प्रमोद पुराणिक
अमेरिकी म्युच्युअल फंड, त्यांच्या विविध योजना याबद्दल अमेरिकेत प्रचंड माहिती उपलब्ध आहे. असायलाही हवी, कारण अमेरिकी म्युच्युअल फंड उद्योग शताब्दी वर्षे साजरे करीत आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योग आणि अमेरिकेतून भारतात आलेले म्युच्युअल फंडस् हा एक वेगळा विषय आहे. त्यात पुन्हा काही आले, काही गेले. ब्लॅक रॉकसारखे म्युच्युअल फंड परत आले. काही कालावधीनंतर फिडॅलिटी, गोल्डमन सॅक्स हे माघारी गेलेले अमेरिकी फंड भारतात परत येतील. किंबहुना त्यांना यावेच लागेल.
या पार्श्वभूमीवर फ्रॅंकलिन म्युच्युअल फंड वेगळा दिसून येतो. या फंडाने एयूएम वाढीच्या ‘रॅट रेस’मध्ये कधीही भाग घेतला नाही. तरीसुद्धा हा फंड आणि त्यांच्या विविध योजना भारतात चांगल्याप्रकारे आपले काम करीत आहेत.
फंडाचे सर्वेसर्वा बदलत गेले. पण मुख्य विचारधारा कायम राहिली. या मालमत्ता व्यवस्थापन (ॲसेट मॅनेजमेंट) कंपनीने जेव्हा कोठारी पायोनिअर फंडाची खरेदी केली. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड वितरक वर्ग या फंडाकडे आला. त्याचाही या फंडाला चांगला उपयोग झाला. व्यक्तीच्या आयुष्यात जसे चढ-उतार येतात तसे संस्थेच्या आयुष्यातसुद्धा येत असतात. पण यावर मात करून दोन म्युच्युअल फंडानी आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले त्यापैकी एक यूटीआय म्युच्युअल फंड आणि दुसरा फ्रॅंकलिन म्युच्युअल फंड.
हेही वाचा >>>नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
अविनाश सातवळेकर या व्यक्तीचे काय महत्त्वाचे काम असा जर प्रश्न विचारला तर, फंडाच्या गुंतवणूकदारांमध्ये , कर्मचाऱ्यांमध्ये आणि वितरकांमध्ये पुन्हा एक विश्वास निर्माण करणाऱ्या संघनायकाची भूमिका त्यांनी चोख निभावली. फ्रॅंकलिन म्युच्युअल फंड भारतातून बाहेर पडणार नाही, तर संकटावर मात करून खंबीरपणे या व्यवसायात उभा राहील, हे पटवून देण्यात ते यशस्वीही ठरले. अविनाश सातवळेकर हे भारतात येण्याअगोदर मलेशियात फ्रॅंकलिन फंडाचे कंट्री हेड होते. व्हिएतनाम येथे ओपन एंडेड रिटेल फंड २०१३ ला सुरु करणारी पहिली ॲसेट मॅनेजमेंट कंपनी फ्रॅंकलिनची होती. आणि यांचे नेतृत्व अविनाश सातवळेकर यांनी केले. ही जबाबदारी त्यांच्यावर का सोपवण्यात आली तर, त्या अगोदर फ्रॅंकलिनमध्ये अमेरिकेत व्हॉइस प्रेसिडेंट पोर्टफोलिओ मॅनेजर आणि रिसर्च ॲनालिस्ट फ्रॅंकलिन पोर्टफोलिओ ॲडव्हायझर ही एक एफटीपीएची शाखा होती. त्या शाखेची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
फ्रॅंकलिन स्मॉल कॅप ग्रोथ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्येसुद्धा त्यांनी महत्त्वाचे काम केले. लीड मॅनेजर प्रायव्हेट स्मॉल कॅप अकाउंट्स या जबाबदाऱ्या तर सांभाळल्याच, पण विशेष नैपुण्य हे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंडस्ट्रिज आणि आयटी सर्व्हिस कंपन्यामध्ये त्यांनी मिळवले. साहजिकच व्हिएतनाममध्ये हो चि मिन्ह सिटी या ठिकाणी चेअरमन व्हिएट कॉम बँक फंड, बोर्ड मेंबर – फ्रॅंकलिन टेम्पलटन ॲसेट मॅनेजमेंट, मलेशिया अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या. म्युच्युअल फंडाचे नेतृत्व करणाऱ्या ‘ॲम्फी’ या संस्थेचेसुद्धा ते बोर्ड मेंबर होते.
हेही वाचा >>>Money mantra: वित्तरंजन:‘पॉन्झी’ म्हणजे काय (कोण) रे, भाऊ? (भाग १)
अविनाश सातवळेकर यांनी मुंबई विद्यापीठात बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. नंतर ते अमेरिकेत दि व्हॉर्टन स्कूल युनिव्हर्सिटी पेनसिल्व्हानिया या संस्थेतून एम. बी. ए फायनान्स झाले. १९९६ ला मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून फ्रॅंकलिनला रुजू झाले. फ्रॅंकलिन कर्न्व्हटिबल सिक्युरिटीज फंड मार्च १९९७ ते जून १९९८ पर्यंत सांभाळला. डीएसपी मेरिल लिंच डेट ऑर्गनायझेशन ग्रुप सांभाळला. आणि आता फ्रँकलिन इंडियन ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. फक्त मुख्य कार्यालयात बसून ऑर्डर्स देणारा हा माणूस नाही तर संपूर्ण भारतात कानाकोपऱ्यात जाऊन आलेला हा माणूस आहे. फक्त मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा, एसी रूम्समध्ये व्यवसाय कसा वाढावायचा यांच्या मिटिंग्ज घेण्याऐवजी हा माणूस रस्त्यावरच्या छोट्या चहा टपरीवर उभे राहून चहा पितापिताना निरीक्षण करतो. ‘म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे का ?’ असे चहा टपरीवाल्याला विचारतो. व्यवसाय वाढीचे काम हे असेच खरे!
अविनाश सातवळेकराबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलणे त्यांचे विचार समजून घेणे अतिशय आनंदायी असते. ते, त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा असा तीन पिढ्यांचा इतिहास लिहिता येईल. परंतु तो लिहिण्याचा मोह तूर्त आवरता घेतलेला आहे. मागे टेम्पलटनच्या एका कार्यक्रमात दीपक पारेख यांना बोलावले होते. आणि त्यावेळेस अविनाश सातवळेकर यांचे वडील दीपक सातवळेकर यांच्या एचडीएफसी लिमिटेड तसेच एचडीएफसीची विमा कंपनी यांमधील कामगिरीबद्दलचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख दीपक पारेख यांनी केला होता.
शेवटी टेम्पलटनच्या आयुष्यात एक दुर्दैवी प्रसंग घडला, परंतु ‘सत्य परेशान होता है पराजित नहीं’ या वाक्याची आठवण झाली. प्रसारमाध्यमांत टीका सुरू होती. कायदेशीर कटकटी निर्माण झाल्या होत्या. मोठ्या गुंतवणूकदारांनी मोठा आवाज करण्यास सुरुवात केली होती. अशावेळेस काही वितरक आगीत तेल ओतण्याचे काम करीत होते. अशावेळेस शांत राहणे आणि त्यानंतर नवीन योजना आणून चांगला भरणा गोळा करणे आणि तोसुद्धा संपूर्ण भारतातून, हे काम अविनाश सातवळेकर यांनी करून दाखविले.