– लोकसत्ता प्रतिनिधी
नाणी आणि चलनी नोटांविषयी लिहायचे तर कित्येक रंजक गोष्टी आहेत. फक्त भारतातील नाही तर जगातील नाणी व नोटांचा इतिहास व वर्तमान अतिशय मनोरंजक आहे. तुम्ही कधी भारताची नवीन एक रुपयाची नोट बघितली आहे? नीट निरखून पाहा. ही नोट रिझर्व्ह बँकेने जारी केली नसून ती अर्थमंत्रालयाने जारी केली आहे. म्हणजे इतर नोटांप्रमाणे ‘मै धारक को एक रुपया अदा करने का वचन देता हूँ’ असे लिहिलेले आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सहीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही, तर वित्त सचिवांची सही असणारी ही नोट असते. १९७६ मध्ये वित्त सचिव आणि १९८२ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी हे काम बघितल्यामुळे ते एकटेच असावेत, ज्यांनी दोन्ही प्रकारच्या नोटांवर सही केली. भारतीय नोटांवर १७ भाषांमध्ये नोटेची किंमत लिहिलेली असते. यात मराठी, कोंकणीबरोबरच चक्क नेपाळीसुद्धा असते. नेपाळी ही भारताची राजमान्य भाषादेखील आहे कारण घटनेच्या ८व्या परिशिष्टात तिचा समावेश आहे.