गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मरगळ पाहायला मिळत होती. मात्र आज बाजाराने मरगळ झटकत विक्रमी उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (दि. २३ मे) सकाळी बाजाराची सुरुवात संथगतीने झाली. मात्र त्यानंतर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. बीएसईचा बेंचमार्क इंडेक्स सर्वाधिक उंचीवर गेलेला आज पाहायला मिळाला. बीएसईच्या सेन्सेक्समध्ये आज ११०० अकांची मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक ७५,४०७.३९ वर पोहोचला. तसेच एनएसई निफ्टीमध्ये ३५० अंकाची तेजी पाहायला मिळाली ज्यामुळे निफ्टीचा निर्देशांक २२,९५९.७० वर पोहोचलेला पाहायला मिळाला.
बीएसई सेन्सेक्सने ९ एप्रिल रोजी ७५,१२४ चा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. आज त्याच्याही पुढे जात सेन्सेक्सने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेच्या निकालानंतर बाजारात सर्वोच्च तेजी पाहायला मिळेल, असे सांगतिले जात होते. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काही व्हिडीओ शेअर होत आहेत, ज्यामध्ये ४ जून नंतर बाजारात तेजी दिसेल, अशी माहिती त्यांच्याकडून दिली गेली होती. लोकसभा निकालाला ११ दिवसांचा कालावधी बाकी असतानाच बाजाराने आज नवा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसले.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने मंदीचे चित्र दिसत होते. आज सकाळी बाजराची सुरुवात संथगतीने झाली. मात्र दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये ७८१.३६ अंकाची वाढ होऊन १.०५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आणि निर्देशांक ७५,०१३.३४ वर पोहोचला. तसेच निफ्टीनेही आज नवा उच्चांक गाठला. एनएसई निफ्टीमध्ये १.०२ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि २४० अंकाची वाढ होऊन निफ्टी निर्देशांक २२,८४१.६५ वर पोहोचला.
काही काळानंतर सेन्सेक्सची वाढ कायम राहिली आणि अखेर २२५.०६ अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ७४.४५६.४४ वर तर निफ्टीचा निर्देशांक ७७.५० अंकानी वाढून २२.६७५.३० वर पोहोचला.