वर्ष १९८५ मध्ये स्थापन झालेली होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड म्हणजेच पूर्वीची होंडा सीएल पॉवर प्रॉडक्ट्स होती. कंपनी प्रामुख्याने पोर्टेबल जेनसेट, वॉटर पंप, इंजिन, लॉन मॉवर्स, ब्रश कटर आणि टिलर्सचे उत्पादन आणि विपणन करते. ही कंपनी जगप्रसिद्ध होंडा समूहाचा एक भाग असून होंडा कार्पोरेशन ही ऑटोमोबाईल, मोटारसायकल आणि ऊर्जा उपकरणे बनवणारी जपानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय टोकियो, जपान येथे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या ३८ वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून भारतातील आपले स्थान पक्के केले आहे. होंडाचा जेनसेट व्यवसाय जागतिक बाजारपेठेतील मजबूत मागणीसह लक्षणीय वाढ अनुभवत आहे. या उत्पादनांसाठी प्रमुख प्रस्थापित बाजारपेठ उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया आहेत. तर आता मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियामधून मागणी वाढताना दिसत आहे. कंपांनीच्या एकूण महसुलापैकी ४३ टक्के उलाढाल देशांतर्गत असून उर्वरीत उलाढाल निर्यातीतून आहे. कंपनीची प्रमुख निर्यात ३५ देशांना असून त्यात प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, युरोपियन युनियनमधील देशांचा समावेश आहे. आपल्या उत्पादन वितरणासाठी कंपनीकडे ६०० हून अधिक वितरकांचे जाळे असून त्याद्वारे ती आपल्या २५ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनीचा एकमेव उत्पादन प्रकल्प ग्रेटर नोएडा येथे असून ३.५ लाख युनिटची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ५ लाख युनिटचे संचित उत्पादन गाठले आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत १,२४६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०१.६ कोटी रूपयांचा नफा कामावणार्या होंडाने यंदाच्या पहिल्या सहामाहीत नक्त नफ्यात १५ टक्के वाढ साध्य केली आहे. मात्र कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल फारसे उत्साहवर्धक नाहीत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो २६ टक्क्यांनी घटला आहे.

उत्तम अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेल्या होंडा पॉवरकडून आगामी कालावधीत मात्र उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. सध्याच्या अनिश्चित बाजारात एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या स्मॉलकॅप बहुराष्ट्रीय कंपनीचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करू शकता.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड (बीएसई कोड ५२२०६४)

प्रवर्तक: होंडा मोटर कंपनी, जपान
बाजारभाव: रु. २,४०४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: जेनसेट्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १०.१४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६६.६७

परदेशी गुंतवणूकदार १.७९
बँक / म्युच्युअल फंड/ सरकार १४.७२

इतर/ जनता १६.८२
पुस्तकी मूल्य: रु. ७५७.५

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: १६५%

प्रति समभाग उत्पन्न: रु.९७.३
किंमत उत्पन्न गुणोत्तर:२५.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४०.७
डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २३७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई):१८.८

बीटा : १

बाजार भांडवल: रु. २,४३९ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३१३३/१७९२

अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.