लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने, सोमवारी चढ-उतारांसह अस्थिरतेने ग्रासलेल्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी माफक वाढीसह बंद झाले. येत्या आठवड्यात जाहीर होत असलेल्या तीन मध्यवर्ती बँकांचे पतविषयक धोरण एकंदर बाजारासाठी अग्निपरीक्षेचेच ठरेल, हेच सोमवारच्या व्यवहारांनी दाखवून दिले.

निरंतर सुरू राहिलेल्या वध-घटीनंतर, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०४.९९ अंशांनी (०.१४ टक्के) वाढून ७२,७४८.४२ वर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी १४ समभागांमध्ये मूल्य वाढ झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ३२.५५ अंशांनी (०.१५ टक्के) वाढून २२,०५५.७० वर बंद झाला. या निर्देशांकातही सामील ५० पैकी २१ समभाग वधारले, तर २९ घसरणीसह बंद झाले.  

हेही वाचा >>>लाचखोरीप्रकरणी अमेरिकी सरकारच्या चौकशीचे वृत्त;‘अदानी’च्या सर्व समभागांना गळती

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा वाटा रााहिला. हा समभाग दिवसाच्या नीचांकी पातळीपासून तब्बल दीड टक्क्यांची उसळी घेत, २,८७८.९५ रुपयांवर दिवसअखेरीस स्थिरावला. सेन्सेक्समधील समभागांमध्ये टाटा स्टील सर्वाधिक ५ टक्क्यांनी वाढला. तर महिंद्र अँड महिंद्र, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे, अमेरिकी बाजारातील व्याजदराच्या चिंतेने माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये घसरण झाली. इन्फोसिस सर्वाधिक १.९९ टक्क्यांनी घसरला, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले यांनीही घसरण नोंदवली.

हेही वाचा >>>Sensex Today: सेन्सेक्सची गटांगळी, १००० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचं १४ लाख कोटींचं नुकसान!

सकारात्मक पातळीवर राहिलेल्या आशियाई बाजारांचे अनुकरण स्थानिक बाजाराने सुरुवात वाढीसह केली होती. पण उत्तरोत्तर अस्थिरता वाढत गेली. म्युच्युअल फंडाच्या स्मॉल आणि मिड कॅप योजनांच्या ताण चाचण्यांचे आलेले विपरित निकाल पाहता, बाजारात नकारात्मक सूर डोके वर काढतच होता. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांचे ताणलेले मूल्यांकन ही चिंतेची बाब असून, या अंगाने नियामकांकडून काही निर्देश येण्याआधीच आवश्यक दुरूस्त्या बाजार प्रेरणेतूनच सुरू असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख, विनोद नायर यांनी सांगितले.  

चालू आठवड्यात, जागतिक मध्यवर्ती बँका म्हणजे अमेरिकी फेड, बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंड यांच्या व्याजदरासंबंधी महत्त्वपूर्ण बैठका होत असून, त्यांचे संभाव्य निर्णय हे बाजाराची दिशा ठरवतील. अमेरिकी फेडद्वारे व्याजदर कपात ही कदाचित २०२४ च्या उत्तरार्धात केली जाणे अपेक्षित असले तरी बुधवारच्या बैठकीअंती (भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री) त्यासंबंधाने ठोस संकेत अपेक्षिले आहेत, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credit policies of three central banks are important for the stock market print eco news amy