‘क कमॉडिटीचा…’ या स्तंभातून यापूर्वी दोन वेळा जिरे या मसाला कमॉडिटीबाबत लिहिले गेले असून वाचकांना आणि जिरे ग्राहकांना या वस्तूच्या किमतीमध्ये येऊ घातलेल्या अभूतपूर्व तेजीची आगाऊ कल्पना दिली होती. घाऊक बाजारात १५० ते १८० रुपये प्रति किलोग्रॅम असलेले जिरे प्रथम ३५० रुपये प्रति किलोग्रॅम आणि नंतर ५०० रुपये प्रति किलोग्रॅम ही पातळी ओलांडेल हे अंदाज दिलेल्या वेळेपूर्वीच खरे ठरले. फेब्रुवारीमधील लेखात जिरे नोव्हेंबरमध्ये ४०,००० रुपये प्रति क्विंटल होईल असे म्हटले होते. ते लक्ष्य एप्रिलमध्येच पूर्ण झाले. तर एप्रिलमध्ये डिसेंबरपर्यंत ५०,००० रुपये प्रति क्विंटलचे लक्ष्य दिले ते पुढील दोन महिन्यांत पूर्ण झाले. नंतर सप्टेंबरमध्ये जिरे एकवेळ ६५० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत जाऊन पोहोचले. घाऊक किमतीचा परिणाम किरकोळ बाजारात एक-दोन महिने उशिरा येतो. त्यामुळेच चांगल्या दर्जाचे जिरे ऐन दिवाळीच्या म्हणजेच सणोत्सवाच्या काळात किरकोळ बाजारात किमान ८०० रुपये किलो या भावात विकले जात आहे. कांदा-टोमॅटोप्रमाणे मसाला पदार्थांची महागाई सहज लक्षात येत नाही. मात्र केवळ ८-१० महिन्यांत जिरे तिप्पट होणे ही नेहमीची घटना नव्हती.
बाजाराच्या नियमाप्रमाणे एवढी मोठी तेजी झाल्यावर पुढील वर्षी मंदीला सुरुवात होते. याचा अनुभव आपण मागील काळात गवार-बी, मेंथा ऑइल, धणे किंवा सोयाबीन आणि कापूस या पिकांमध्ये घेतला आहे. तशीच परिस्थिती या रब्बी हंगामात जिरे या कमॉडिटीमध्ये येईल अशी चिन्हे आहेत. चिन्हे एवढ्यासाठी की मंदीसाठी सर्व घटक एकत्र आले असले तरी, आले देवाजीच्या मना म्हणून जर हवामानाने मागील वर्षाप्रमाणे दगा दिला तर मंदी होईलच याची शाश्वती नाही. मात्र तेजीला नक्कीच लगाम राहील. याची आगाऊ कल्पना मागील महिन्याभरातील बाजारकलावरून आली आहे.
हेही वाचा… काव्यातील कलाकुसर
वायदे बाजारात जिऱ्याने सर्व तज्ज्ञांच्या अनुमानापेक्षाही ५,००० रुपये अधिक म्हणजे ६५,००० रुपये (प्रति क्विंटल) ही पातळी गाठल्यावर किमतीमध्ये जोरदार घसरण सुरू झाली आहे. एकवेळ किंमत ४०,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरली होती. परंतु आठवडाअखेर जिरे वायदे ४३,००० रुपयांवर स्थिर झाले आहे. तर मार्च महिन्याचे वायदे, म्हणजे नवीन जिरे बाजारात येईल तो काळ, ३७,००० रुपये या पातळीवर बंद झाले आहेत. एकप्रकारे मार्च वायदे पुढील काळात बाजारकल कसा राहील याचे द्योतक मानले जातात. त्यातून आतापर्यंत असलेला मंदीचा कल स्पष्ट होत आहे.
