लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल ३ जूनला आले. त्यावर निफ्टी निर्देशांकाने उच्चांकाला गवसणी घातली. ४ जूनला प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर, निफ्टी निर्देशांकावर दोन हजार अंशांची घसरण गुंतवणूकदारांनी पहिली. या घसरणीनंतर निफ्टीने कायापालट करत पुन्हा ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालत गुंतवणूकदारांची मनं जिंकली. निफ्टी निर्देशांकाचा ३ जून ते आतापर्यंतचा प्रवास हा ‘ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं’ अशा स्वरूपात झाला. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ७७,२०९.९० / निफ्टी: २३,५०१.१०
‘अति घाई संकटात नेई’ असा फलक द्रुतगती महामार्गावरील प्रवासात हमखास दिसून येतो. फलकावरील ते वाक्य आज आपण निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीच्या संदर्भात पडताळून पाहणार आहोत. संख्याशास्त्राप्रमाणे वृद्धी / वाढ ही दोन प्रकारांत मोजली जाते. १) ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन (अंकगणितीय श्रेणीतील वाढ) २) जिओमेट्रिकल प्रोग्रेशन (भौमितिक श्रेणीतील वाढ)
आणखी वाचा-बाजारातली माणसं: डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता- आशीषकुमार चौहान
गणितीय श्रेणीतील वाढ ही पाया रचत, संथ गतीने, शाश्वत स्वरूपाची असते. ही वाढ समजून घेण्यासाठी भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे अन्नधान्य उत्पादनाचे उदाहरण आपण घेऊया. भारताचे अन्नधान्य उत्पादन हे संथ गतीने गणितीय श्रेणीत वाढत होते. तर भारताची लोकसंख्या ही दुपटीच्या वेगाने ‘भौमितिक श्रेणी’त वाढत आहे. भौमितिक श्रेणीचे दुसरे उदाहरण म्हणजे ‘फसव्या आर्थिक योजनांच्या जाहिराती.’ ज्यात अल्पावधीत गुंतवलेली रक्कम ‘दामदुप्पट’ करण्याचे आमिष दाखवलेले असते. पुढे अशा योजनेंचे सादरकर्ते, गुंतवणूकदारांचा पैसाही अतिजलद वेगाने गोळा करून पोबारा करतात आणि अंतिमतः गुंतवणूकदारांची फसगत होते. भौमितिक श्रेणीतील वाढ ही अतिशय जलद वेगाने, कुठेही पाया न रचता, अल्पावधीत होत असते. त्यामुळे जेवढ्या वेगाने ही वाढ होते तेवढ्यायाच वेगाने ती खाली येते व फसगत होते. भौमितिक श्रेणी समजून घेण्यासाठी आपण तांत्रिक विश्लेषणातील एका सुभाषिताचा आधार घेऊया… वरचे अथवा खालचे लक्ष्य हे कालानुरूप व किमती स्वरूपात साध्य झाले पाहिजे. (टार्गेट शुड अचीव टाइम वाइज ॲण्ड प्राइस वाइज) या सुभाषिताचा आधार घेत आपण निफ्टी निर्देशांकाची वाटचाल जाणून घेऊया. गेल्या सहा महिन्यांत निफ्टी निर्देशांकावर नीचांकापासून १,००० ते १,३०० अंशांची तेजी / सुधारणा होत आली आहे. जसे की…
१) निफ्टी निर्देशांकाचा २४ जानेवारीचा नीचांक २१,१३७ वरून, तो २३ फेब्रुवारीला २२,२९७ चा उच्चांकापर्यंत झेपावला. नीचांकापासून उच्चांकापर्यंत १,१६० अंशांची वाढ.
२) निफ्टी निर्देशांकाचा २० मार्चचा नीचांक २१,७१०, तेथून १० एप्रिलला २२,७७५चा उच्चांक त्याने नोंदवला. नीचांकापासून उच्चांकापर्यंत १,०६५ अंशांची वाढ. ही वाढ १३ कामकाज दिवसांत झाली.
३) निफ्टी निर्देशांकाचा १९ एप्रिलचा नीचांक २१,७७७, तेथून ३ मेला २२,७९४ चा उच्चांक त्याने नोंदवला. नीचांकापासून उच्चांकापर्यंत १,०१७ अंशांची वाढ अवघ्या ९ कामकाज दिवसांत झाली.
४) निफ्टी निर्देशांकाचा १३ मेचा नीचांक २१,८२१, तेथून २७ मेला २३,११० चा उच्चांक त्याने नोंदवला. नीचांकापासून उच्चांकापर्यंत १,२८९ अंशांची वाढ १० कामकाज दिवसांत झाली.
आणखी वाचा-परदेशी गुंतवणूक ओघाने, निर्देशांकांची उच्चांकी झेप
निफ्टी निर्देशांकाच्या गेल्या सहा महिन्यांतील वाटचालीचा ल.सा.वि. काढल्यास निफ्टी निर्देशांकावर नीचांकापासून १,००० ते १,३०० अंशांची सुधारणा ही ९ ते १३ दिवसात होते. थोडक्यात निफ्टी निर्देशांकावर किमतीच्या स्वरूपातील १,००० ते १,३०० अंशांचे वरच लक्ष्य हे ९ ते १३ दिवसांत साध्य होताना दिसत आहे. जे गणितीय श्रेणीतील वाढीत बसणारे आहे. याला अपवाद म्हणजे ४ जूनचा २१,२८१च्या नीचांकापासून अवघ्या १० कामकाज दिवसांत २,३८३ अंशांची झालेली वाढ. (निफ्टी निर्देशांकावरील ४ जूनचा २१,२८१ नीचांकापासून, १९ जूनचा २३,६६४ चा उच्चांक) ही वाढ कालानुरूप पद्धतीत १० कामकाजीन दिवसातच झाली आहे. पण या कालावधीत निफ्टी निर्देशांकाची सामान्यपणे जी १,००० ते १,३०० अशांच्या कक्षेतील वाढीची वाटचाल न राहता, ही वाढ जवळपास दुप्पट म्हणजे २,३८३ अंशांच्या भूमितीय श्रेणीतील आहे. कुठेही पायाभरणी न करता ती झाली हेच चिंतेचे कारण आहे. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २३,२०० ते २३,८०० अशा ६०० अंशांच्या परिघाला ‘अनन्यसाधारण’ महत्त्व असणार आहे. निफ्टी निर्देशांकाने २३,२०० ते २३,८०० या परिघात जुलै मध्यापर्यंत पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांकावरील २,३८३ अंशांच्या भूमिती श्रेणीतील वाढीचे ओझे कालानुरूप पचवून, निफ्टी निर्देशांक २४,२०० ते २४,५०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालण्यास सज्ज होईल. निफ्टी निर्देशांक जर २३,२०० ते २३,८०० या परिघात जुलै मध्यापर्यंत पायाभरणी करण्यास अपयशी ठरला आणि त्याने २३,२०० चा स्तर तोडल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २३,००० तर, द्वितीय खालचे लक्ष्य २२,८०० ते २२,५०० असे असेल.
महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.