-श्रीकांत कुवळेकर

मागील दोन महिने आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात जोरदार तेजी आली आहे. परंतु यामध्ये खास करून अकृषी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर खनिज तेल सुमारे २० टक्के वाढले आहे, धातूंमध्ये तांबे, ॲल्युमिनियम अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. या जोरदार तेजीचा कळस सोन्याचा आणि चांदीच्या लकाकीने साधला. सोने आणि चांदी यामधील मागील आठ आठवड्यांतील तेजी ही मागील अनेक दशकांत तरी पाहायला मिळालेली नाही. म्हणजे नोटबंदी आणि करोनामुळे किमतीत अचानक वाढ झालेली आपण पाहिली असली तरी सलग आठ आठवडे, एकूण प्रति औंस ४५० डॉलरची म्हणजे २० टक्के तेजी ही पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली आहे. त्यामुळे वित्तीय बाजारात एकीकडे निफ्टी-सेन्सेक्सदेखील नवीन शिखर गाठत असतानादेखील, गुंतवणूकदारांमध्ये जास्त चर्चा सराफा बाजारातील तेजीचीच सुरू आहे.

मागील शुक्रवारी भारतीय वायदे बाजारात शुद्ध सोन्याने १० ग्रॅमला जवळजवळ ७४,००० रुपयांचा विक्रम केला तर चांदीदेखील ८६,००० रुपये प्रति किलो या पातळीला स्पर्श करून आली. मात्र भारतीय हाजिर बाजार बंद झाल्यावर वायदे बाजारात हेच सोने ७२,००० रुपयांच्या खाली गडगडले आणि चांदीदेखील ८३,००० रुपयांच्या खाली घसरली.

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती
Rupee continues to decline against dollar print eco news
रुपया ८५.८७ च्या गाळात!

सोने आणि चांदीमध्ये आलेल्या या एकतर्फी तेजीने तेजीवाले (बुल्स) आणि मंदीवाले (बेअर्स) या दोघांचीही पंचाईत केल्याचे दिसून आले आहे. तसेच सराफा बाजारात ४० वर्षे वावरणाऱ्या बाजार पंडितांना, टेक्निकल चार्टस विशेषज्ञांना, सराफा असोसिएशन्सबरोबरच अगदी ‘वर्ल्ड गोल्ड काऊंसिल’ या सोन्याच्या उत्पादक आणि व्यापारी कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेलादेखील या मोठ्या तेजीचा अंदाज आगाऊ न आल्यामुळे त्यापासून मोठा आर्थिक फायदा कमावणेदेखील अनेकांना शक्य झाले नाही.

हेही वाचा…अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार

या स्तंभातून यापूर्वी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीचे अधिकतम लक्ष २,२२४ डॉलर आणि त्यानंतर मोठी करेक्शन असे अनुमानित केले गेले होते. परंतु अशी करेक्शन एखादा दिवस सोडल्यास, अजून २२५ डॉलर्सची तेजी जमेला आहे. शुक्रवारी अमेरिकी वायदे बाजारात २,२४८ डॉलर प्रति औंस हा विक्रम नोंदवल्यावर पुढील दोन तासांत सोन्याने सुमारे १०० डॉलरची करेक्शन दिली आहे. सोन्यातील हा जीवघेणा चढ-उतार पुढील काही महिने असाच राहील असा अंदाज आहे.

थोडक्यात सांगायचे तर मागील दोन महिन्यातील या तेजीने या क्षेत्रातील मूलभूत आणि टेक्निकल विशेषज्ञ, वर्ल्ड गोल्ड काऊंसिल, सराफा व्यापारी आणि सुवर्ण-बॅंका या सर्वांनाच बेसावधपणे खिंडीत गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या तेजीची कारणे शोधण्याबरोबरच ‘पुढे काय’ हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

तेजीची कारणे

विद्यमान २०२४ मध्ये पहिल्या तिमाहीत जो डेटा आणि भू-राजकीय घटक उपलब्ध होता त्यानुसार तेजीपूरक घटकांपेक्षा कांकणभर अधिक गोष्टी मंदीपूरक होत्या. उदाहरणार्थ, अमेरिकेतील २०२४ मधील व्याजदर कपातीची अपेक्षा तीन-चार वेळा होण्याऐवजी एक वेळ होण्यापर्यंत खाली आली आहे. जागतिक सुवर्ण-ईएटीएफमधील गुंतवणूक सतत नऊ महिने कमी होत गेल्याने फेब्रुवारीअखेर ती एकत्रितपणे ३,१२६ टन एवढी झाली. २०२० मधील विक्रमी ३,९०० टनांपासून ही मोठी घट आहे. अमेरिकी डॉलर निर्देशांक १०० वरून १०५ पर्यंत वाढला आहे. सामान्यत: अशा वेळी सोने १५०-२०० डॉलरने घटणेच अपेक्षित असते.

