प्रतिभावान कवयित्री शांताताई शेळके यांचं एक सुंदर वाक्य आहे…‘डोक्यात असतं ते काव्य / कविता, कागदावर उतरते ती कलाकुसर.’ काव्य हे मुक्त छंदात विहार करणार, समाजाची बंधनं झुगारून, नवरसात न्हाऊन कवीच्या प्रतिभेचा उत्कट आविष्कार असतो. हेच काव्य संगीतकाराकडे जातं तेव्हा ते ‘मीटर’मध्ये बसवून, काव्यातील शब्दांच्या जागांची अदलाबदल, प्रसंगानुरूप नवीन शब्द रचना केली जाते. आकर्षक चालीत बांधून काव्याची तयार होणारी ती कलाकुसर रसिकांच्या मनावर अधिराज्य करेल यासाठी संगीतकाराची धडपड सुरू असते.
असेच काहीसे भांडवली बाजारांच्या विश्लेशकांच्या बाबतीत होत असते. त्यांच्या डोक्यात निफ्टीच्या तेजी-मंदीच्या चालीचे, व्यक्तिगत समभागांच्या चालीचे आडाखे बांधलेले असतात. या तेजीच्या काव्याला करावी लागणारी कलाकुसर म्हणजे, ‘इस्रायल-हमास ठिणगी’ अमेरिकेत सरकारी कर्जरोख्यांचा (बाॅण्डचा) व्याजदर पाच टक्क्यांवर झेपावणे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य नोकरकपात अशी तेजीसाठी करावी लागणारी तडजोड / प्रतिकूल परिस्थिती होय. ही परिस्थिती निर्माण झाल्याने ‘तेजीचा घोडा एक घर मागे घ्या’ सुचवत, डोक्यातील तेजीच्या मुक्त काव्याला बंधन घालत, या प्रतिकूल परीस्थितीत गुंतवणूकदारांचे मुद्दल कसे सुरक्षित राहील याचा विचार करणे आणि ‘आता थोडे सबुरीने घ्या पण तेजीच्या चालीवर श्रद्धा ठेवा’ ही आस्था या तेजीच्या काव्यातील कलाकुसरीमागचा अर्थ आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स:-६४,९०४.६८
निफ्टी:- १९,४२५.३५
गेल्या लेखातील वाक्य होते – निफ्टी निर्देशांकावर १९,७५० ते १९,९५० या २०० अंशांच्या परिघाला (बॅण्डला) भविष्यात ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असून यावर भविष्यकालीन तेजी-मंदीचे आडाखे अवलंबून आहेत.
निफ्टी निर्देशांक १९,९५० चा स्तर पार करण्यास आणि १९,७५० चा स्तर राखण्यास देखील वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १९,२५० ते १९,००० असेल जे २६ ऑक्टोबरला १८,८३७ चा नीचांक मारत त्याने साध्य केले. आज आपण असाच निफ्टी निर्देशांकावर, भविष्यकालीन तेजी-मंदीचे आडाखे अवलंबून असणारा परीघ विकसित करूया.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १९,४५० ते १९,६५० या २०० अंशांच्या परिघाला (बॅण्डला) ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असून निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,६५० च्या स्तरावर पंधरा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे १९,९५० ते २०,२५० असेल. आता चालू असलेली तेजी ही ‘शाश्वत तेजी की तेजीची झुळूक’ हे ओळखण्यासाठी डिसेंबर मध्यापर्यंत स्पष्ट होईल. यात पाच राज्यातील निवडणुकांचे प्रत्यक्ष निकालांचे चांगले-वाईट पडसाद लक्षात घेता, निफ्टी निर्देशांकाने १९,१५० स्तर राखल्यास, हा निर्देशांक मंदीच्या गर्तेतेतून बाहेर पडल्याचा तो संकेत ठरेल आणि त्याचे वरचे लक्ष्य हे २२,४०० असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. भविष्यात निफ्टी निर्देशांक १९,६५० चा स्तर पार करण्यास आणि १९,१५० चा स्तर राखण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, या निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे १८,८०० तर, द्वितीय लक्ष्य १८,५०० ते १८,२०० असेल.
शिंपल्यातील मोती
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड
(शुक्रवार, १० नोव्हेंबरचा भाव – ३४.९० रु.)
देशाच्या प्रगतीचे मोजमाप हे वाहतुकीच्या रस्त्यांच्या जाळ्यावरून करता येते. शरीरात रक्त व रक्ताभिसरणाला जे स्थान असते तेच स्थान अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्गांना असते. ज्या योगे कच्च्या व तयार मालाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करता येते. अशा क्षेत्रात कार्यरत असलेली ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेड’ ही कंपनी. तिचा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.
आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री ८१३.३३ कोटींवरून, १,११३.८७ कोटी रुपये, करपूर्व नफा १११.४८ कोटींवरून १७१.७१ कोटी रुपये तर निव्वळ नफा १०२.१६ कोटींवरून १२९.७४ कोटी रुपयांवर झेपावला.
‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर अँण्ड डेव्हलपर्स लिमिटेड’ या समभागाचे आलेख वाचन करता, समभागाने आपल्या भोवती ३० ते ३७ रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केला आहे. भविष्यात समभाग ३७ रुपयांवर सातत्याने १५ दिवस टिकल्यास अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य अनुक्रमे ४२ ते ४५ रुपये असेल. तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य ७० रुपये असेल. सध्या बाजारातील अनिश्चितेत समभाग जेव्हा २८ ते ३२ रुपयांच्या दरम्यान येईल तेव्हा हा समभाग खरेदी करावा. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला २२ रुपयांचा ‘स्टाॅप लाॅस’ ठेवावा.
महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१) ग्रासीम इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, १३ नोव्हेंबर
१० नोव्हेंबरचा बंद भाव- १,९४३ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,९०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८५० रुपयांपर्यंत घसरण.
२) डीसीएम श्रीराम लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, १४ नोव्हेंबर
१० नोव्हेंबरचा बंद भाव- ८८६.३०रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,००० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८३० रुपयांपर्यंत घसरण.
३) कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,१४ नोव्हेंबर
१० नोव्हेंबरचा बंद भाव- ३३८.५०रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३२५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३२५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३५० रुपये,द्वितीय लक्ष्य ३७५रुपये.
ब) निराशादायक निकाल :३२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३०० रुपयांपर्यंत घसरण.
४) केएनआर कस्ट्रक्शन लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,१४ नोव्हेंबर
१० नोव्हेंबरचा बंद भाव- २६६ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर-२५५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २५५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य २८५ रुपये,द्वितीय लक्ष्य ३०५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: २५५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २३० रुपयांपर्यंत घसरण.
५) एनएमडीसी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार,१४ नोव्हेंबर
१० नोव्हेंबरचा बंद भाव- १६८.७०रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-१६०रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७५ रुपये, द्वितीय लक्ष्य १९५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: १६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १३५ रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे