कौस्तुभ जोशी
भारतीय अर्थव्यवस्था नक्की कोणत्या दिशेने प्रवास करते आहे हे ठरवण्याचे जे ढोबळ निर्देशांक आहेत, त्यापेक्षा एक वेगळा आकडेवारीचा खेळ आज आपण समजून घेऊया. भारतासारख्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढत असलेल्या देशात वाहन उद्योग हा महत्त्वाचा समजला जातो. वाहन उद्योगांमध्ये होणारी वाढ ही साहजिकच देशाच्या एकूण प्रगतीतील एका छोट्या भागाकडे बोट दर्शवते.
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात गाडी का विकत घेते ? याची प्रमुख कारणे आधी समजून घेऊया. गरज म्हणून, छंद म्हणून, हौस म्हणून, व्यावसायिक आणि व्यापारी गरजांसाठी किंवा उत्पन्न वाढले म्हणून एक सुखसोय या उद्देशाने गाडी विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसतो. उदारीकरणापूर्वीच्या काळात काही निवडक परदेशी कंपन्यांच्या पाठबळावर आपला भारतातील वाहन उद्योग तरलेला होता. प्रीमियर पद्मिनीची टॅक्सी, मारुती सुझुकीची मोटार, हिंदुस्थान मोटर्सची अॅम्बॅसिडर यांच्या मागून येऊन गेल्या वीस पंचवीस वर्षात अनेक परदेशी कंपन्यांनी आपले क्षेत्र विस्तारले आहे. ह्युंदाई, होंडा, टोयोटा यांसारख्या कंपन्या उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात भारतामध्ये दाखल झाल्या. महाकाय कारखान्यांच्या रूपात त्यांनी आपले वाहननिर्मिती प्रकल्प सुरू केले. जसजसा भारतातील मध्यमवर्ग उदयास येऊ लागला तसतसे वाहन उद्योगाला सुगीचे दिवस येऊ लागले. फक्त गरज आहे म्हणून गाडी घेण्यापेक्षा एक स्वप्नपूर्ती म्हणून गाडी घेण्याकडे भारतीय तरुणाईचा नेहमीच कल राहिलेला आहे.
सुरुवातीच्या काळात स्वस्त आणि मस्त अशा प्रकारची मारुती गाडी सर्वांच्या पसंतीला उतरली. नव्वदीनंतर मारुती सुझुकीने सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडतील अशी गाड्यांची मॉडेल बाजारात आणली. अल्टोपासून सुरू झालेली श्रेणी सर्वसामान्य भारतीयांना चांगलीच पसंत पडली. कमी सीसी असलेले वाहन अधिक किफायतशीर असते. म्हणून शहर गाव सर्वदूर मारुतीचाच बोलबाला सुरू झाला. ह्युंदाईने अधिक चांगल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपले बाजारातील स्थान बळकट करायला सुरुवात केली. एक काळ असा होता की, गाडी स्वस्त आहे का? हा प्रश्न पहिला आणि गाडीमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत? हा प्रश्न दुसरा ही स्थिती होती. मात्र गेल्या दहा वर्षात परिस्थिती संपूर्णपणे बदलायला सुरुवात झाली आहे. टाटा कंपनीने नॅनो ही गाडी बाजारात आणल्यावर गरीबाची गाडी म्हणून तिची हेटाळणी करण्यात आली. ती चालवण्याच्या दृष्टीने किती सुटसुटीत सोयीस्कर आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण नॅनो ज्या कंपनीने बाजारात आणली त्याच टाटा मोटर्सच्या अलीकडील चार वर्षात बाजारात आणलेल्या विविध श्रेणीतील वाहनांना ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. जॅग्वार आणि लँड रोव्हर विकत घेतल्यावर टाटा मोटर्सच्या वाहनांमध्ये देखील बदल झाले हे निश्चितच. ग्राहकांना फक्त छोट्या आकाराच्या गाड्या नको आहेत, थोडी महाग गाडी असली तरी चालेल पण गाडी आलिशान हवी हा मनोवृत्तीतील फरक वाहन कंपन्यांसाठी चिंता आणि संधी दोन्ही आहे. आपल्या ग्राहक वर्गाला जो उद्योग हलक्यात घेतो तो कधीही यशस्वी होत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील नियोजनकर्त्यांनी देखील आपल्या रणनीतीमध्ये बदल आणायला सुरुवात केली.
गाड्यांचे छोटी गाडी, मध्यम आकाराची गाडी आणि मोठी गाडी अशा तीन गटात वर्गीकरण करता येईल. हॅचबॅक, सेदान आणि एसयूव्ही या श्रेणीतील गाड्यांमध्ये एसयूव्ही गाड्या गेल्या पाच वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेल्या गाड्यांपैकी आहेत. वाहन उद्योगाला गेल्या दशकभरात चार प्रमुख अडचणींचा सामना करावा लागला. ग्राहकांच्या गरजेनुसार आपले उत्पादन बाजारात आणणे, स्पर्धात्मक कंपन्यांपेक्षा चांगला दर्जा राखून तितक्याच किंवा कमी किमतीत वाहने बाजारात उतरवणे, अर्धसंवाहकाच्या (सेमीकंडक्टर) अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनांची निर्मिती वेळेवर न झाल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवणे आणि ग्राहक आपल्याकडे राखून ठेवणे !
