मुंबई : अमेरिकेत व्याजदरात कपात ही अपेक्षेपेक्षा आधीच म्हणजे मार्च २०२४ पासूनच सुरू केली जाईल, असे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे (फेड) अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांचे विधान हे जगभरातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना स्फूर्तिदायी ठरले. ‘फेड’चे अनुकरण करीत रिझर्व्ह बँकेसह जगातील अन्य मध्यवर्ती बँकांकडूनही व्याजदर कपातीचे चक्र सुरू होण्याची बळावलेली आशा ही गुंतवणूकदारांच्या खरेदीला चालना देणारी ठरली.
युरोप-अमेरिकेच्या बाजारावर मदार असलेल्या आणि निर्यातप्रवण माहिती-तंत्रज्ञान, तसेच सॉफ्टवेअर कंपन्या आणि व्याजदराबाबत संवेदनशील स्थावर मालमत्ता समभागांमध्ये गुरुवारी प्रामुख्याने खरेदी झाली. परिणामी सलग दुसऱ्या सत्रात वाढ साधत, सेन्सेक्स ९२९.६० अंशांनी म्हणजे १.३४ टक्क्यांनी झेप घेऊन ७०,५१४.२० अशा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या उच्चांकी स्तरावर स्थिरावला. दिवसभरातील व्यवहारात हा निर्देशांक १,०१८.२९ अंशांनी म्हणजे जवळपास दीड टक्क्यांनी वाढून ७०,६०० अंशांपुढे झेपावला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २५६.३५ अंशांनी (१.२३ टक्के) वाढून २१,१८२.७० या विक्रमी पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, निफ्टीने २८४.५५ अंशांच्या कमाईसह २१,२०० अंशांपुढे मजल मारली होती.
बुधवारी फेडच्या आश्चर्यकारक दिलासादायी निर्णयापाठोपाठ अमेरिकी बाजारांनी लक्षणीय मुसंडी घेतली. गुरुवारच्या सत्रात युरोपीय बाजारही (भारतीय वेळेनुसार मध्यान्हानंतर) खुले होताच, मोठ्या कमाईसह व्यवहार करताना दिसत होते. ‘फेड’च्या निर्णयाबाबत साशंकता म्हणून बुधवारी भारतीय बाजारात वादळी अस्थिरतेसह व्यवहार झाले. पण अखेर ३३ अंशांच्या माफक कमाईसह सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर स्थिरावला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीदार राहिले आणि त्यांनी बुधवारी ४,७१०.८६ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती.
हेही वाचा… सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांक ७०१४६ वर उघडला, निफ्टीमध्येही विक्रमी वाढ
जेरॉम पॉवेल यांचे संकेत काय?
फेडरल रिझव्र्हने बुधवारी तिसर्यांदा आपला प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवला. मागील चार दशकांतील उच्चांकाला पोहोचलेल्या चलनवाढीला आटोक्यात ठेवण्यासाठी अत्यंत वेगाने सुरू केलेल्या व्याजदर वाढीचे चक्र हे त्याच्या कळस पातळीला पोहोचल्याचे लक्षण मानले जात आहे. शिवाय फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी पुढील वर्षी व्याजदरात तीन टप्प्यांत पाऊण टक्क्यांपर्यंत कपात केली जाण्याचे सुस्पष्टपणे संकेत दिले.
फेडरल रिझव्र्हच्या एकंदर नरमाईकडे झुकलेल्या समालोचनातून योग्य तो बोध घेऊन गुरुवारी बाजाराने आपला उत्साह कायम ठेवला. या समालोचनांतून २०२४ या कॅलेंडर वर्षांत किमान तीन दर कपातीचे संकेत दिले गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरात तीव्र घट झाल्यानेही स्थानिक बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
भारतीय बाजारांसाठी सुखकारक काय?
एक तर फेडच्या आणि जेरॉम पॉवेल यांच्या धोरणाचे जगभरातून मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून अनुकरण केले जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडूनही त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये व्याजदर कपातीचे पाऊल पडेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. शिवाय, अमेरिकेतील रोख्यांवरील परताव्या वाढलेले दर तीव्र रूपात घसरल्याने, माघारी परतलेले विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे पाय पुन्हा भारतीय बाजाराकडे वळतील, अशी आशा आहे. जागतिक खनिज तेलाच्या किमतीतील नरमाई आणि महागाईला लक्ष्य पातळीपर्यंत खाली आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे मिळत असलेले यश पाहता, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एकूण आशादायी चित्र निर्माण झाले आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेसह, अनेक प्रतिष्ठित संस्था व अर्थविश्लेषकांनी एकूणच भारताच्या विकासदर अंदाजात सुधारणा केली आहे, हे सर्व अनुकूल घटक भांडवली बाजारातील गुंतवणुकीला चालना देणाऱ्या आहेत, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये सामील कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे समभाग गुरुवारी प्रामुख्याने वधारले. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, नेस्ले, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, टायटन आणि टाटा मोटर्स हे समभाग पिछाडीवर होते.