अजय वाळिंबे
वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड ही रस्ता अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम कंपनी (ईपीसी) क्षेत्रातील एक अग्रगण्य बांधकाम कंपनी आहे. कंपनीला भारतातील १६ हून अधिक राज्यांमधील विविध रस्ते/महामार्ग प्रकल्पांच्या डिझाइन आणि बांधकामाचा अनुभव आहे. कंपनीचा व्यवसाय ऑपरेशन्स चार श्रेणींमध्ये विभागलेला आहे:
अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) आणि रस्ते आणि महामार्ग, पूल, विमानतळ धावपट्टी, रेल्वे, मेट्रो, पॉवर ट्रान्समिशन आणि टनेलिंगसाठी प्रकल्प व्यवस्थापन सेवा
बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर (बीओटी) आणि हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (एचएएम) तत्त्वावर रस्ते आणि महामार्गांचा विकास, संचालन आणि देखभाल
बिटुमन प्रक्रिया, थर्माप्लास्टिक रोड-मार्किंग पेंट, रोड साइनेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी उत्पादन
गॅल्वनाइज्ड मेटल क्रॅश बॅरियर्स आणि ओएचई मास्टची निर्मिती.
कंपनी प्रामुख्याने रस्ते क्षेत्रातील रस्ते प्रकल्पांची रचना, ईपीसी आणि बीओटी (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर) तत्त्वावर नागरी बांधकाम प्रकल्प हाती घेते. जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सचा नागरी बांधकामाचा मुख्य व्यवसाय असून तिचा महसुलाचा वाटा ९० टक्के आहे. त्यात रस्ते क्षेत्रातील ईपीसी, बीओटी (बिल्ड, ओपरेट आणि ट्रान्सफर) तसेच एचएएम प्रकल्प आणि रेल्वे, मेट्रो, विमानतळ धावपट्टी आणि ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्पांमधील ईपीसी प्रकल्पांचा समावेश आहे. रस्ते बांधणीव्यतिरिक्त, कंपनीने विविधीकरण धोरणाचा एक भाग म्हणून पॉवर ट्रान्समिशन व्यवसायातही प्रवेश केला आहे. आज कंपनीमध्ये १७,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
उत्पादन सुविधा: कंपनीचे राजस्थान, आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये बिटुमन, थर्माप्लास्टिक रोड-मार्किंग पेंट आणि रोड साइनेज, मेटल क्रॅश बॅरियर्स आणि इलेक्ट्रिक पोल तयार करण्यासाठी गुजरातमध्ये एक फॅब्रिकेशन आणि गॅल्वनायझेशन युनिट प्रक्रिया करण्यासाठी तीन उत्पादन सुविधा आहेत. जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सचे इंटिग्रेटेड इन-हाऊस कन्स्ट्रक्शन मॉडेल असून कंपनीकडे ७,००० हून अधिक बांधकाम उपकरणे आणि वाहने आहेत. हॉट मिक्स प्लांट्स, सॉइल स्टॅबिलायझर्स, मोबाइल कोल्ड रिसायकलिंग मिक्सिंग प्लांट्स आणि सिमेंट स्प्रेडर्स यांसारखी विशेष बांधकाम उपकरणे देखील कंपनीकडे आहेत. त्यामुळे कंपनीबाहेरील उपकरण पुरवठादारांवर कमी अवलंबून आहे आणि प्रकल्प अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने आणि वेळेवर होतात.
जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सचे यंदाच्या आर्थिक वर्षाचे पहिल्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवून ९,४८२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,४५४.४३ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. ३१ मार्च २०२३ पर्यंत, कंपनीची ऑर्डर बुक १९,५२९ कोटी रुपये आहे. यामध्ये रस्ते, ईपीसी प्रकल्प, एचएएम प्रकल्प आणि मेट्रो/ रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीला नुकतेच उत्तर प्रदेशचे ७४ किलोमीटरच्या चार पदरी महामार्गाचे सुमारे ७३७ कोटीचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीकडे वेळापत्रकाच्या आधी प्रकल्प पूर्ण करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. कंपनीच्या ९० टक्के ऑर्डर केंद्र सरकारच्या एजन्सींकडून आहेत, ज्यामुळे जोखीम कमी होते.
दोन वर्षांपूर्वी कंपनीचा ८३७ रुपये प्रति शेअर किमतीने ‘आयपीओ’ आला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळून १०२ पटीने भरणा झाला होता. सध्या १,३०० रुपयांच्या आसपास असलेला आर इन्फ्राप्रोजेक्टचा शेअर, अनुभवी प्रवर्तक, मोठे ऑर्डर बुक आणि उत्तम ट्रॅक रेकॉर्ड असल्याने एक दीर्घकालीन उत्तम खरेदी ठरू शकते.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्यप्प्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड
(बीएसई कोड ५४३३१७)
प्रवर्तक: विनोदकुमार अगरवाल
बाजारभाव: रु. १३२५ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : ईपीसी/ बांधकाम
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ४८.३४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७९.७४
परदेशी गुंतवणूकदार ०.५९
बँक्स/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १६.१४
इतर/ जनता ३.५३
पुस्तकी मूल्य: रु. ६४८
दर्शनी मूल्य: रु. ५/-
गतवर्षीचा लाभांश: — %
प्रति समभाग उत्पन्न: रु.१५०.४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.८१
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.७
इंटरेस्ट कवरेज गुणोत्तर: ५.४१
रिटर्न ऑन कॅपिटल : २१.७
बीटा: ०.५
बाजार भांडवल: रु. १२,८१३ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,४४६ / ९३०
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
अजय वाळिंबे /stocksandwealth@gmail.com