वापरलेल्या गाड्यांचे बाजारपेठेतील स्थान बळकट होत चालले आहे. एकदा गाडी विकत घेतली की, अनेक वर्ष वापरायची या मनोवृत्तीमध्ये बदल होताना दिसतो आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात सेकंड हॅन्ड गाड्यांचे खरेदी विक्रीचे तंत्र बदलले आहे आणि यामध्ये दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होताना दिसते.
जुनी वाहने भंगारात काढण्याची शासनाची धोरणे आता बदलत आहेत. अधिकाधिक पर्यावरण स्नेही आणि प्रदूषण कमी करणारी वाहने रस्त्यावर चालवायची हेच धोरण कायम राहिले तर ठरावीक काळानंतर वाहन बदलणे हाच पर्याय शिल्लक राहणार आहे आणि यामध्ये नवीन गाड्यांचा खप वाढणार हे निश्चितच.
करोना संकटामुळे वाहन उद्योगावर संक्रांत येईल अशी भाकिते ज्यांनी वर्तवली त्यांना आकडेवारी समजून घ्यायची गरज आहे. लवकरच भारतातील वाहन उद्योग करोनापूर्व किंवा त्यापेक्षा अधिक विक्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. वाहने विकत घेताना त्यातील किंमत हा मुद्दा दुय्यम आणि सुखसोयी हा मुद्दा प्रमुख झाला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे वाहनांमध्ये ऑटोमेशन आणणे शक्य झाले आहे. चालकाला सुसह्य आणि आरामदायी वाटणारी स्थिती निर्माण करणे हे पुढचे आव्हान झाले आहे आणि सर्व वाहन कंपन्या हे आव्हान यशस्वीरित्या पेलत आहेत. विद्युतशक्ती (इलेक्ट्रिक) आणि हायब्रीड गाड्या यांनी भारतीय बाजारपेठ हळूहळू व्यापायला सुरुवात केली आहे. विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचे भारत सरकारचे धोरण या उद्योगाच्या पथ्यावरच पडले आहे. सर्व आघाडीच्या कंपन्यांनी आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. अजून त्यासाठी लागणारी परिसंस्था भारतात सर्व राज्यांमध्ये कार्यरत नाही. प्रमुख महामार्ग सोडल्यास इलेक्ट्रिक वाहने वापरणे छोट्या अंतरासाठीच शक्य आहे. पण केंद्र सरकारच्या भरीव पाठिंब्यामुळे या उद्योगाला नवसंजीवनी मिळेल यात शंकाच नाही. इलेक्ट्रिक दुचाकी हा प्रकार तरुणाईमध्ये कमालीचा लोकप्रिय होत आहे आणि ही संधी साधून या क्षेत्रात कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
वाहनांमध्ये इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर यामुळे वाहन उद्योगाचे भविष्य बदलणार आहे. अगदी भारतामध्ये चालक विरहित गाडी येईल ही शक्यता नसली तरीही चालकाला गाडी चालवताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक फायदा मिळणे, यामुळे गाडी चालवणे अधिक सुखावह झाले आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा ऑटो गिअर म्हणजेच दरवेळेला गिअर न बदलता गाडी चालवणे हे तंत्रज्ञान बाजारात आले, त्या वेळेला भारतीयांनी त्याचा चटकन स्वीकार केला नव्हता. मात्र रोजचा वाहन प्रवास, वाहतूक कोंडी यावर उत्तम उपाय म्हणून ऑटो गिअर असलेल्या गाड्यांची विक्री वाढताना दिसते आहे. गेल्या वर्षभरात युटिलिटी व्हेईकल्स म्हणजेच मध्यम आणि मोठ्या आकाराच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते. महिंद्र अँड महिंद्र या कंपनीच्या पाच, मारुती सुझुकीच्या चार, टाटा मोटर्सच्या तीन, किया इंडिया या कंपनीच्या तीन, टोयोटा किर्लोस्करच्या दोन आणि ह्युंदाईच्या दोन अशा आघाडीच्या दहा मॉडेलची विक्री एकूण दहा लाखाच्या पार गेली आहे.
एक मोठा वाहन उद्योग फक्त त्या एका कंपनीपुरता मर्यादित नसतो. शब्दशः एका वाहनांमध्ये शेकडो सुटे भाग असतात. त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या असतात. जसे वाहन उद्योगाला मंदीचे ग्रहण लागते तसे या कंपन्यांचे व्यवसाय धोक्यात येतात. त्याचप्रमाणे जर वाहन उद्योग नवी भरारी घेत असेल तर या कंपन्यांना सुगीचे दिवस येतील. बाजारात अनेक कंपन्या वाहनाचे सुटे भाग, इंजिन, बॅटरी, ॲक्सेसरीज, टायर अशा उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. याचा गुंतवणूकदारांनी अभ्यास करायला हवा. प्रत्येक कंपनीच्या मागचा पाच वर्षाचा आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा. कोणत्या प्रकारची वाहने कंपनी बाजारात आणते आहे? कोणत्या श्रेणीच्या वाहनांमध्ये मागणी वाढलेली दिसते? यावरून कंपनीचे भवितव्य व कंपनीला होणारा नफा याचा अंदाज लावता येतो. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांच्या बरोबरच मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्याही वाहन उद्योगातील सुगीच्या दिवसांच्या लाभार्थी आहेत हे आपण विसरून चालणार नाही.
लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत
joshikd28@gmail.com