हेही वाचा…शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी

तेजीपूरक घटकांचा विचार करता जागतिक मध्यवर्ती बँकांची २०२३ मधील सोनेखरेदी या वर्षात चालूच राहिली असली तरी तिचा वेग खूप कमी झाल्याचे आकडेवारी दर्शवते. त्यामानाने भू-राजकीय तणाव हे एकच कारण खरेखुरे तेजीपूरक असले तरी दोन वर्षे चाललेले रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध आणि मध्यपूर्वेतील सातत्याने चालणाऱ्या कुरापती असूनही सोने या काळात वाढले नाही. त्यामुळे वरील घटकांच्या बाहेरील काही घटक असे असावेत ज्यामुळे ही अभूतपूर्व तेजी आली असावी.

यामध्ये पहिला घटक म्हणजे साधारणपणे वायदे बाजारात असणाऱ्या मोठ्या मंदीच्या पोझिशन्स. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यापारी वर्तुळात सोने १,९०० किंवा अगदी १,८२० डॉलरपर्यंत घसरून नंतर त्यात तेजी येईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर शॉर्ट किंवा मंदीच्या पोझिशन्स घेतल्या गेलेल्या होत्या. तेजीवाले आणि मंदीवाले यांचे बाजारात नेहमीच युद्ध चालू असते. एकमेकांना बेसावध क्षणी ‘ट्रॅप’ करून बाजार कल फिरवून अल्पावधीतच मोठा नफा कमावणे हा खेळ नेहमीच चालू असतो. यावेळच्या तेजीचे निदान आतापर्यंतचे तरी हेच सर्वात मोठे कारण असावे. वायदे बाजारात एकाचा फायदा तेवढेच दुसऱ्याचे नुकसान होत असते. यावेळी भारतीय बाजारातदेखील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असावे. हा खेळ नेहमी एवढ्या प्रदीर्घ काळासाठी चालत नसतो.

मात्र यावेळी तो दोन महिन्यांहून अधिक काळासाठी आणि फारच व्यापक स्तरावर चालला आहे. तसेच त्याला चीन-रशिया विरुद्ध अमेरिका व अमेरिकी डॉलर यांच्या एकमेकांवर चाललेल्या कुरघोडी हा घटक जोडला गेला आणि त्यासाठी पूरक वातावरण तयार केले गेले असावे. वस्तुत: चीनमध्ये वायद्यामध्ये केवळ सहा-सात टक्के मार्जिन भरून प्रमाणाबाहेर झालेली सोनेखरेदी हे प्रमुख कारण या तेजीसाठी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कुरघोडीचा हा मुद्दा थोडा अतिरंजित वाटला तरी अमेरिकी डॉलरचा प्रभाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी करण्यासाठी (डी-डॉलरायझेशन) चाललेले चीन आणि रशियाचे प्रयत्न आणि त्यांची सातत्याने चाललेली जोरदार सोनेखरेदी पाहता त्यात निश्चितच तथ्य असावे.

हेही वाचा…सेन्सेक्स आणि निफ्टीने रचला नवा इतिहास; बाजार भांडवल पहिल्यांदाच पोहोचले ४०० लाख कोटींवर

नेमक्या याच वातावरणात गाझापट्टीत चाललेलं युद्ध इस्रायलने थांबवले नाही तर इस्रायल-हमास वादात इराणने उडी घेण्याचा इशारा दिल्यामुळे ‘केकवर चेरी’ ठेवावी त्याप्रमाणे सोन्याच्या भावात गुरुवार-शुक्रवारी मोठी उसळी आली आणि २०२५ अखेरपर्यंत सोन्याच्या किमतीचे दिलेले २,४५० डॉलरचे लक्ष्य १२ एप्रिल २०२४ लाच गाठले गेले.
विशेष म्हणजे या सर्व काळात चांदीने सोन्यापेक्षा अधिक सरस कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. सोने २०टक्के वाढले तेथे चांदी ३० टक्के वाढली आणि भारतीय वायदे बाजारात दशकभरापूर्वीचा ७७,००० रुपयांचा विक्रम मोडून जवळजवळ ८६,००० रुपये प्रति किलोपर्यंत ती पोहोचली. विशेष म्हणजे अशा मोठ्या तेजीमध्ये किरकोळ मागणी जवळपास शून्य होण्यामुळे वायदेबाजारपेक्षा बाजारात सोने-चांदी १-२ टक्के कमी भावात मिळते. परंतु यावेळी मात्र असे काहीच घडलेले नाही.

