंबंधी ताजे संकेत काय असतील, हेदेखील पाहू.
सेन्सेक्स-निफ्टीत टक्काभर घसरण
सरलेल्या (१३ ते १८ जानेवारी) या आठवड्याची अखेर शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग तीन दिवस सुरू राहिलेल्या तेजीला खंड पाडणाऱ्या घसरणीने केली. परिणामी दोन्ही निर्देशांकांनी सप्ताहभरात प्रत्येकी एक टक्क्यांचे नुकसान सोसले. आयटी कंपन्यांचे शेअर्स हे निर्देशांकांच्या नुकसानीचे मोठे कारण ठरले. प्रत्यक्षात निफ्टी आयटी / Nifty IT निर्देशांक ५.८ टक्क्यांनी गडगडला. या निर्देशांकांतील गत १० महिन्यांतील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली. या क्षेत्रातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या कंपन्या इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाले. त्यांची महसुली कामगिरी ही विश्लेषकांच्या अपेक्षेच्या विपरीत असल्याने सरलेल्या आठवड्यात दोन्ही समभांगात अनुक्रमे सुमारे ७.७ टक्के आणि १० टक्के अशी घसरण झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेले याच क्षेत्रातील विप्रोचे निकालही फारसे उत्साहवर्धक नव्हते.
परकीय गुंतवणूकदारांची अव्याहत विक्री तर, आठवड्याच्या अंतरावर असलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर सावध नजर ठेवून देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीलाही ओहोटी लागल्याने, शेअर बाजारावर एकंदर अस्थिरतेची छाया दिसून येत असून, ती चालू आठवड्यात आणखी गडद होण्याची शक्यता आहे. खालील पाच प्रमुख घडामोडी या दृष्टीने कळीच्या ठरतील.
१) तिमाही निकाल असलेल्या कंपन्या
या आठवड्यात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (DRL), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) , जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यासारख्या अनेक दिग्गज आणि निफ्टी निर्देशांकातील सामील कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. या निकालांतील कामगिरीनुरूप, या विशिष्ट शेअर्समध्ये आणि या कंपन्या ज्या उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात त्यातील कंपन्यांच्या शेअर्सच्या व्यवहारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पाच नवीन कंपन्यांचे ‘आयपीओ’ बाजाराला २२ जानेवारीपासून धडक देतील, तर सहा नवीन कंपन्यांचे शेअर्स हे ‘आयपीओ’पश्चात बाजारात सूचिबद्ध होतील.
धनलाभ देणारे शेअर्स – लाभांश (डिव्हिडंड) एंजलवन लि. प्रति शेअर ११ रुपये लाभांश (रेकॉर्ड तारीख २१ जाने.), भन्साळी इंजिनीयरिंग पॉलिमर्स लि. प्रति शेअर १ रुपये, हॅवेल्स इंडिया लि. प्रति शेअर ४ रुपये लाभांश (दोहोंची रेकॉर्ड तारीख २२ जाने, डीसीएस श्रीराम लि., मास्टेक लि. (प्रति शेअर ७ रुपये) आणि विधी स्पेशालिटी फूड इंन्ग्रेडिएंट्स लि., वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लि. (प्रति शेअर १ रुपये) यांचे लाभांश (रेकॉर्ड तारीख २४ जाने.)
बोनस – बी. एन. राठी सिक्युरिटीज लिमिटेडने एकास एक (१:१) या प्रमाणात बक्षीस शेअर (बोनस) जारी करण्याची घोषणा केली, ज्यासाठी शुक्रवार, २४ जानेवारी ही रेकॉर्ड तारीख आहे. शिवाय १० रुपये दर्शनी मूल्याचा शेअर ५ रुपये म्हणजेच एका शेअरचे दोन शेअर्समध्ये विभाजनही याच तारखेपासून लागू होईल.
आणखी वाचा-मार्केट वेध: शेअर बाजाराची सप्ताहअखेर घसरणीने; Sensex ४०० अंशांनी गडगडण्याची कारणे काय?
२) ट्रम्प यांचे पुनरागमन
जगभरातील गुंतवणूकदारांच्या नजरा अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात असलेल्या सोमवारच्या पदग्रहण सोहळ्यावर असतील. विशेषतः ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी तब्बल १०० महत्त्वाच्या आदेशांवर स्वाक्षरी करण्याचे पूर्वसंकेत दिले आहेत.
