घोडदौडीवर निघालेले निर्देशांक हे नवनवीन अत्युच्च शिखरावर स्वारी करीत चालले आहेत. त्यांच्या या दौडीमागची कारणे काय? एक तर, तापलेली महागाई काहीशी थंडावत असल्याचे संकेत आहेत आणि त्यातून पुढे जाऊन व्याजदरातील गतिमान झालेले चक्रही मंदावले तर त्याहून मोठी अर्थव्यवस्थेची आनंदाची गोष्ट नसेल. अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणारी अर्थात जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दरातील वाढीची जाहीर होऊ घातलेली आकडेवारी ही ताज्या सकारात्मकतेत भर घालणारी की, हिरमोड करणारी, हे येत्या मंगळवारी ठरेल. अर्थात एव्हाना तयारी सुरू झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा अजेंडा त्यातूनच ठरविला जाईल.
तसे पाहता, सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत जगभरात अशांततेचे वातावरण भारतीय कंपन्यांची वित्तीय कामगिरी ही त्या प्रतिकूलतेचा परिणाम खूप अत्यल्प असे दर्शविणारी राहिली आहे. भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेच्या तब्येतीबाबतही अनेक विश्लेषकांचा असाच आशावादी होरा आहे.
तथापि आता सर्वच प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल येऊन गेले आहेत आणि बाजाराच्या दिशेला प्रभावित करू शकेल असे काही नसताना गुंतवणूकदारांचे लक्ष हे देशाबाहेरच्या घडामोडींवर, विशेषत: चीनमध्ये वाढता करोना प्रादुर्भाव आणि त्याचा प्रतिबंध म्हणून योजले जाणारे उपाय यावर केंद्रीत असेल.
अन्य कोणते महत्त्वाचे घटनाक्रम चालू सप्ताहात बाजारावर परिणाम करू शकतात, त्याचा हा वेध…
मंगळवार, २९ नोव्हेंबर २०२२
युरोक्षेत्राचा आर्थिक कल आणि ग्राहक आत्मविश्वास याची निदर्शक आकडेवारी जाहीर होईल.
बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२
तिसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’ आकडेवारी – चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसर्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा १३.५ टक्के दराने विस्तार झाला. तो बाजाराच्या १५.२ टक्के या सार्वत्रिक अंदाजापेक्षा कमी असला तरी वर्षातील वेगवान वाढीचा दर होता. तिसऱ्या तिमाहीत मात्र ही वाढ कशी असेल? मंगळवारी अधिकृतपणे जाहीर होणाऱ्या या आकडेवारी सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. कारण त्यानंतर चालू महिन्यांत असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीत व्याजाच्या दरात किती प्रमाणात वाढ केली जाईल, या दिशेने ही मंगळवारची आकडेवारीच निर्णायक भूमिका बजावेल.
० वित्तीय तूट – देशातील चलनवाढीच्या दृष्टीने चिंतेबाबत दिलासा देऊ शकेल अशी आकडेवारी म्हणजे ऑक्टोबरअखेर वित्तीय तुटीचे प्रमाण किती, हे देखील मंगळवारी जाहीर केले जाईल.
गुरुवार, १ डिसेंबर २०२२
भारताच्या निर्मिती क्षेत्राचा ‘पीएमआय’ निर्देशांक: निर्मिती क्षेत्राचा एस अँड पी ग्लोबल इंडिया पीएमआय निर्देशांक सप्टेंबरमधील ५५.१ वरून, ऑक्टोबरमध्ये अपेक्षेपेक्षा सरस ५५.३ गुणांवर नोंदवण्यात आला आणि ५३.७ या दीर्घकालीन सरासरीच्या वर तो कायम राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये या क्षेत्राची गती आणखी वाढेल काय, हे गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या आकड्यांतून दिसून येईल.
अमेरिकेतील बेरोजगार भत्त्याचा अंदाज : अनेक जागतिक आघाड्याच्या तंत्रज्ञान कंपन्यांत सुरू झालेले नोकरकपातीचे वारे पाहता, त्याचा गुरुवारी जाहीर होणाऱ्या या महत्त्वाच्या आकडेवारीवर कोणता विपरित परिणाम झाला आहे काय, हे पाहावे लागेल.
