मुंबई: अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांची एकात्मिक विकसक असलेल्या ॲक्मे सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून २,९०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणाऱ्या या भागविक्रीत गुंतवणूकदारांना प्रत्येकी २७५ रुपये ते २८९ रुपयांदरम्यान बोली लावता येईल.
गुरुग्राम येथे मुख्यालय असलेल्या जून २०१५ स्थापित कंपनी सौर, पवन आणि संकरित ऊर्जा प्रकल्पांचा विकास, बांधकाम, मालकी, परिचालन आणि देखरेख अशी सर्व कामे हाती घेते. सध्या १,३४० मेगावॉट स्थापित क्षमतेचे सौर विजेचे प्रकल्प कंपनीने पू्र्ण करून कार्यान्वित केले असून, आणखी १,६५० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प बांधकामाधीन आहेत. सौर विजेच्या बाजारपेठेत कंपनीची ॲक्मे सोलरची ८ टक्के हिस्सेदारी असून, ती या क्षेत्रातील सर्वात नफाक्षम कंपनी आहे. पुढील दोन वर्षांत कंपनीची स्थापित क्षमता दुपटीने वाढणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>सेन्सेक्सची मोठी आपटी! निफ्टी २४ हजारांखाली, अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेचा परिणाम
‘आयपीओ’द्वारे निवा बुपाचे २,२०० कोटी उभारणार!
आरोग्यविमा क्षेत्रातील निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (पूर्वीची मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स) कंपनीने प्रति समभाग ७० ते ७४ रुपये किंमतपट्ट्यात प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. येत्या ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान सुरू राहणाऱ्या या भागविक्रीच्या माध्यमातून २,२०० कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांची मालकी असलेली ही एकल आरोग्य विमा क्षेत्रातील पहिलीच कंपनी, तर स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्सनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेली ही दुसरीच कंपनी आहे. सध्या या कंपनीत, बुपा सिंगापूर होल्डिंग्ज पीटीईची ६२.१९ टक्के हिस्सेदारी, तर फेटल टोन एलएलपीकडे २६.८ टक्के हिस्सा आहे. निवा बुपा या आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर, भांडवल वाढवण्यासाठी, पर्यायाने सॉल्व्हन्सी पातळी मजबूत करण्यासाठी करू इच्छित आहे.