मुंबईः अमेरिकी चलनाची वाढती मजबुती आणि परदेशी गुंतवणुकीचे मोठ्या प्रमाणात देशाबाहेर सुरू असलेल्या गमनापुढे रुपयाचा प्रतिकार अपयशी ठरला असून, शुक्रवारच्या सत्रात रुपया आणखी १८ पैशांनी घसरला आणि इतिहासात पहिल्यांदाच त्याने डॉलरच्या तुलनेत ८६.०४चा टप्पा गाठला. चिंतेची बाब म्हणजे रुपयाच्या निरंतर गटांगळीचा हा सलग १० वा आठवडा असून, यातून रिझर्व्ह बँकेकडील परकीय गंगाजळीही वेगाने आटत चालली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मकता याचाही स्थानिक चलनाच्या मूल्यावर विपरीत परिणाम दिसून आला. येत्या २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे विधिवत हाती घेतील आणि नवीन प्रशासनाकडून व्यापाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना योजल्या जाण्याच्या भीतीने देशातही डॉलरची मागणी वाढत असून, जी पर्यायाने अमेरिकी चलनाच्या भक्कमतेस, तर रुपयाच्या दुर्बलतेस कारण ठरत आहे, असे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सूचित केले.

हेही वाचा >>>कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी ‘युरिन टेस्ट’ करण्याचे आदेश; मलेशियन सरकारच्या या निर्णयामागील कारण काय?

आंतरबँक परकीय चलन विनिमयात, शुक्रवारी रुपयाचे ८५.८८ पातळीवर व्यवहार खुले झाले, ८५.८५ असा उच्चांकही त्याने गाठला. मात्र नंतर तेथून गडगडत ८६.०४ या आजवरच्या सर्वात नीचांक पातळीवर तो रोडावला. दिवसअखेर मागील बंद पातळीच्या तुलनेत त्यात १८ पैशांनी घसरण झाली. गुरुवारी देखील रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी वाढून ८५.८६ वर स्थिरावला होता, बुधवारच्या सत्रात मात्र चलनात १७ पैशांची तीव्र घसरगुंडी दिसली होती.

गंगाजळीतही तीव्र घसरण 

नवनवीन नीचांकपद गाठत असलेल्या स्थानिक चलनाचा भारताच्या परकीय चलन गंगाजळीला मोठा फटका बसत असून, ३ जानेवारीला समाप्त आठवड्यात ती ५.६९३ अब्ज डॉलरने घसरून, ६३४.५८५ अब्ज डॉलरवर उतरली, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठा ४.११२ अब्ज डॉलरने घटून ६४०.२७९ अब्ज डॉलरपर्यंत खालावला होता.

गेल्या काही आठवड्यांपासून परकीय चलन साठ्यात निरंतर घट सुरू आहे आणि रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन बाजारात सुरू राहिलेल्या हस्तक्षेपातून ही घसरण वाढत आहे. सप्टेंबरअखेर मध्यवर्ती बँकेकडील परकीय चलन साठा ७०४.८८५ अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर होता, त्या पातळीवरून तो तीन महिन्यांत ७० अब्ज डॉलरहून अधिक गडगडला आहे. गंगाजळीतून डॉलर उपसला जाणे सुरू आहे, बरोबरीनेच युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकी चलनांचे मधल्या काळात झालेले अवमूल्यन हे एकूण चलन मालमत्तेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरले आहे. गंगाजळीतील सुवर्ण साठा मात्र गेल्या आठवड्यात वाढून ६७.०९२ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big concern over rupee falling to 86 against dollar print eco news amy