शुक्रवार, २ डिसेंबर २०२२
बँक ठेवी आणि पतपुरवठ्यातील वाढ : रिझर्व्ह बँकेकडून १८ नोव्हेंबरला संपलेल्या पंधरवड्यात देशातील सर्व बँकांमध्ये दिसून आलेला कर्ज आणि ठेव वाढीचा दर जारी केला जाईल. आधीच्या पंधरवड्यात, म्हणजे ४ नोव्हेंबरपर्यंत बँकांकडून वितरीत कर्जाचे मूल्य १७ टक्के दराने वाढल्याचे आणि ठेवींमध्ये तुलनेने कमी म्हणजे ८.२ टक्के वार्षिक वाढ दिसून आली आहे.
गुंतवणूक-संधी
दोन फंडाचे ‘एनएफओ’:
युनिनय मल्टिकॅप फंड सोमवारपासून गुंतवणुकीस खुला
युनियन एएमसीने ‘युनियन मल्टिकॅप फंड’ ही गुंतवणुकीस कायम खुली समभागसंलग्न योजनेची घोषणा केली, जिचा उद्देश कमी अस्थिर असणाऱ्या लार्ज कॅप्ससह, मिड आणि स्मॉल कॅपद्वारे संभाव्य उच्च वाढीच्या कामगिरीचा लाभ घेण्याचा आहे. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) येत्या सोमवारी, २८ नोव्हेंबरला खुली होईल आणि १२ डिसेंबरपर्यंत ती गुंतवणुकीसाठी खुली असेल.
युनियन मल्टिकॅप फंड लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील संधी ओळखण्यासाठी ‘टॉप-डाऊन’ आणि ‘बॉटम-अप’ पद्धतीच्या मिश्रणाचा अवलंब करण्याचे उद्दिष्ट ठेवते. योजनेसाठी ‘निफ्टी ५०० मल्टिकॅप ५०:२५:२५ टीआरआय’ हा मानदंड निर्देशांक निर्धारित करण्यात आला आहे. पोर्टफोलियोसाठी समभाग निवड ‘वाजवी मूल्यांकन’ यावर आधारित असेल, असे युनियन एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी प्रदीपकुमार म्हणाले. युनियन मल्टिकॅप फंड गुंतवणूकदारांना खऱ्या अर्थाने जोखीम संतुलित राखणारे वैविध्य प्रदान करतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
महिंद्रा मनुलाइफचा नवीन स्मॉल कॅप फंड दाखल
महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाने स्मॉल कॅप फंड ही मुदतमुक्त समभागसंलग्न योजना दाखल केली असून, तिचा उद्देश स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक दीर्घावधीत उत्तम भांडवलवृद्धी साधण्याचा आहे. या फंडाच्या मालमत्ता वाटपापैकी ६५ टक्के गुंतवणूक ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये असेल. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) २१ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ती ५ डिसेंबर २०२२ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली असेल.
महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी अँथनी हेरेडिया यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था येत्या दशकात जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रचंड वाढीची क्षमता तिच्यात असून अनेक लहान कंपन्यांसह योग्य क्षेत्रे आणि व्यवसायांमध्ये गुंतवणुकीची ही सध्या उपलब्ध झालेली अभूतपूर्व संधी आहे. चतुर इन्व्हेस्टमेंटचे संदीप भूशेट्टी यांनी सांगितले की, भारतातील स्मॉल कॅप कंपन्यांच्या वाढीसाठी अनेक घटक अतिशय आशादायक दिसत आहेत. भारतातील नवीन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देखील नव्या कंपन्यांच्या वाढीस पूरक आहे. विशेषतः लार्ज कॅपमध्ये नाहीत अशी अनेक नवनव्या क्षेत्रात नव्या उदयोन्मुख, पण आकाराने छोट्या कंपन्यांची बिनतोड ठरताना दिसत आहे.
फंडातील गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभाग आणि समभागांशी निगडित साधनांत वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलाची निर्मिती करण्याचे आहे. भारतातील स्मॉल कॅप श्रेणी अशा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते, ज्यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची आणि वाढण्याची प्रचंड क्षमता आहे. सध्याची अर्थव्यवस्था अनेक स्मॉल कॅप कंपन्यांना भविष्यात मिड कॅप कंपन्यांमध्ये रूपांतरित होण्याची संधी प्रदान करते. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीच्या या उमद्या पर्यायाला निवडण्याची ही सुयोग्य वेळ आहे, असे हेरेडिया म्हणाले.