Share Market Today Updates 4 April 2025 : अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लावल्यानंतर त्याचे पडसाद आता भारतीय शेअर बाजारावर उमटू लागले आहेत. आज बाजार सुरू होताच कोसळला. निफ्टी आणि सेन्सेक्सची सुरुवात ०.२ टक्क्यांनी कमी झाली. तसंच, कोविडनंतर अमेरिकन निर्देशांक डाऊ जोन्स, एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक यांनी गेल्या ५ वर्षांत एकाच दिवशी सर्वांत मोठा तोटा नोंदवला आहे. अमेरिकेच्या संकेतानंतर आशियाई बाजारातही नुकसान झालं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या घोषणेनंतर आज भारतीय देशांतर्गत निर्देशांत सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ५०९.५४ अंकांनी घसरून ७५,७८५.८२ वर पोहोचला, तर निफ्टी १४६.०५ अंकांनी घसरून २३,१०४.०५ वर पोहोचला.
आयटी क्षेत्रात घसरण
अमेरिकेने ३ एप्रिल रोजी आयात शुल्क लागू केले. त्यानंतर आज बाजार उघडल्यानंतर २०२० नंतरचा सर्वात वाईट ट्रेडिंग दिवस मानला जात आहे. यामुळे जागतिक व्यापार युद्ध आणि मंदीची भीती निर्माण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातील आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली आहे. तर, औषध क्षेत्राच्या शेअर्सना आयात शुल्कातून सवलत मिळाल्याने हे शेअर्स जोमात आहेत.
निफ्टीमध्ये या वेळी एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल , एम अँड एम आणि टाटा कंझ्युमर हे प्रमुख वाढलेले शेअर्स आहेत. दुसरीकडे, या वेळी ओएनजीसी, हिंडाल्को, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील हे प्रमुख घसरणीचे शेअर्स आहेत.
व्यापार करावर जगभरातून प्रतिक्रिया
जगभरातील सरकारांनी या व्यापार करावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रमुख व्यापारी भागीदार प्रतिउपायांचा विचार करत आहेत. युरोपियन युनियन, चीन आणि कॅनडा संभाव्य प्रत्युत्तरात्मक शुल्कांचे मूल्यांकन करत आहेत, तर येत्या आठवड्यात राजनैतिक वाटाघाटी तीव्र होण्याची अपेक्षा आहे.