पुढे काय?

सोने-चांदीमध्ये ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून आखात इराण विरुद्ध इस्रायल या दोन प्रबळ देशांमध्ये युद्धपूरक नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्ध झालेच तर सोने, खनिज तेल किती वाढेल याबाबत अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत. इस्रायलने सीरियात केलेल्या लष्करी हल्ल्यात इराण दूतावासातील वरिष्ठ अधिकारी मारल्यामुळे दुखावलेला इराण आर्थिकदृष्ट्या युद्धाच्या मन:स्थितीत नसला तरी निदान नागरिकांना दाखवण्यासाठी आणि काही आखाती देशांचा तारणहार ही आपली प्रतिमा राखण्यासाठी तरी फारसे विध्वंसक नसलेले छोटे-मोठे हल्ले करणे अशक्य नाही. याचा सोन्याला हातभार लागेल ही सर्वसाधारण अपेक्षा असते. परंतु परिस्थितीजन्य तेजी फार काळ चालत नसते हा इतिहास आहे. किंबहुना मागील महिन्याभरातील तेजीमागेदेखील आज असलेल्या परिस्थितीची आगाऊ माहिती असलेल्या मूठभर अति-महत्त्वाच्या संस्थांच्या बाजार हस्तक्षेपामुळे झालेली असणे अशक्य नाही. त्यामुळे ‘एंटर रुमर – एक्झिट न्यूज’ या बाजाराच्या नियमाप्रमाणे प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यासदेखील सोने स्थिर किंवा थोडे मंदीत जाणे अशक्य नाही. एकंदरीत एवढ्या तेजीनंतर पुढील कालावधी हा अत्यंत चढ-उतारांचा राहील असे इतिहास सांगतो. याची चुणूक शुक्रवारी रात्री १०० डॉलरच्या चढ-उताराने आली आहेच.

नेहमीप्रमाणे गुंतवणूक संस्था आणि बँका यांनी काढलेल्या नवीन रिसर्च रिपोर्टसमध्ये सोन्याचे येत्या वर्षभरातील लक्ष्य २,५०० – २,७०० डॉलर किंवा अगदी ३,००० डॉलरपर्यंत दिले आहे. जागतिक तणाव पाहता यातील एखादे लक्ष्य अत्यंत थोड्या कालावधीसाठी का होईना, पण गाठले जाईलही. परंतु इतिहास पाहता कुठल्याही मालमत्तेत जेव्हा अशी मोठी लक्ष्य दिली जातात, तेव्हा त्यानंतर त्यात मोठी घसरण येते. दीड दशकापूर्वी जेव्हा खनिज तेल पिंपामागे १४० डॉलर झाले तेव्हा लगेचच २०० डॉलरचे लक्ष्य दिले गेले आणि लगेचच तेलाची किंमत २०-२५ डॉलरपर्यंत घसरली. शेअर बाजारात तर हा अनुभव कायमच येत असतो.

सध्या भारत निवडणूकपूर्व परिस्थितीत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष असल्यामुळे सोन्याची मागणी जवळजवळ नसल्यागत आहे. डॉलर निर्देशांक तेजीत आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था जोमात असल्यामुळे व्याजदर कपात अपेक्षेहून अधिक लांबली आहे, भारताप्रमाणेच जगातील अनेक राष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे सोन्यात तेजीला मोठी कारणे उरलेली नाहीत. नेमक्या याच वेळी इस्रायलने जागतिक दबावापुढे नमून गाझामध्ये युद्धबंदी करार केल्यास सोने-चांदीत मोठी मंदी येणे अनपेक्षित नाही.

हेही वाचा…तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?

एकंदर गोळाबेरीज करता निदान गुंतवणूकदारांनी तरी या घडीला सोन्यापासून लांब राहणेच इष्ट ठरेल. अल्पकालीन ट्रेडिंगसाठी मोठे चढ-उतार कमाईच्या संधी देत राहतील. परंतु हे व्यवहार ‘स्टॉप लॉस’ कठोरपणे लावूनच करावे लागतील. गुंतवणुकीसाठी बाजार सर्वांनाच वेळोवेळी एंट्री आणि एक्झिटच्या संधी देत असतो. त्याची वाट पाहावी.

ई-मेल : ksrikant10@gmail.com

Story img Loader