प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी शेअर बाजारात गडबड होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती त्यांनी केली आहे. शेअर बाजारात सध्या जी तेजी दिसत आहे, ती हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या युगाची पुनरावृत्ती असू शकते, असेही ते म्हणाले आहेत. एक्सवर पोस्ट टाकून हर्ष गोयंका यांनी हे मतप्रदर्शन केले. मात्र त्यांच्या या मतावर काहीजणांनी टीका केली आहे.
हर्ष गोयंका काय म्हणाले?
हर्ष गोयंका यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “प्रमोटर कंपन्यांचा नफा वाढवून दाखवत आहेत. गुजराती-मारवाडी ब्रोकरांना हाताशी धरून शेअर्सच्य किंमतीना अवास्तव स्तरावर नेले जात आहे. आता वेळ आली आहे की, सेबी आणि अर्थ मंत्रालयाने यात हस्तक्षेप करावा आणि छोट्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होण्यापासून वाचवावे.” ३ मे रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाल्यानंतर हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट टाकली होती. त्यादिवशी सेन्सेक्समध्ये जवळपास १००० अंकाची घसरण होऊन ७४ हजाराच्या खाली निर्देशांक पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांकही २०० अंकांनी घसरला होता.
माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार, हर्ष गोयंका यांच्या पोस्टनंतर शनिवारीही बाजारात घसरण पाहायला मिळाली. तर काही ट्रेडर्सच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर सरकार बदलण्याचे संकेत दिसत असल्यामुळे प्राप्तिकर रचनेत बदल होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. त्याचाही परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारण यांनी मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून या फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे.
हर्ष गोयंका यांच्या दाव्यावर काही एक्स युजर्सनी टीका केली आहे. एका युजरने म्हटले की, श्री. हर्ष गोयंका याआधीही तुम्ही याआधीही चिथावणी देणाऱ्या पोस्ट आणि व्यंगचित्र पोस्ट केलेले आहेत. त्याबद्दल तुमच्यावर टीकाही झाली होती. जेव्हा तुम्ही महेंद्रसिंह धोनीला अपमानित करण्याचा प्रयत्न केलात, तेव्हाही तुमच्यावर अनेकांनी टीका केली. आता तुम्ही गुजराती आणि मारवाडी लोकांबाबत जे निराधार आणि बेजबाबदार टिप्पणी केली आहे, त्यावर भीती निर्माण करणारे विधान करत आहे. तुम्ही सतत भडकाऊ विधाने करतात, त्यावर तुम्ही काम करणे गरजेचे आहे.
हर्षद मेहताचा घोटाळा काय होता?
९० च्या दशकात हर्षद मेहताच्या घोटाळ्यामुळे शेअर मार्केट गडगडले होते. हर्षद मेहता एक सामान्य शेअर ब्रोकर होता. मात्र बँकिंग व्यवस्थेमधील त्रुटीचा फायदा उचलून त्याने शेअर बाजारात गडबड केली होती. बँकेकडून पैसे उचलून हर्षद मेहताने काही शेअरच्या किंतमी कृत्रिमरित्या वाढविल्या होत्या. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी या कंपन्यात पैसा गुंतविला. जेव्हा हा घोटाळा बाहेर आला, तेव्हा सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.