अजय वाळिंबे
शतकभरापूर्वी म्हणजे १९२३ पासून बहुराष्ट्रीय कंपनी ‘एसकेएफ’ने भारतात आपला व्यवसाय चालू केला. आज एसकेएफ इंडिया आपल्या बेअरिंग्ज तसेच युनिट्स, सील, मेकट्रॉनिक्स, ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स आणि उत्पादन संलग्न या पाच तंत्रज्ञान-केंद्रित प्लॅटफॉर्ममार्फत ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी कंपन्यांना सेवा प्रदान करते. आज एसकेएफ भारतातील केवळ एक अग्रगण्य बॉल बेअरिंग उत्पादक कंपनी नसून माहिती प्रदान (नॉलेज ड्रिव्हन) करणारी आघाडीची इंजिनीयरिंग कंपनी मानली जाते. एसकेएफ वाहन उद्योग तसेच एरोस्पेस, रेल्वे, मायनिंग, बांधकाम, मशीन टूल्स, तेल आणि वायू इ. विविध औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना फ्रिक्शन रिडक्शन, ऊर्जा कार्यक्षमता तसेच उपकरण दीर्घकाळ कार्यक्षम आणि विश्वासार्ह राखण्यासाठी शाश्वत मार्ग प्रदान करते. संशोधनाधारित नवोपक्रमासाठी कंपनी आपल्या पाच तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मतर्फे व्हॅल्यू ॲडेड सोल्यूशन्स प्रदान करते.
हेही वाचा >>> पोर्टफोलियो’ची बांधणी
एसकेएफचे भारतभरात सहा उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी पुणे, बंगळूरु आणि हरिद्वार येथे मुख्य उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीची १२ कार्यालये असून आपल्या उत्पादन वितरणासाठी ३०० हून अधिक वितरकांचे पुरवठादार नेटवर्क आहे. भारतात कंपनी एसकेएफ इंडिया आणि आपली उपकंपनी एसकेएफ इंजिनीयरिंग ॲण्ड लुब्रिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमधून आपले कार्य एकत्रित करते.
एसकेएफचे डिसेंबर २०२२ साठीच्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी १,०७७.२० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११६.६७ कोटी रुपयांचा नक्त नफा तिने कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढाल ११ टक्क्यांनी जास्त असून नक्त नफा ३१ टक्क्यांनी अधिक आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या ‘एसकेएफ’ने गेल्या पाच वर्षांत नफ्यात सरासरी १० टक्के वाढ केली असून, भांडवलावरील परताव्याचा दर (आरओई) १८ टक्के कायम ठेवला आहे. सध्या ४,३०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर अनिश्चित काळात आणि प्रत्येक मंदीत खरेदी करावा असाच आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ‘एसकेएफ’ उत्तम परतावा देऊ शकेल.
हेही वाचा >>> क… कमॉडिटीचा : जिरे २०२३ मध्ये अधिक ‘खमंग’ होणार?
सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
एसकेएफ इंडिया लिमिटेड
(बीएसई कोड ५००४७२)
प्रवर्तक: एबी एसकेएफ, स्वीडन
बाजारभाव: रु. ४,४५५/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बेअरिंग्स, इंजिनीयरिंग
भरणा झालेले भागभांडवल: रु. ४९.४४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५२.५८
परदेशी गुंतवणूकदार ६.४८
बँकस्/ म्युचुअल फंडस्/ सरकार २८.९७
इतर/ जनता ११.९७
पुस्तकी मूल्य: रु. ४२५
दर्शनी मूल्य: रु.१० /-
गतवर्षीचा लाभांश: १४५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १०३.४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४३.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४०.८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ३०.६
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३७०
बीटा: ०.७
बाजार भांडवल: रु. २२,०५५ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५,१७५/ २,९८१
stocksandwealth@gmail.com