माणसाने सनदी लेखापाल झाल्यावर काय करावे तर, चक्क भांडवली बाजारात उडी घेत खोऱ्याने पैसा ओढायचे असे एक समीकरणच एके काळी देशात होते. त्यात मुंबईची मुले जरा जास्तीच हुशार. कारण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यांना अगदीच जवळ आणि मुंबईची भौगोलिक माहितीसुद्धा त्यांना अर्थात जास्त आहे. केतन पारेख त्याला काही अपवाद नव्हता. हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस येण्याआधी गगनाला भिडणारे ‘मार्केट’त्यांना खुणावत होते. काहींनी या संधीचे सोने केले तर काहींनी सोन्याची माती. वडिलांचा दलाली पेढीचा (ब्रोकिंग) धंदा केतन पारेखने पुढे चालवला चांगला असता तरी उत्तम होते. मात्र त्याने फक्त वडिलांकडून प्रेरणा घेतली आणि आपली कारकीर्द सुरू केली ती चक्क हर्षद मेहतांच्या कंपनीमध्ये काम करून. त्या घोटाळ्यातसुद्धा त्याच्यावर आरोप झाले पण तो त्यातून सहीसलामत बाहेर पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आपण जो घोटाळा बघणार आहोत तो वर्ष २००१ च्या प्रसिद्ध घोटाळ्यापेक्षा वेगळा आहे. ज्याची माहिती आपण पुढील काही भागांमध्ये घेऊ. हा घोटाळा घडला वर्ष १९९२ मध्ये पण त्याची शिक्षा वर्ष २००८ मध्ये सुनावली गेली. मात्र हाच निकाल लवकर लागला असता तर कदाचित वर्ष २००१ आणि त्याच्या आसपास जे गुन्हे केतन पारेखने घडवले ते घडलेही नसते. कॅनफिनाचा घोटाळा तसा फार सोपा होता आणि आज विचार केला तर अगदीच बाळबोध वाटेल अशी त्याची कार्यपद्धती होती.

हेही वाचा – शेअर बाजारातील तेजीला पूर्णविराम की तूर्त स्वल्पविराम?

हेही वाचा – तीन दिवसांच्या घसरणीनंतर आता शेअर बाजार सावरला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ

बेंगळुरू स्थित कॅनरा बँक फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे कॅनफिनामधून मुंबई स्थित कॅनरा बँक म्युच्युअल फंडामध्ये मोठी रक्कम पाठवण्यात आली. ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी वापरण्यात येणार होती, पण झाले भलतेच की, ही रक्कम केतन पारेख आणि त्यांच्या साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आली. केतन पारेखने रक्कम समभाग घेण्यात वापरली. मग वर्षा अखेरीस ती परत देखील केली. पण मधल्या काळात बरीच बोंबाबोंब झाली होती आणि पोलीस तपासदेखील सुरू झाला होता. सुमारे ४७ कोटी रुपये अशा पद्धतीने वळवण्यात आले होते. त्या वेळेला दुसऱ्याचे पैसे वापरून समभाग घ्यायचे आणि त्यातून नफा कमवायचा ही घोटाळेबाजांची पद्धत होती. केतन पारेख आणि त्यांच्या साथीदारांना या गुन्ह्यात सहा महिने आणि काहींना अधिक अशी शिक्षा झाली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरेच होते, कारण वर्ष २००१ मध्ये यापेक्षा कित्येक पटींनी मोठा घोटाळा उघडकीस येणार होता.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canfina scam and ketan parekh print eco news ssb
Show comments