रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ६.२५ टक्क्यांच्या कळसापर्यंत नेला जाईल, या सार्वत्रिक अपेक्षेला अनुसरून सरलेल्या आठवड्यात झालेल्या द्विमासिक आढाव्याच्या बैठकीत त्यात ३५ आधार बिंदूंची वाढ केली. देशांतर्गत अर्थव्यवस्थेबाबत उत्साहदायी संकेत देताना, महागाई दर अर्थात चलनवाढ २०२३-२४ आर्थिक वर्षारंभापासून ४ टक्क्यांच्या समाधानकारक टप्प्यामध्ये परतण्याचा तिचा अंदाज आहे. जागतिक अनिश्चिततेचा पदर पाहता, पुढे जाऊन धोरण अधिक कठोर करण्याला म्हणजे रेपो दरात आणखी वाढ करण्याला जागा आहे, या स्वाभाविक संकेताकडेही अर्थात दुर्लक्ष करता येणार नाही. सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवारी जाहीर होणारी नोव्हेंबरची किरकोळ महागाई दराची तसेच ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादन दराची आकडेवारी आर्थिक आघाडीवरील आपल्या चिंता खरेच कमी झाल्या काय हे स्पष्ट करतील.
बाह्य जगतातील घडामोडींच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आठवडा आपल्यापुढे आहे. अमेरिकी धोरणकर्त्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनलेली नोव्हेंबरमधील तेथील चलनवाढीची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होईल. शिवाय त्यानंतरच्याच दिवसात अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह, युरोपीय मध्यवर्ती बँक- ईसी आणि बँक ऑफ इंग्लंडकडून व्याजदरासंबंधी निर्णयही येऊ घातले आहेत.
शिवाय प्राथमिक बाजारात या आठवड्यात मोठ्या हालचाली दिसतील. वाइननिर्माती ख्यातनाम कंपनी सुला विनेयार्ड्स त्याचप्रमाणे लँडमार्क कार्स आणि अँबान्स होल्डिग्ज या तीन कंपन्या एकत्रितपणे १,८५९ कोटी रुपये उभारण्यासाठी त्यांच्या समभागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री (आयपीओ) खुली करणार आहेत. वाइन उत्पादक सुला विनेयार्ड्स आणि अँबान्स होल्डिंग्ज यांची प्रारंभिक समभाग विक्री सोमवार, १२ डिसेंबरपासून बोलीसाठी खुली होईल, तर वाहन विक्रेता साखळी असलेल्या लँडमार्क कार्सची विक्री मंगळवार, १३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे पेटीएमची प्रवर्तक वन ९७ कम्युनिकेशन्स समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) विचारात घेण्याचे संकेत दिले आहेत, मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय ठरते, हे गुंतवणूकदारांसाठी औत्सुक्याचे असेल.
चालू सप्ताहातील घडामोडी –
सोमवार, १२ डिसेंबर २०२२
० भारताचा औद्योगिक उत्पादन दर : ऑक्टोबर महिन्याचा देशाच्या उद्योग क्षेत्राचे आरोग्यमान दर्शविणाऱ्या औद्योगिक उत्पादन दराची आकडेवारी जाहीर केली जाईल.
० भारताचा किरकोळ महागाई दर : मागील महिन्यात चढ दिसलेला ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारीत महागाई दराच्या आकडेवारीत नोव्हेंबरमध्ये अपेक्षेप्रमाणे उतार दिसेल काय याची तड लागेल.
० सुला विनेयार्डस आणि अँबान्स होल्डिंग्ज या कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सुरुवात
मंगळवार, १३ डिसेंबर २०२२
० अमेरिकेतील चलनवाढ : चार दशकांच्या उच्चांकाला पोहोचलेली चलनवाढीच्या दरात नोव्हेंबरमध्ये तरी दिलासादायी उतरंड दिसून येईल काय हे त्या दिवशी होणाऱ्या घोषणेतून दिसेल.
० पेटीएमची समभाग पुनर्खरेदी : पेटीएमची प्रवर्तक वन ९७ कम्युनिकेशन्स समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) संकेतावर संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल काय, यावर गुंतवणूकदारांची नजर असेल.
० वाहन विक्रेता साखळी असलेल्या लँडमार्क कार्सची प्रारंभिक समभाग विक्रीला सुरुवात होईल.
बुधवार, १४ डिसेंबर २०२२
० ‘फेड’चे व्याजदर धोरण : बुधवारी रात्र उशीरा अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह अर्थात फेड तिचा धोरणातील पवित्रा स्पष्ट करेल. फेडकडून या बैठकीतही अर्धा टक्के वाढ केली जाण्याची अपेक्षा आहे.
० ब्रिटनच्या किरकोळ महागाई दराची आकडेवारीही याच दिवशी येईल.
गुरुवार, १५ डिसेंबर २०२२
० भारताच्या आयात निर्यातीचा तोल अर्थात तुटीची व्याप्ती ऑक्टोबरअखेर आणखी कोणत्या विक्रमी पातळीवर पोहचली हे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होईल.
० युरोपीय क्षेत्राची मध्यवर्ती बँक – ‘ईसीबी’कडून व्याजदरासंबंधी निर्णय जाहीर केला जाईल.
शुक्रवार, १६ डिसेंबर २०२२
० भारताच्या विदेशी चलन गंगाजळीचे २ डिसेंबरला संपलेल्या पंधरवड्यातील प्रमाण किती हे रिझर्व्ह बँक जाहीर करेल.
० तर २ डिसेंबरअखेर देशातील सर्व वाणिज्य बँकांकडील ठेवींची स्थितीची आकडेवारीही जाहीर केली जाईल.