प्रमोद पुराणिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवस होता १९ ऑक्टोबर २०२२. पिरामल फार्मा लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची दोन्ही शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी सारे एकत्र आले होते. प्रथेप्रमाणे शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होण्याआधी विधिवत घंटा वाजवली गेली.

या प्रसंगी केलेल्या भाषणात अजय पिरामल यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “माझी फार वर्षाची इच्छा होती की शेअर बाजाराच्या ऐतिहासिक वास्तूत कंपनीच्या शेअर्सच्या सूचिबद्धतेचा समारंभ व्हावा आणि विधिवत घंटा वाजवता यावी. परंतु माझ्या आयुष्यात ही संधी इतकी वर्ष मला आतापर्यंत कधी मिळूच शकली नव्हती. कारण मी आतापर्यंतच्या आयुष्यात अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचीच खरेदी विक्री केली.

बाजारात काही उद्योजक नवे प्रकल्प उभारतात किंवा नवे प्रकल्प उभे करण्यासाठी शेअर्स विक्री करून कंपनीच्या शेअर्सची बाजारात नोंदणी करतात. शेअर बाजाराची घंटा वाजवण्याच्या अजय पिरामल यांच्या इच्छापूर्तीच्या वरील प्रसंगावरून, पु.ल. देशपांडे यांचे एक वाक्य डोळ्यासमोर आले. त्यांनी एका ठिकाणी असे लिहिलेले आहे की, फार वर्षापासून रेल्वे इंजिनात बसून रेल्वेची शिट्टी मोठमोठ्याने वाजवायची होती ती इच्छा पूर्ण झाली.

गमतीजमती, आठवणींसह अजय पिरामल यांचे भाषण सुरू होते आणि मन भूतकाळात गेले. व्हीआयपी इंडस्ट्रीजचे दिलीप पिरामल यांचे लहान भाऊ म्हणजे अजय पिरामल एवढीच त्यांची तोवर ओळख होती, ती आता बदलली. शेअर बाजारात छोटे गुंतवणूकदार कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री करतात आणि या बाजारात काही व्यक्ती कंपन्यांचीच खरेदी-विक्री करतात.

फक्त १६ कोटी रुपयांना अजय पिरामल यांनी निकोलस लॅबोरेटरीजची ही औषध उद्योगातील कंपनी खरेदी केली होती. त्या वेळेस त्यांना औषध निर्माणाची काही माहिती असावी असे नाही. किंबहुना नसावीच. मात्र काही वर्षानंतर या कंपनीची भरभराट केल्यानंतर, त्यातील फक्त एक व्यवसाय शाखा त्यांनी अबॉट या कंपनीला १८ हजार कोटी रुपयांना विकली.

मुंबईच्या कापड गिरण्या, या गिरण्यांची प्रगती, दत्ता सामंतप्रणीत कामगारांनी सुरू केलेला संप, त्यानंतर या गिरण्यांची झालेली वाताहत, एकामागोमाग एक गिरण्या बंद होणे, लालबाग, परळ, वरळी या परिसरांत बंद गिरण्यांच्या जमिनींवर मोठे ट्रॉवर्स उभे राहणे आणि या जागांची विक्री हा खूप मोठा विषय आहे. या संबंधात अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटक-सिनेमांतील चित्रण, कथित कामगार पुढारी, राजकारणी, धोरणकर्ते, सरकारी अधिकारी यांचा हस्तक्षेप… असा हा अजूनदेखील न संपलेला मोठा विषय आहे. तर अजय पिरामल या केंद्रापासून आपल्याला विषयांतर होऊ द्यायचे नाही. मोरारजी गोकुळदास ही पिरामल उदयोग समूहाची या क्षेत्रातील मुख्य कंपनी होती. दिलीप पिरामल यांनी वेगळा मार्ग शोधला. अशोक पिरामल घरबांधणी क्षेत्रात उतरले. परंतु त्यांचे पुढे नंतर निधन झाले.

