सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी निफ्टीने २२,१२४ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला. ही घोडदौड २६ ऑक्टोबर २०२३ चा १८,८३७ नीचांक मारल्यानंतर सुरू झाली होती. निफ्टी निर्देशांकावर अल्पावधीत जो काही ३,२८७ अंशांच्या तेजीचा इमला तयार झाला त्याला सरलेल्या सप्ताहातील बुधवार, गुरुवारच्या सत्रातील पडझडीने खिंडार पाडले. निफ्टी निर्देशांकावर ७५० अंशांची जी काही दातखिळी बसवणारी तीव्र घसरण झाली, त्यावरून निफ्टी निर्देशांकावर १८,८३७ पासून चालू झालेल्या तेजीला आता पूर्णविराम मिळणार की स्वल्पविराम, असा प्रश्न पुढे आला. हा स्वल्पविराम असेल तर त्याचे स्वरूप तरी कसे? हलकी फुलकी घसरण होऊन पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होणार का? अशा सर्वांना पडलेल्या प्रश्नाचेच विस्तृत उत्तर जाणून घेण्याअगोदर निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.
शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ७१,६८३.२३ / निफ्टी: २१,६२२.४०
या स्तंभातील ८ जानेवारीच्या लेखातील वाक्य होते… “निफ्टी निर्देशांकाचा २१,५०० ते २१,८०० चा परीघ (बॅण्ड) डोळ्यासमोर ठेवून, निफ्टीच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन करूया. आता चालू असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीत २१,५०० ते २१,८०० हा स्तर ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ (टर्निंग पॉइंट) असून या स्तरावर निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल अवलंबून असेल. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २१,५०० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे २२,००० असेल.” या विधानानुसार, सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी २२,१२४ चा उच्चांक मारत अपेक्षित वरचे लक्ष्य साध्य झाले. तथापि, बुधवार, गुरुवारच्या सत्रात ७५० अंशांची दाहक घसरण होत, निफ्टी निर्देशांकाने गुरुवारच्या सत्रात २१,२८६ चा नीचांक नोंदवला आणि २१,५०० च्या समीप तो स्थिरावला. अशा रीतीने निफ्टी निर्देशांकाने २१,५०० ते २१,८०० हा ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ असल्याचे आपल्या वाटचालीतून पुन्हा अधोरेखित केले.
आता चालू असलेल्या सुधारणेत पुन्हा निफ्टी निर्देशांकावर २१,८०० चा स्तर भरभक्कम अडथळा असून, निर्देशांक सातत्याने दहा दिवस २१,८०० च्या स्तरावर टिकल्यास त्याचे वरचे लक्ष्य हे २२,१०० ते २२,४०० असे असेल.
आता चालू असलेल्या सुधारणेत निफ्टी निर्देशांकाला २१,८००चा स्तर भरभक्कम अडथळा ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २१,३०० ते २१,००० आणि द्वितीय खालचे लक्ष्य हे २०,८०० ते २०,५०० असेल.
‘शिंपल्यातील मोती’
एसबीएफसी फायनान्स लिमिटेड
(शुक्रवार, १९ जानेवारीचा भाव ८५.७० रु.)
लघुउद्योजकांच्या प्रथम पिढीतील, उद्यमशील व्यक्तींना नवीन उद्योग उभारण्यास ऋण देणे. यासाठी ‘फिजिटल’ व्यवस्था निर्माण करणे. यात फिजिटल शब्दाचा अर्थ कालसुसंगत अशी ‘डिजिटल व वैयक्तिक म्हणजे ‘फिजिकल’ असे दोन शब्द एकत्र करून ‘ऋण देता देता ऋणानुबंधाच्या गाठी विकसित करणारी’ स्मॉल बँक फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड (एसबीएफसी) हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.
एसबीएफसी ही कर्जपुरवठादार कंपनी, असीम ध्रुव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभरातील १४० शहरात १७१ शाखांमधून कार्यरत असून, ३,२७८ कार्यक्षम सहकाऱ्यांसोबत तिने ५,८०३ कोटींचे कर्ज वाटप, ऋण व्यवस्थापनाचा पल्ला गाठलेला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘एसबीएफसी’ या कंपनीने प्रारंभिक भागभांडवल विक्री (आयपीओ) ३ ते ७ ऑगस्ट २३ दरम्यान होऊन १६ ऑगस्टला हा समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. कंपनी अगदी नवीन, अवघी पाच महिने जुनी असल्यामुळे आर्थिक आघाडीवर, आलेखावर मर्यादित माहिती उपलब्ध असल्याने आपण एप्रिल ते जून, आणि जूलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील दोन तिमाहीचा तुलनात्मक आढावा घेता विक्री २२९.५९ कोटींवरून २४६.३१ कोटी, करपूर्व नफा ६२.७९ कोटींवरून ७०.६३ कोटी, तर निव्वळ नफा ४६.९७ कोटींवरून ५२.६१ कोटी झाला आहे. एसबीएफसी या समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती १५ रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की ८० ते ९५ रुपयांचा परीघ. भविष्यातील घसरणीत हा समभाग ५५ ते ८० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात खरेदी करावा. एसबीएफसी हा समभाग भांडवली बाजारात ९२ रुपयांच्या वर सातत्याने टिकल्यास, समभागात शाश्वत तेजी सुरू होऊन, अल्पमुदतीच वरचे लक्ष्य हे अनुक्रमे ११० तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य १५० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ५० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१) झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २२ जानेवारी
१९ जानेवारीचा बंद भाव- ५५६.६० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ५४५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५९५ रुपये, द्वितीय लक्ष्य ६४० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ५४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५०० रुपयांपर्यंत घसरण.
२) लेटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २९ जानेवारी
१९ जानेवारीचा बंद भाव – ४७३.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ४५५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५२५ रुपये.
ब) निराशादायक निकाल : ४५५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४३० रुपयांपर्यंत घसरण
३) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ३० जानेवारी
१९ जानेवारीचा बंद भाव – १,५५० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,४८०रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,४८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६४० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७३० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,४८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४३० रुपयांपर्यंत घसरण.
४) नोसिल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, ७ फेब्रुवारी
१९ जानेवारीचा बंद भाव- २७२.२० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २५५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २९५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३१५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: २५५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २३० रुपयांपर्यंत घसरण
५) टाटा पॉवर लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, ९ फेब्रुवारी
१९ जानेवारीचा बंद भाव- ३४८.६५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३३५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३३५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३६०रुपये, द्वितीय लक्ष्य ३८०रुपये.
ब) निराशादायक निकाल: ३३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३१५ रुपयांपर्यंत घसरण
(वरील समभाग हे ‘शिंपल्यातील मोती’ सदरात या आधी आलेले आहेत. निकालपूर्व विश्लेषणांद्वारे गुंतवणूकदारांना सजग, अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न.)
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.