हेही वाचा… माझा पोर्टफोलियो : सूक्ष्म वित्त क्षेत्रातील अग्रणी- क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड
फेब्रुवारीत २५,००० हजार रुपये प्रति क्विंटलवरून एप्रिलमध्ये ३८,००० रुपये आणि नंतर सप्टेंबरमध्ये ६५,००० रुपये प्रति क्विंटल अशी मोठी झेप घेणाऱ्या जिऱ्यातील तेजीची कारणे आपण पाहूया. २०१९ मध्ये जिरे उत्पादन ५.२५ लाख टन होते. ते पुढील दोन वर्षांत ३ लाख टन आणि ३.१० लाख टनांपर्यंत कमी झाले असावे, अशी संस्थात्मक अनुमाने सांगतात. म्हणून वर्ष २०२२ पासून भाव वाढू लागले. २ लाख टन अशा विक्रमी निर्यातीचादेखील तेजीला मोठा फायदा झाला. त्यामुळे वर्ष २०२२-२३ मधील हंगामात लागवड वाढली. त्यामुळे उत्पादन वाढेल ही अपेक्षा होती, परंतु अत्यंत वाईट हवामानामुळे जिरे उत्पादनात सतत दुसऱ्या वर्षी घट आली. यामुळे देशांतर्गत साठे संपून पुरवठा खूपच कमी झाला. जिऱ्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ८० टक्के असल्यामुळे पुरवठ्यातील तूट भरून काढणे शक्य नव्हते. परिणामी, किमतीमध्ये अभूतपूर्व तेजी अनुभवायला मिळाली.
हेही वाचा… बाजारातली माणसं : कंपन्यांवर हल्ले करणारा लुटारू?
मंदीपूरक परिस्थिती
अचानक सुरू झालेल्या मंदीची कारणे कुठली याचा आपण आढावा घेऊया. वर म्हटल्याप्रमाणे साहजिकच एवढ्या तेजीमुळे येत्या रब्बी हंगामात शेतकरी जिरे पेरणीला प्राधान्य देणार. राजस्थान आणि गुजरात ही देशातील प्रमुख जिरे उत्पादक राज्ये असून प्राथमिक अंदाजानुसार राजस्थानात जिरे पेरणी ही निदान ३० ते ४० टक्के अधिक होईल, असे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांनी म्हटले आहे. तर गुजरातमध्ये जिरे लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ होईल असा अंदाज आहे. काढणीच्या वेळी जिरे २८,००० रुपये प्रति क्विंटल राहिले तरीदेखील सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकेल. अर्थात याचा थोडा फटका इतर पिकांच्या पेरणी क्षेत्राला बसेल हे निश्चित आहे. विशेष करून धणे या पिकाला याचा अधिक फटका बसू शकेल. कारण या दोन्ही राज्यांत नेहमीच जिरे आणि धणे या दोन मसाला पिकांमध्ये स्पर्धा असते. मागील हंगामात धणे नरम राहिल्यामुळेच यावेळी पेरण्या कमी होतील असा अंदाज आहे.
हेही वाचा… बाजाररंग : निकालांची सुगी आणि बाजाररंग
पेरणी क्षेत्रातील वाढीबरोबरच हवामान सर्वसाधारण राहिले तर उत्पादकतादेखील चांगलीच वाढेल. या गोष्टी जमेस धरता जिरे उत्पादन यावर्षी ५.५० लाख ते ६ लाख टन होईल असे प्राथमिक अनुमान आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. जिरे हे हवामानाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील पीक आहे. अधिक उष्ण हवामान किंवा यावेळी पाऊस या दोन गोष्टींचा विपरीत परिणाम या पिकावर होत असतो. याचा अनुभव मागील दोन्ही हंगामात घेतला आहे. त्यामुळे जिरे व्यापाऱ्यांना पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये बारीक लक्ष ठेवावे लागते. यावर्षी एकंदरीत कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील इतर पिके धोक्यात आली असली तरी, जिरे उत्पादक प्रदेशामध्ये अशा प्रकारची कुठलीच परिस्थिती नाही. मुळात जिरे पिकाला फार पाण्याची गरजही नसते. त्यामुळेदेखील जिरे लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास थोडी मदतच होईल. एकंदरीत पाहता जिरे उत्पादन वाढण्यास अनेक घटक कारणीभूत झाले आहेत. त्यामुळेच मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किमतीचा विचार केल्यास वर म्हटल्याप्रमाणे जिरे किरकोळ बाजारात सध्या ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो असले तरी दिवाळीसाठी असलेली मागणी आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे हळूहळू किरकोळ बाजारदेखील खाली येऊ लागतील. किमती बऱ्यापैकी नरम झाल्यामुळे एवढे दिवस जेमतेम होत असलेली निर्यात आता थोडा वेग घेईल. त्याचा परिणाम अजून एक महिना राहून किमतीमध्ये चढ-उतारांची मालिका सुरू राहील. परंतु मुख्य कल मंदीचाच राहील.