लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः स्थानिक भांडवली बाजाराकडे पाठ करून वेगाने माघारी परतत असलेल्या परकीय गुंतवणूकदार संस्थांचे (एफआयआय) पाय पुन्हा वळताना दिसत असून, त्यांच्या गुंतवणुकीने डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यात (१३ डिसेंबरपर्यंत) तब्बल २२,७६६ कोटी रुपयांची नक्त खरेदी केल्याची दिलासादायी आकडेवारी पुढे आली आहे.
सरलेल्या शुक्रवारी सेन्सेक्स-निफ्टीच्या एक टक्क्यांच्या उसळीत, परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या २,३३५.३२ कोटी रुपये मूल्याच्या समभाग खरेदीचेही योगदान राहिले. मुख्यतः लार्ज कॅप श्रेणीतील, माहिती-तंत्रज्ञान व वित्तीय क्षेत्रातील समभागांची ते खरेदी करत आहेत. आधीच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी तब्बल सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारांतून काढून घेतली असून, सलग सत्रात निर्देशांकांच्या पडझडीच्या कटू आठवणी गुंतवणूकदारांच्या मनांत त्यामुळे अजूनही ताज्या आहेत.
तथापि अमेरिकेत अर्थव्यवस्थेत सुधारणेसह, तेथील मध्यवर्ती बँकेने सुरू केलेले व्याजदर कपातीचे चक्र यापुढेही सुरू राहण्याच्या आशा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भारतातही चलनवाढीच्या आघाडीवर चित्र दिलासादायी बनले असून, फेब्रुवारीत किंवा त्या आधीच रिझर्व्ह बँकेकडून व्याजाचे दर कमी केले जातील, असे बहुतांश विश्लेषकांचे कयास आहेत. हे घटक स्थानिक बाजारात तेजीस मदतकारक ठरत आहेत. त्यामुळे परंपरेने वर्षसांगतेला नाताळ सणाला विदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या खरेदीने बाजारात तेजीचा सूर दुमदुमण्याच्या आशा बळावल्या आहेत. त्यामुळे यंदा नाताळात सांता बाबा गुंतवणूकदारांसाठी आनंदाचा नजराणा घेऊन येईल असे बोलले जात आहे.
हेही वाचा >>>ढासळत्या रुपयातून चलन गंगाजळीला खड्डा; उच्चांकी पातळीपासून ५० अब्ज डॉलरची घट
जागतिक मलूलतेत ‘सेन्सेक्स’ला गळती
सोमवारी सप्ताहारंभीच्या सत्रात मात्र अमेरिकी मध्यवर्ती बँकेचा व्याज दरासंबंधाने निर्णय अपेक्षित असताना, जगभरात दिसून आलेले सावध व्यवहारांचे प्रतिबिंब स्थानिक बाजारातही उमटले. परिणामी अत्यंत क्षीण स्वरूपाच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स आणि निफ्टी असे दोन्ही निर्देशांक नकारात्मक पातळीवर स्थिरावले.
पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांचे अनुकरण करीत, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने घसरणीनेच सुरुवात केली आणि दिवसअखेरीस तो ३८४.५५ अंशांच्या (०.४७ टक्के) नुकसानीसह ८१,७४८.५७ वर बंद झाला. एकेसमयी हा निर्देशांक शुक्रवारच्या बंद स्तराच्या तुलनेत ५८१ अंशांनी घरंगळला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १००.०५ अंशांच्या (०.४० टक्के) तोट्यासह २४,६६८.२५ या पातळीवर दिवस सरताना बंद झाला.
बाजार घसरणीत असतानाही, सेन्सेक्समधील इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, महिंद्र ॲण्ड महिंद्र आणि ॲक्सिस बँक या समभागांचे मूल्य गुंतवणूकदारांकडून खरेदी झाल्याने वधारले. दुसरीकडे टायटन, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सीमेंट, टीसीएस, एनटीपीसी, भारती एअरटेल, टेक महिंद्र, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि जेएसडब्ल्यू स्टील हे आघाडीचे समभाग गडगडले.