मार्टिन लूथर किंग ज्युनियर दिनानिमित्त सोमवारी अमेरिकी बाजारपेठा बंद राहतील, त्यामुळे मंगळवारपर्यंत अमेरिका आणि भारतीय बाजारावरही याचा कोणताही परिणाम पूर्णपणे जाणवणार नाही. तथापि आयात शुल्कात वाढीसंबंधित त्यांच्या हालचालींवर जगाचे विशेष लक्ष असेल. ट्रम्प यांच्या प्रस्तावित शुल्कवाढीमुळे व्यापार युद्धाच्या भडक्यासह, जागतिक महागाई पुन्हा डोके वर काढू शकते. या अपेक्षेने गत काही काळापासून अमेरिकी रोख्यांच्या परताव्यात निरंतर वाढ सुरु आहे आणि भारतीय चलन रुपयासह जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर बळकटी मिळवित चालला आहे.
३) दावोस आणि अन्य जागतिक घडामोडी
सोमवारपासून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) वार्षिक मेळाव्याला सुरुवात होत आहे. जगभरातील सरकारचे प्रतिनिधी, उद्योगधुरीण आणि अर्थतज्ज्ञ या निमित्ताने महामंथनात सहभागी होतील. यापूर्वी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या मंचाच्या सर्वेक्षणातून, २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सशस्त्र संघर्ष आणि त्या खालोखाल प्रतिकूल हवामान हे महत्त्वाचे धोके आहेत, असे दिसून आले आहे. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी जपानची मध्यवर्ती बँक असलेल्या – बँक ऑफ जपानची (BOJ) वर्षातील पहिली पतधोरण बैठक नियोजित आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील बेरोजगारीच्या दराची अनुक्रमे नोव्हेंबर महिन्यासाठी आणि ११ जानेवारीला समाप्त आठवड्याची आकडेवारीही जाहीर होईल.
४) भारताची उत्पादन ‘पीएमआय’
भारताच्या औद्योगिक क्षेत्राच्या सक्रियतेला दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय’ हा महत्त्वाचा निर्देशांकाची जानेवारी २०२५ मधील कामगिरी शुक्रवारी (२४ जानेवारी) जाहीर होईल. डिसेंबर २०२४ मध्ये हा निर्देशांक ५६.४ गुणांपर्यंत घसरला होता, जो नोव्हेंबरमध्ये ५६.५ गुणांवर नोंदला गेला होता. त्यामुळे जानेवारीचा अंदाज या गुणांपेक्षा अधिक आल्यास ते शेअर बाजारासाठी सुखकारक ठरेल.
आणखी वाचा-डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता; परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
५) तेलाच्या किमती, परकीयांची विक्री
भारताकडून आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती ज्या आधारे ठरतात, त्या ब्रेंट क्रूड (Brent crude) वायद्यांमध्ये सरलेल्या आठवड्यात १.३% वाढ झाली आहे. रशियाच्या तेल आणि ऊर्जा व्यापारावर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे संभाव्य जागतिक पुरवठा व्यत्ययाची भीती वाढली आहे आणि या चिंतेतून जानेवारी महिन्यात आतापर्यंत तेलाच्या किमती तब्बल १०% तापल्या आहेत. एकीकडे ढासळता रुपया आणि पिंपामागे ८० डॉलरपुढे भडकलेल्या तेलाच्या किमती या दोन्ही गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिकूल ठरल्या आहेत. तेल आयात खर्चात त्यामुळे दुहेरी भर पडत चालली आहे.
गेल्या आठवड्यातही परकीय गुंतवणूकदारांची (FII) शेअर बाजारात अथक विक्री सुरूच होती. २ जानेवारी वगळता या महिन्यातील सर्व दिवस एफआयआय विक्री करत आहेत. चालू महिन्यांत, १७ जानेवारीपर्यंत त्यांनी एकंदर ४५,४९८ कोटी रुपये मूल्याची शेअर्स विक्री केली आहे. जी बाब प्रति डॉलर ८७ च्या वेशीपर्यंत ढासळलेल्या रुपयाच्या मूल्यासाठी मारक ठरत आहे. परिणामी भारतातील परकीय चलन गंगाजळी ३ जानेवारीला संपलेल्या आठवड्यात ६४०.२८ अब्ज डॉलरवरून कमी होऊन ६३४.५९ अब्ज डॉलरपर्यंत खालावला आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी (२४ जानेवारी) १० जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यातील चलन गंगाजळीच्या आकडेवारीची प्रतीक्षा असेल.