-अजय वाळिंबे
‘ग्रामीण फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ॲलेक्स काउंट्स यांच्या ‘गिव्ह अस क्रेडिट’ या पुस्तकाने प्रेरित होऊन विनाथा एम.रेड्डी यांनी डिसेंबर १९९६ मध्ये क्रेडिट ॲक्सेस ग्रामीणची संकल्पना मांडली होती. नोबेल पारितोषिक विजेते बांग्लादेशी अर्थतज्ज्ञ आणि प्राध्यापक मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स) चळवळीदरम्यान लहान कर्जवाटपाच्या माध्यमातून स्वतःला गरिबीतून बाहेर काढणाऱ्या बांगलादेशातील गरिबांच्या उल्लेखनीय कथा या पुस्तकात तपशीलवार आहेत. संस्थेची स्थापना १९९९ मध्ये दक्षिण बेंगळूरु येथील टी. मुनिस्वामप्पा ट्रस्ट (टीएमटी) या स्वयंसेवी संस्थेच्याअंतर्गत एक प्रकल्प म्हणून करण्यात आली.
भारतीय अर्थव्यवस्थेला अनुसरून संस्थेने ग्रामीण बँकेच्या सूक्ष्म आणि लघुवित्तविषयक समूह कर्ज पद्धतीचे कामकाज सुरू केले. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी समान संधी आणि सर्वसमावेशक विकास निर्माण करण्याच्या उद्देशाने आर्थिक पिरॅमिडच्या तळागाळातील महिलांना संपार्श्विक मुक्त कर्ज तसेच इतर सेवा देऊ केल्या. या कामासाठी संस्थेने आर्थिकदृष्ट्या साक्षर महिला उद्योजकांचा एक सक्षम वर्ग तयार केला.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : नवयुगातील अपरिहार्य ‘ऑटो-सक्षम’ गुंतवणूक
वर्ष २००७ मध्ये ही सूक्ष्म वित्त स्वयंसेवी संस्था (एनजीओ) असलेल्या क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण या नोंदणीकृत संस्थेला बॅंकेतर वित्तीय सेवा देणाऱ्या (एनबीएफसी) कंपनीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. कंपनीची प्रवर्तक कंपनी ‘क्रेडिट ॲक्सेस इंडिया बीव्ही’ ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
आज क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण ही भारतातील एक प्रमुख आणि आघाडीची बॅंकेतर वित्तीय सेवा देणारी कंपनी असून ती प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला ग्राहकांना सूक्ष्म कर्ज (मायक्रो फायनान्स) देण्यावर लक्ष केंद्रित करते. बंगळूरुमध्ये मुख्यालय असलेल्या क्रेडिट ॲक्सेस ग्रामीणच्या १६ राज्यांमधील ३६४ जिल्ह्यांमध्ये १,८७७ शाखा आहेत. कंपनी तिच्या ग्राहकांमध्ये ‘ग्रामीण कूटा’ म्हणून प्रसिद्ध आहे. कंपनीतर्फे सर्वात कमी दरामध्ये ग्राहकांना अनेक वित्तीय उत्पादने आणि सेवा प्रदान केल्या जातात. सदस्य म्हणून नावनोंदणी केलेल्या आणि संयुक्त दायित्व गट म्हणून संघटित झालेल्या महिलांना सूक्ष्म कर्ज सेवा प्रदान करते. सदस्यांना काही इतर आर्थिक उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी कंपनी डिजिटल वितरण माध्यम वापरते.
क्रेडिट ॲक्सेस ग्रामीणचे पहिल्या सहामाहीचे आणि दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून, अपेक्षेप्रमाणे कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. या तिमाहीच्या कालावधीत कंपनीने ५१ नवीन शाखा सुरू केल्या असून कंपनीच्या ग्राहकांत ३.३६ लाखांची भर पडली आहे. सप्टेंबर २०२३ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,२४७ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर (गेल्या आर्थिक वर्षात ८१२ कोटी) ३४७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ९८ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे नक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाणही कमी होऊन केवळ ०.२४ टक्क्यांवर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने अपरिवर्तनीय रोख्याद्वारे ९९० कोटी रुपयांची निधी उभारणी केली. कंपनीच्या एकूण कर्ज वितरणापैकी ९४ टक्के कर्जवाटप हे उत्पन्न निर्मिती कर्ज या गटातील आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण तसेच निमशहरी भागात कंपनीचे उत्तम नेटवर्क असून कंपनीची कर्ज वसुली देखील उत्तम आहे. अनुभवी आणि सक्षम प्रवर्तक असलेली क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण आगामी कलावधीत इतर राज्यातही आपले लक्ष केंद्रित करत आहे. ४६ व्यावसायिक बँका, ३ वित्तीय संस्था आणि १६ परदेशी संस्थांकडून कर्ज उभारणी करून कंपनी आपली कर्ज घेण्याचा किंमत-खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो: ‘प्रेस्टिज’ला कसे नाकारता येईल?
पाच वर्षांपूर्वी कंपनीने ४२२ रुपये प्रतिसमभाग किमतीने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) केली होती. ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओच्या माध्यमातून मिळवलेले समभाग अजून ठेवले असतील त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगला परतावा दिसत असेल. मात्र कंपनीची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता अजूनही यामधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा समभाग सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण ठेवावे.
क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड
(बीएसई कोड ५४१७७०)
प्रवर्तक : क्रेडिट ॲक्सेस इंडिया बीव्ही
बाजारभाव: रु. १६९९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : सूक्ष्म वित्त
भरणा झालेले भागभांडवल: रु. १५९.११ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६६.६९
परदेशी गुंतवणूकदार ११.४६
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १५.७८
इतर/ जनता ६.०७
पुस्तकी मूल्य: रु. ३६४/-
दर्शनी मूल्य: रु.१०/-
लाभांश:– %
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७५.७४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.४
ढोबळ/ नक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाण:०.७७% / ०.२४%
कॅपिटल ॲडीक्वसी गुणोत्तर: २५%
नेट इंट्रेस्ट मार्जिन: १३.१%
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): १२.१
बीटा : ०.५
बाजार भांडवल: रु. २७,०४४ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७१५/८३४
Stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.