मुंबई : अर्का फिनकॅप लिमिटेडने अपरिवर्तनीय रोख्यांच्या (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर – एनसीडी) सार्वजनिक विक्रीच्या पहिल्या टप्प्यात यशस्वीरीत्या भरणा पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. १०० टक्क्यांपेक्षा अधिक भरणा पूर्ण करणारा प्रतिसाद मिळवत, अंदाजे ३०८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख्यांसाठी मागणी नोंदवली गेल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हेही वाचा >>> रुपयांत तेलाचे आयात व्यवहार नगण्यच; सरकारकडून सारवासारव; कोणतेही उद्दिष्ट ठरविले नसल्याचे जाहीर
किर्लोस्कर समूहातील या बँकेतर वित्तीय कंपनीच्या रोखे विक्रीच्या या पहिल्या टप्प्याचे मूळ आकारमान १५० कोटी रुपयांचे होते आणि अतिरिक्त भरणा झाल्यास आणखी १५० कोटी रुपयांपर्यंत अर्थात एकूण ३०० कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत निधी मिळवण्याचा पर्याय यात खुला होता. ही रोखे विक्री ७ डिसेंबर रोजी खुली होऊन, २० डिसेंबर २०२३ रोजी बंद झाली. हे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) मुंबई शेअर बाजारावर सूचिबद्ध केले जाणार आहेत. कंपनीच्या पहिल्या टप्प्यांतील रोखे विक्रीत वैविध्यपूर्ण विभागातील ३,००० हून अधिक गुंतवणूकदारांचा सक्रिय सहभाग दिसून आला. गुंतवणूकदारांकडून दाखल एकूण मागणीच्या अंदाजे ७० टक्के अर्ज हे ३६ महिन्यांचा कालावधी असलेल्या श्रेणीने आकर्षित केले आहेत.