प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवड्याच्या लेखामध्ये ‘लीव्हर या कंपनीवर आम्ही भागधारक गुणदोषासकट प्रयोग करतो’ असे लिहिले होते. या अनुषंगाने चंद्रकांत संपत या भागधारकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय राहता येणार नाही. चंद्रकांत संपत वर्षानुवर्षे लिव्हरचे भागधारक होते. फेब्रुवारी २०१५ ला त्यांचे निधन झाले. मूल्य (व्हॅल्यू) विरुद्ध वृद्धी (ग्रोथ) या सनातन वादात मूल्यांवर आधारित गुंतवणूक करणारे चंद्रकांत संपत हे मोठे गुंतवणूकदार होते. तथापि चंद्रकांत संपत हे ज्यांचे गुरू होते ते पराग पारिख हे आपल्या आजच्या लेखाचे मानकरी आहेत. पराग पारिख यांच्या वडिलांचे संपत मित्र होते. चंद्रकांत संपत आणि पराग पारिख हे दोघेही आता हयात नाहीत. परंतु या दोघांनी त्यांच्या हयातीत ज्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार केला, जी विचारसरणी बाजारातून कधीच नष्ट होऊ शकणार नाही, ती विचारसरणी म्हणजे कंपनीच्या शेअर्सचे मूल्य ओळखा, गुंतवणूक करा आणि या गुंतवणुकीचा दीर्घकाळ डोळ्यात तेल घालून सांभाळ करा.

पराग पारिख यांनी या विचारसरणीत आणखी एका महत्त्वाच्या पैलूची भर घातली. विचारसरणीच्या त्या पैलूचे मूल्याधारित गुंतवणुकीबरोबर (व्हॅल्यू इन्वेस्टिंग) बीव्हेरियल फायनान्स (वर्तवणूक वित्त) या संकल्पनेशिवाय स्पष्टीकरण होऊ शकणार नाही. पराग पारिख यांनी या विचारसरणीवर आपले लक्ष केंद्रित केले. म्हणूनच त्यांच्यापश्चातही त्यांच्या या देणगीला आणि पराग पारिख यांनाही विसरता येणे शक्य नाही. अमेरिकेत ओमाहा येथे आठ वर्षांपूर्वी वॉरेन बफेच्या भागधारकांच्या वार्षिक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते गेले असता रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईत १२ फेब्रुवारी १९५४ रोजी पराग पारिख यांचा जन्म झाला. १९८३ ला शेअर दलाल म्हणून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. १९९६ ला फक्त पाच लाख रुपये एवढी माफक गुंतवणूक मर्यादा ठेवून त्यांनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा सुरू केली. त्याअगोदर १९९२ ला पराग पारिख ॲण्ड फायनान्शियल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस ही कंपनी सुरू केली. सिंहासन चित्रपटातील जयराम हर्डीकर या मराठी नटासारखा दिसणारा पराग पोलिओग्रस्त होता. पण या व्याधीचा त्याने कधी बाऊ केला नाही. त्याचे कधीही भांडवल न करता, त्यावर मात करून तो आयुष्य जगला.

प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद त्यांच्यात होती. मूल्य विरुद्ध वृद्धी हा बाजारातला जुना संघर्ष आहे. तसे बाजारात अनेक वाद आहेत. मूलभूत विश्लेषण विरुद्ध तांत्रिक विश्लेषण अथवा शेअर्स चांगले की फक्त म्युच्युअल फंड वगैरे. शिवाय म्युच्युअल फंड हा केवळ विषय घेतला तर म्युच्युअल फंड वितरकांमार्फत गुंतवणूक करायची की दोन पैसे वाचविण्यासाठी त्याला बाजूला सारून थेट गुंतवणूक करायची. बाजारात पुन्हा ॲक्टिव्ह फंड की पॅसिव्ह फंड यापैकी कशाची निवड करावी, असे अनेक न संपणारे वाद आहेत.

पराग पारिख शेअर दलाल म्हणून बाजारात आले तेव्हा कंपन्यांचा अभ्यास करून संशोधनात्मक अहवाल तयार करायचे आणि ते अहवाल वेगवेगळ्या संस्थांना पाठवायचे. ही त्या काळी अगदी नवीन पद्धत त्याने बाजारात सुरू केली. तोपर्यंतचा बाजार म्हणजे अफवांवर चालणारा बाजार होता. आतल्या गोटातील खबर, संचालक आणि संचालकांचे नातेवाईक, त्यांची प्रकरणे, कंपनीच्या मालकांचे आजारपण, संप, टाळेबंदी, कामगार अशांतता अशा अनेक घटना, वावड्यांवर बाजारात शेअर्समध्ये चढ-उतार व्हायचे. गुंतवणूक करणाऱ्या संस्थांनासुद्धा कंपन्यांचे अशा प्रकारचे संशोधन करून केलेले अहवाल फारसे माहिती नसायचे. उत्कृष्ट संशोधन मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध होते. भगवत गीतेचे जसे १८ अध्याय आहेत, तसे शेअर बाजाराचे १८ व्हॉल्युम होते. दर आठवड्याला यातली काही पाने नव्याने तयार करून पाठवली जात. अशा प्रकारे वर्षभरात जुनी माहिती नष्ट करणे आणि नवीन माहितीचा पुरवठा करणे, असा हा अंत्यत चांगला प्रकार होता. परंतु खर्च परवडत नाही म्हणून मुंबई शेअर बाजाराने त्याची छपाई बंद केली. पुढे १९८६ ला ‘कॅपिटल मार्केट’ हे अत्यंत दर्जेदार पाक्षिक सुरू झाले. थोडक्यात, बदललेल्या परिस्थितीमुळे ‘रिसर्च रिपोर्ट’चे बाजारात महत्त्व वाढले. पराग पारिखला व्यवसायवाढीसाठी याचा फार उपयोग झाला.

या माणसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन शिकण्याची तयारी. हार्वर्डला ‘बिव्हेरियल फायनान्स’चे शिक्षण घेण्यासाठी जाणारा हा त्या काळातील एकमेव दलाल होता. तर अखेरपर्यत कोर्सेरा या संस्थेकडून वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास त्याने चालू ठेवला. चंद्रकांत संपत यांचे २०१५ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. परंतु ते पराग पारिख यांच्या वडिलाचे मित्र होते. आणि त्यांनी पराग पारिख यांना जे ज्ञान दिले ते पराग पारिख आयुष्यभर विसरले नाहीत. शेअर बाजारातील इतर दलाल भले-बुरे मार्ग वापरून जेव्हा प्रचंड पैसा कमावत होते तेव्हासुद्धा पराग पारिख यांना आपली विचारसरणी बदलून सट्टा खेळावा असे कधी वाटले नाही हे जास्त महत्त्वाचे. हर्षद मेहताने पराग पारिखने आपल्याबरोबर यावे म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु तुझे आणि माझे विचार वेगळे आहेत. त्यामुळे आपले जमणे शक्य नाही, असे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस पराग पारिख यांच्याकडे होते.

बाजारातील माणूस त्यांना त्यांच्या विचारसरणीने ओळखतो. पराग पारिख यांनी दोन पुस्तके लिहिली. अनेक वर्तमानपत्रांमध्ये वर्षानुवर्षे लिखाण केले. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक अर्थात सेन्सेक्स, या निर्देशांकांत वेळोवेळी करण्यात आलेले बदल, हे बदल योग्य की अयोग्य यावर त्यांच्या पुस्तकात असलेले त्यावरचे भाष्य हे शेअर बाजाराशी संबंध असलेल्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. १९९६ सालात तर या निर्देशांकातील १५ शेअर्स बदलण्याचा विक्रम मुंबई शेअर्स बाजाराने केला होता. आणि पुन्हा या १५ शेअर्सपैकी आज एकसुद्धा शेअर निर्देशांकात आपले अस्तित्त्व ठेवू शकला नाही हे कटू सत्य आहे.

शेवटी उद्योजकता निर्माण करणाऱ्या एका संस्थेच्या प्रशिक्षण वर्गात त्यांनी प्रवेश घेतला होता. त्याची घडलेली हकीकत सांगून या लेखाचा शेवट करणे योग्य ठरेल. कारण त्या कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये फक्त पराग पारिख नापास झाले. कारण त्यांनी जो प्रकल्प अहवाल तयार केला होता तो योग्य नाही, असे त्यांच्या प्रोफेसरचे मत बनले होते. टूथपेस्टसाठी नेहमीच्या ॲल्युमिनियम ट्यूब्स वापरण्याऐवजी जर प्लास्टिकच्या कोलॅप्सिबल ट्यूब्स वापरल्या तर ते योग्य राहील. परंतु टूथपेस्ट गोड असते. उंदीर त्या टूथपेस्ट कुरतडून टाकतील. म्हणून ॲल्युमिनियम ट्यूब्सच योग्य असे परीक्षक प्रोफेसरनी ठरवले. आणि म्हणून त्यांनी त्यांना नापास केले. मात्र १९८४ ला एस. एल. पॅकेजिंग ही कंपनी स्थापन झाली. तिने या ट्यूबचे उत्पादन सुरू केले आणि त्यामुळे प्रवर्तक आणि भागधारक दोघांनीही संपत्तीची निर्मिती केली. आणि त्या वेळेस अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीवरचा पराग पारिख यांचा विश्वास उडाला. मात्र याच वेळेस चंद्रकांत संपत यांनी पराग यांना सांगितले – ‘जर तुझ्याकडे अशी दूरदृष्टी आहे. तू स्वतंत्र विचार करू शकतो. यामुळे तू शेअर बाजारात यशस्वी होशील.’ म्हणून सुरुवातीला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये संशोधन विभागात काम केल्यानंतर आपले काका प्रफुलचंद्र पारिख यांच्याबरोबर सुरुवातीला काही वर्षे काम केल्यानंतर परागने स्वतःची स्टॉक ब्रोकिंग फर्म सुरू केली. अनेक शेअर दलालांच्या अनेक कथा अगदी तोंडपाठ आहेत तरी प्रातिनिधिक स्वरूपात ही एक वेगळी ओळख.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on a unique stock broker parag parikh print eco news asj
Show comments