फेडरल-मोगुल गोयेत्झ (इंडिया) लिमिटेड
(बीएसई कोड ५०५७४४)
प्रवर्तक: टेंनेको इंक
बाजारभाव: रु. ३५८/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऑटो अन्सिलरी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५५.६३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.९८
परदेशी गुंतवणूकदार ०.४९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १.४३
इतर/ जनता २३.१०
पुस्तकी मूल्य: रु. १७६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: — %
प्रति समभाग उत्पन्न: रु. १९.९३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३८.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १४.६
बीटा : ०.२
बाजार भांडवल: रु. १,९८६ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४३२/८५
सुमारे ७० वर्षांपूर्वी म्हणजे १९५४ मध्ये भारतात फेडरल-मोगुल गोयेत्झ (इंडिया) लिमिटेडची जर्मनीच्या गोयेत्झ-वेर्के सोबत संयुक्त उपक्रम म्हणून स्थापना झाली. ही गोयेत्झ-वेर्के ही फेडरल-मोगलची भारतातील उपकंपनी होती. २०१८ मध्ये जागतिक पटलावर फेडरल-मोगल टेंनेको इंकमध्ये विलीन झाली.
हेही वाचा – “ज्येष्ठ आणि चतुरस्र अर्थमंत्री”… प्रणव मुखर्जी
कंपनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना पिस्टन, पिस्टन रिंग इत्यादीसारख्या ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण करते. भारतातील पिस्टन आणि पिस्टन रिंग्सच्या संघटित बाजारपेठेतील ३० टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा असलेली ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ३० मिमी ते ३०० मिमी व्यासाचे वेगवेगळे पिस्टन आणि पिस्टन रिंग, सिंटर केलेले भाग आणि सिलिंडर लाइनर्स निर्मिती करते. ज्यांचा दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने, एसयूव्ही, उच्च-आऊटपुट लोकोमोटिव्ह डिझेल इंजिन इत्यादींमध्ये समावेश होतो.
कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प आणि अशोक लेलँड यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. उत्पादनानुसार कंपनीला ८८ टक्के महसूल पिस्टन, पिस्टन रिंग आणि पिस्टन पिनच्या विक्रीतून मिळतो, तर व्हॉल्व्ह ट्रेन आणि स्ट्रक्चरल घटक यांचे महसुलात १२ टक्के योगदान आहे.
कंपनीचे भारतामध्ये तीन उत्पादन प्रकल्प असून तेथील उत्पादन आणि वितरण सुविधा पुढीलप्रमाणे आहेत :
१. पटियाला: पिस्टन, पिस्टन रिंग, क्रांक पिन आणि सिलिंडर लाइनर्स
२ बंगळुरू: पिस्टन आणि पिस्टन रिंग
३ भिवंडी : व्हॉल्व्ह सीट, सिंटेरेड पार्ट्स आणि पावडर मेटल प्रॉडक्ट्स
गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली होती. कंपनीने १,६३४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १००.८७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तर यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ४११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ५३ टक्क्यांनी अधिक आहे. फेडरल-मोगुलचा ८८ टक्के महसूल हा चारचाकी वाहनांचा असून केवळ १२ टक्के दुचाकी वाहनांचा आहे. सध्या दुचाकी आणि तीनचाकी वाहन प्रकारात विद्युत वाहनांची निर्मिती अधिक होते. मात्र चारचाकी वाहनांना अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तसेच हायब्रिड वाहनांना वाढती मागणी असल्याने फेडरल मोगलसारख्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. वाहन उद्योगाला आलेले भरभराटीचे दिवस आणि पर्यावरणपूरक वाहनांची वाढती मागणी यामुळे आगामी कालावधीत कंपनी उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीचे सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. ते अभ्यासून कुठलेही कर्ज नसलेली आणि केवळ ०.२ बिटा असलेली बहुराष्ट्रीय फेडरल-मोगुल गोयेत्झच्या समभागाचा मध्यम कालावधीसाठी विचार करायला हरकत नाही.
हेही वाचा – बाजारातील माणसं : व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती!
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
Stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १ % पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.