अजय पिरामल यांनी ज्या व्यवसायाची अजिबात माहिती नव्हती अशा औषध उद्योगाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. निकोलस पिरामल ही फक्त एक सुरुवात होती. त्यानंतर एका मागोमाग एक अनेक परदेशी कंपन्या खरेदी करण्यास त्यांनी सुरुवात केली. खरेदी करताना अडचणीत आलेले उद्योग स्वस्तात खरेदी करायचे आणि त्यानंतर आकर्षक किमतीला विक्री करायचे हे अजय पिरामल यांच्या व्यवसायाचे मुख्य धोरण. हेच धोरण जमिनीच्या खरेदीसाठीसुद्धा त्यांनी वापरले. हिंदुस्थान युनिलिव्हरला वरळी येथे मोठी जागा विकायची होती. अजय पिरामल पुढे आले क्रॉस रोडला देशातला पहिला मॉल त्यांनी सुरू केला. घरबांधणी क्षेत्रातील घाऊक कर्जाची बाजारपेठ ताब्यात ठेवताना जोखीम कमी करण्यासाठी लहान कर्ज वाटप करणाऱ्या श्रीराम कॅपिटल, श्रीराम ट्रान्सपोर्ट ॲण्ड फायनान्स याच्याबरोबरसुद्धा त्यांनी हातमिळवणी केली. परंतु दोन भिन्न संस्कृती एकामेकांत एकरूप होऊ शकत नव्हत्या. म्हणून वेगळे होणे, दोन पावले मागे येण्यात कोणता कमीपणाही त्यांनी मानला नाही.

लहान व्यक्तींना कर्ज देण्यास सुरुवात करून ४५ वर्षात एचडीएफसी हा मोठा उद्योग समूह बनला. त्या संबंधीचा इतिहास आणि तो इतिहास निर्माण करणाऱ्या व्यक्ती यांचा परिचय या स्तंभातून या अगोदर करून दिलेला आहे. परंतु या क्षेत्रात एलआयसी हाऊसिंग फायनान्स, बँकांच्या सबसिडियरीज् कंपन्या, दिवाण हाऊसिंग फायनान्स या कंपन्यांना मोठे होता आले नाही. दिवाण हाऊसिंगच्या बाबतीत तर प्रवर्तकांनी असे काही उद्योग केले की त्यामुळे त्या कंपनीलाच आजार जडला. ही आजारी कंपनी खरेदी करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे आले. परंतु यामध्ये गौतम अदानींना मागे सारून अजय पिरामल यांनी दिवाण हाऊसिंग आपल्या ताब्यात घेतली. अबॉटच्या बाबतीत जास्तीत जास्त पैशांना व्यवसाय शाखा विकण्याचे त्यांनी कौशल्य दाखविले, तर दिवाण हाऊसिंग ही आजारी कंपनी खरेदी करताना कंपनीने थकवलेल्या ३७ हजार कोटी रुपयांच्या देणींच्या बदल्यात फक्त १ रुपया त्यांना मोजावा लागला.

पिरामल एंटरप्रायजेस या एका छताखाली दोन विभाग ठेवण्यापेक्षा औषध कंपनी वेगळी करा आणि घरबांधणीसाठी कर्ज देणारी कंपनी वेगळी करा असा धाडसी निर्णय घेण्यात आला. औषध कंपनीत परदेशी मोठा गुंतवणूकदार त्यांनी आणला.

अजय पिरामल हे स्वत: काय करणार यापेक्षा भल्याभल्यांना ते त्यांच्या पुढच्या पावलांचा विचार करायला लावतात. एक मात्र नक्की आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांची अजेय वाटचाल सुरूच राहते. बाजारासाठीही त्याची धग कायम राखण्यासाठी अशा कंपन्या खरेदी करणारा अजय पिरामल हा असावाच लागतो.

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay piramal speech during listing of shares of piramal pharma ltd zws