Donald Trump Tariff War : डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. यादरम्यान चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्ध भडकले आहे. यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०४ टक्के आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आयातशुल्क बुधवारपासून (९ एप्रिल) लागू केले जाणार आहे. यानंतर या दोन जागतिक महासत्तांमधील व्यापारयुद्ध आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. यादरम्यान याचा परिणाम जागतिक बाजारावर देखील पाहायला मिळत आहे.
व्हाईट हाऊस चिनी मालाच्या आयातीवर १०४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात कर लादण्यासह इतर देशांवर लावण्यात येत असलेले व्यापारशुल्क यामुळे आशियाई बाजार बुधवारी पुन्हा एकदा कोसळल्याचे पाहायला मिळले.
सकाळच्या सत्रात जपानचा निक्की २२५ निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरला तर दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे देखील घसरण पाहायला मिळाली, यासंबंधीचे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.
चीनचा ब्लू चीप्स निर्देशांक १.२ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक हा ३.१ टक्के खाली गेला. एमएससीआयचा ब्रॉडेस्ट इंडेक्स ऑफ अशिया-पॅसिफिक शेअर्स जपानच्या बाहेर १.७ टक्क्यांनी कोसळला.
जागातील सर्वात मोठ्या दोन आर्थिक महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार युद्ध सुरू झाल्याने जगभरातील गुंतवणूकदार हे चिंतेत पडले आहेत.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात लादलेल्या व्यापार कराचा थेट परिणाम अमेरिकन नागरिकांवर देखील होणार आहे. येथील खरेदीदारांसाठी वस्तुंच्या किंमती वाढणार असून अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता देखील आहे. याबरोबरच जगभरात आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेफ- हेवन चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत खाली गेली आहे, तर दुसरीकडे युआन एका रात्रीत प्रति डॉलर ७.४२८७ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, असे रॉयटर्सने म्हटले आहे. इतकेच नाही तर मंदीच्या भीतीने तेलाच्या किमतींनी देखील चार वर्षांमधील निच्चांक गाठला आहे.
अमेरिकन बाजाराची स्थिती देखील खूप चांगली नाही. बाजारात गेल्या ५० वर्षांमधील सर्वात मोठी उलथापालथ होत असताना एसअँडपी ५०० मध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये बेंचमार्क निर्देशांकाने चांगल्या सुरुवातीनंतर ४.२ टक्के घसरण अनुभवली. ज्यामुळे निर्देशांकाने शेअर मार्केट व्हॅल्यूमध्ये ५.८ ट्रिलियन डॉलर्स गमावले आहेत, जे १९५० च्या दशकात या निर्देशांकाची स्थापना झाल्यापासून चार दिवसांतील सर्वात मोठे नुकसान आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
आशियामध्ये एसअँडपी ५०० फ्युचर्स हे १.५ टक्के घसरले तर Nasdaq फ्युचर्स हा १.७ टक्के खाली गेले. याचा परिणाम युरोपातील बाजारात देखील देखील पाहायला मिळाला असून EUROSTOXX ५० फ्यूचर्स हे ४.५ टक्के खाली गेले, तर FTSE फ्युचर्स २.५ टक्के घसरले.