एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारावर पडलेले दिसत आहेत. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आण निफ्टीमध्ये उच्चांकी उसळी पाहायला मिळाली. निफ्टीच्या निर्देशांकात ३.५८ टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये ३.५५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये २,६२१.९८ अकांची वाढ होऊन निर्देशांक ७६ हजारांच्याही पुढे गेलेला पाहायला मिळाला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ७६ हजारांचा टप्पा पार केला. तसेच निफ्टीमध्येही ८०७.२० अकांची वाढ होत निर्देशांक २३,३३७ च्याही पुढे गेला. नंतर तो २३,००० वर स्थिर असल्याचे दिसले.
शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमत असेल, असे अंदाज वर्तविले होते. या अंदाजानंतर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
विश्लेषकांच्या मते, या आठवड्यातील दोन मोठ्या घडामोडींमुळे शेअर बाजारात तेजी दिसत आहे. एकतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत, ज्याचा कौल एक्झिट पोल्सनी दिला आहे. तसेच ७ जून रोजी आरबीआयकडून व्याजदराची घोषणा गव्हर्नर दास करणार आहेत. या दोन्ही घडामोडीमुळे शेअर बाजारात उत्साह दिसत आहे.
स्वस्तिका इनव्हेस्टमार्ट लि.चे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, शुक्रवारी अनेक एक्झिट पोल्सनी एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. पण त्याचवेळी जर प्रत्यक्ष निकालात एक्झिट पोलपेक्षा काही वेगळे चित्र दिसले तर बाजारावर त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात.
बातमी अपडेट होत आहे…