शेअर बाजारात विविध क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सूचिबद्ध केले जातात. भारतात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारात (बीएसई) बहुतांश सर्व कंपन्यांचे समभाग सूचिबद्ध आहेत. एनएसई आणि बीएसई या दोन्ही बाजार मंचाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग खरेदी-विक्री करता येतात, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र ज्या बाजार मंचावर या समभागांची खरेदी विक्री होते अशा कंपन्यांची नोंदणी असावी का? आणि त्यांच्या समभागांची खरेदी विक्री व्हावी का? यावरसुद्धा खूप विचार मंथन घडलेले आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांचे मत बाजार मंचाच्या समभागांची खरेदी-विक्री होऊ नये असे होते. मात्र मुंबई शेअर बाजाराने तिचे रुपांतर कंपनीमध्ये करून राष्ट्रीय शेअर बाजारात समभाग सूचिबद्ध केले. म्हणजेच आता गुंतवणूकदारांना बीएसईचे समभागदेखील विकत घेता येतात. तसेच भविष्यात राष्ट्रीय शेअर बाजाराचे समभाग सूचिबद्ध होतील तेव्हा त्यावेळी त्यांचे समभाग मुंबई शेअर बाजार मंचावर खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होतील. नॅसडॅक या अमेरिकी शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांची माहिती उपलब्ध आहे, परंतु ज्या बाजारात तंत्रज्ञानातल्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांची नोंदणी झाली आहे, तो शेअर बाजारच तंत्रज्ञानात मागे पडला होता. तंत्रज्ञानापेक्षा माणूस मोलाचा असतो आणि म्हणून रॉबर्ट ग्रीफेल्ड यांनी काय केले याची माहिती असायला हवी. हा नॅसडॅकचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होता आणि त्यानंतर अध्यक्ष झाला.

हेही वाचा – BSE-NSE ने दिली आनंदाची बातमी; अदाणींच्या ‘या’ ३ कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना आता होणार फायदा

डॉट कॉमचा बुडबुडा फुटलेला होता. नॅसडॅक शेअर बाजार अनेक समस्यांनी ग्रासला गेलेला होता. अशा वेळेस २००३ ला रॉबर्ट ग्रीफेल्डची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. साधारणपणे अशा जागा शेअर बाजाराशी संबंधित माणसे हेरून घेतली जातात. मात्र हा वॅाल स्ट्रीटशी संबंधित नव्हता. या माणसाने सगळ्या अडचणींवर मात करून नॅसडॅकचे बाजार मूल्यांकन २००० टक्क्यांनी वाढविले.अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, स्टारबक, अ‍ॅमेझॅान या कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध केले. सहा उपखंडात नॅसडॅक एक प्रमुख शेअर बाजार म्हणून उदयास आला. ५२ वर्षांपूर्वी म्हणजेच ८ फेब्रुवारी १९७१ या दिवशी हा बाजार स्थापन झाला. ३५५४ कंपन्या या बाजारात सूचिबद्ध असून जानेवारी २०२३ मध्ये नॅसडॅकचे बाजार मूल्यांकन १८ लाख कोटी डॅालर आहे. ही आकडेवारी आज वाचायला खूप चांगली वाटते, मात्र २००३ ला नॅसडॅकचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. बाजाराशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला आमच्या डोक्यावर आणून बसवले याचा निषेध म्हणून काही अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या बाजाराला गळती नेमकी कोठे आहे याचा शोध घेणे आवश्यक होते. आर्थिक शिस्त, बाजाराचे उत्पन्न आणि बाजाराचा खर्च याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक होते १) नोंदणी फी २) माहिती विक्री ३) इंडेक्स प्रॉडक्ट वापराचा मोबदला मिळवणे. नॅसडॅक १०० इंडेक्स, ईटीएफ या सर्व प्रकारात प्रचंड स्पर्धा होती. स्पर्धा कोणाबरोबर होती, तर फक्त न्यूयॉर्क शेअर बाजारासोबत. हा या क्षेत्रातील जुना आणि मोठा स्पर्धक होता. इतर देशातील शेअर बाजारांसोबतदेखील स्पर्धा होती.

हेही वाचा – हळद रंग लायेगी: जोखीम व्यवस्थापनाची सुवर्णसंधी

१९९७ ला अ‍ॅमेझॅान नॅसडॅकवर आली. त्यानंतर २००४ ला गूगल भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. या काळात न्यूयॉर्क शेअर बाजारात असलेल्या जनरल इलेक्ट्रिक, एक्सॉन, वॉलमार्ट मागे पडण्यास सुरुवात झाली होती. नॅसडॅकवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्यांकन वाढू लागले होते. फेसबुक भांडवली बाजारात सूचिबद्ध होताक्षणीच खरेदी-विक्रीच्या एकाच वेळेस एवढ्या मोठ्या ऑर्डर्स आल्या की तंत्रज्ञानाने त्यापुढे हात टेकले. शेअर बाजार चालवणाऱ्या या कंपन्या आणि त्या कंपन्यांची खरेदी-विक्री हा राष्ट्रीय अस्मितेचादेखील प्रश्न होऊ शकतो. न्यूयॉर्क शेअर बाजार हा जर्मन शेअर बाजार गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे लक्षात येताच रॉबर्ट ग्रीफेल्डने नॅसडॅकने न्यूयॉर्क शेअर बाजार खरेदी करण्याचा प्रयत्न करावा, असा संचालक मंडळासमोर प्रस्ताव ठेवला. लंडन शेअर बाजाराचे महत्त्व कमी-कमी होऊ लागले होते, म्हणून लंडन शेअर बाजाराने नॅसडॅकबरोबर मैत्री करण्याचा हात पुढे केला. परंतु हा मैत्रीचा हात नव्हता तर नॅसडॅक ताब्यात घेण्याची चाल होती. बाजार चालवणाऱ्या व्यक्तीला राजकारण्यांशी फटकून वागता येत नाही कारण दोघांनाही एकमेकांची गरज असते. शेवटी कुठे थांबायचे याचा ग्रीफेल्डने निर्णय घेतला आणि अखेर २०१७ मध्ये निवृत्त झाला. त्यानंतर तो वर्च्यू फायनान्शियलचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. शेवटी तंत्रज्ञान श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ? पण अखेर नॅसडॅकला वाचवणारा माणूस श्रेष्ठ ठरला.

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

Story img Loader