US stock market crashed after Donald Trump imposed reciprocal tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर व्यापार कर लागू करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. नॅस्डॅक कंपोझिटमध्ये सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे तर एस अँड पी ५०० मध्ये ३.७ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे अमेरिकन बाजारातील महत्वाचा निर्देशांक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी ३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्यामध्ये सुमारे ११०० अंकांची घसरण झाली आहे.

अ‍ॅपलची २०२० नंतर सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल

चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये आपले उपकरण बनवणारी आयफोन निर्माता कंपनी अ‍ॅपल २०२० नंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल करत आहे. कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. याचबरोबर इतर टेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे.

मेटा प्लॅटफॉर्म आणि एनव्हीडिया ६ टक्क्यांहून अधिक घसरले, तर टेस्ला ५ टक्क्यांहून अधिक आणि अमेझॉन ७ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

ब्रेंटमध्ये ५ टक्क्यांची घसरण

ट्रम्प यांच्या निर्णयानंतर शेअर बाजाराबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण दिसून येत आहे. ब्रेंट (कच्च्या तेलाचा प्रकार) सुमारे ५ टक्क्यांनी घसरला आहे. ब्रेंटची किंमत प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्यातही घसरण दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ३१०८ डॉलर्सपर्यंत म्हणजेच २ टक्क्यांनी घसरली आहे.

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे. ज्या देशांवर अमेरिकेने व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये भारतासारख्या मेत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशासह चीनसारख्या कटू संबंध असलेल्या देशाचाही समावेश आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६% व्यापार कर भरावा लागणार आहे. तर चीनच्या वस्तूंवर ३४% शुल्क आकारले जाईल. दरम्यान अमेरिकेने कंबोडियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर सर्वाधिक ४९% व्यापार कर लागू करण्याची घोषणा केली आहे.