-प्रमोद पुराणिक
प्रेम खत्री हे कॅफे म्युच्युअल या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर जुलै २००९ पासून कार्यरत आहेत. म्युच्युअल फंडाच्या वितरकांसाठी कायम मदतीचा हात पुढे करणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. म्युच्युअल फंड आणि गुंतवणूकदार या दोघांना जोडणारा दुवा म्हणून म्युच्युअल फंड वितरक काम करीत असतो. त्यांचे काम दिसायला सोपे वाटते. परंतु एकाच वेळेस बाजारात अनेक घडामोडी घडत असतात. त्यांच्याकडे लक्ष ठेवणे बाजारपेठेत काय बदल घडत आहे. त्यासंबंधी आपल्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणे. रोजच्या रोज ‘सेबी’कडून कुठल्या ना कुठल्या पत्रकांचा मारा होत असतो. त्याकडे लक्ष ठेवणे अशी अनेक अवधाने पाळावी लागतात.
‘मॉर्निंग स्टार’ आणि ‘कॅफे म्युच्युअल’ या दोन संस्था म्युच्युअल फंड वितरकांसाठी मेळावे आयोजित करतात. या संस्थांची इव्हेंट मॅनेजर म्हणून हेटाळणी करण्याचे काहीही कारण नाही. हे काम कोणीतरी करण्याची गरज होतीच आणि म्हणूनच ते हे कार्य करतात. हे काम केल्यानंतर दोन पैसे शिल्लक उरावे हा जरी स्वार्थ असला तरीही हे परमार्थाचेदेखील काम आहे. कारण बाजारात आजही गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता नाही. म्युच्युअल फंड वितरकांमध्येही नाही आणि त्यामुळे अशा उपक्रमाची गरज असते.
आणखी वाचा-वित्तरंजन – सिद्धार्थ जवाहर: नव -पॉन्झी
म्युच्युअल फंड घराणीसुद्धा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. परंतु साधारणपणे एखादी नवीन योजना आणायची असली तर असे कार्यक्रम केले जातात. म्युच्युअल फंडाने आयोजित केलेला कार्यक्रम असल्याने साहजिकच आमच्या योजना किती चांगल्या आहेत हे सांगण्याचे कार्य केले जाते. अशा वेळेस मॉर्निंग स्टार आणि कॅफे म्युच्युअल या दोन संस्था अशा आहेत की, त्यांचे स्वतःचे म्युच्युअल फंड्स नाहीत त्यामुळे सर्व म्युच्युअल फंडांना संधी मिळू शकते. मॉर्निंग स्टारवर आधी लिहिलेले आहे. म्हणून आता कॅफे म्युच्युअलच्या प्रेम खत्री यांच्यावर काही लिहिणे आवश्यक वाटल्याने हा माहितीवजा लेख.
प्रेम खत्री यांना ओळखले जाते ते पायोनिअर आयटीआय म्युच्युअल फंडांतील व्हाइस प्रेसिडेंन्ट मार्केटिंग या त्यांच्या पदामुळे. नोव्हेंबर १९९४ ते जुलै २००२ अशी सात वर्षे नऊ महिने त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्या वेळेस या फंडाकडे सात लाखांच्या वर गुंतवणूकदार होते. याआधी अकाउंट मॅनेजर म्हणून लिन्टास इंडिया या संस्थेत जून ९१ ते ऑक्टोबर ९४ अशी तीन वर्षे पाच महिने त्यांनी जबाबदारी सांभाळली. एमआरएफ, स्पार्कटेक, सिरॅमिक, टीआय सायकल्स या कंपन्यांच्या उत्पादनांच्या प्रसिद्धीचे काम त्यांनी सांभाळले. तर त्या अगोदर डिसेंबर १९८४ ते जून १९८९ अशी चार वर्षे सात महिने स्टेट बँकेच्या शाखेचे अकाउंटन्ट म्हणून त्यांनी काम केले. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून ते स्टेट बँकेत लागले होते.
मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज या संस्थेतसुद्धा ऑगस्ट २००५ ते फेब्रुवारी २००६ या कालावधीत संचालक तर एएसके रेमंड जेम्स सिक्युरिटीज या ठिकाणी संचालक मार्केटिंग ही जबाबदारी त्यांनी सांभाळली, तर जून २००३ ते २००४ असे वर्षभर बँक ऑफ बडोदातसुद्धा ते कार्यरत होते.
आणखी वाचा-बाजारातली माणसं- जिद्दी, हरहुन्नरी
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये मॉर्निंग स्टारकडून सेमिनार आयोजित केला जातो, तर फेब्रुवारी महिन्यात कॅफे म्युच्युअलकडून. या कार्यक्रमात वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर अशा वेगवेगळ्या पदांवर असलेल्या व्यक्तींना निमंत्रित केले जाते. आर्थिक क्षेत्राशी निगडित असलेले लोकच फक्त बोलावले जातात. असे होत नाही तर आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले. अशा व्यक्तींचा, संस्थांचा सत्कार केला जातो. त्या निमित्ताने त्यांनी केलेले काम इतरांपर्यंत पोहोचते. आणि त्यातूनच आणखी कामाची प्रेरणा मिळते. पुणे तिथे काय उणे असे गमतीने म्हटले जाते. परंतु पुण्यात गुंतवणूक संस्कृती रुजवणाऱ्या संस्थेचे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करणे हे काम कॅफे म्युच्युअलने केले. वास्तविक पाहता हे काम ‘ॲम्फी’सारख्या संस्थेने करायला हवे.
कंपनी कायद्यात २०१३ मधील बदलाने ‘इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’ आर्थिकदृष्ट्या फार भक्कम झाला. परंतु या संस्थेकडे जमा झालेले शेअर्स लाभांशाच्या मोठमोठ्या रकमा हे मिळवून देणाऱ्या संस्था जन्माला आल्या. आणि त्यांनी त्यापोटी प्रचंड मोठे शुल्क घेण्यास सुरुवात केली. जो एक मोठा व्यवसाय झाला. परंतु या सर्व प्रकारात काही सुधारणा करणे आवश्यक बनले होते. त्या सुधारणा अजून तरी झालेल्या नाहीत.
म्युच्युअल फंड वितरकांबाबत तर रोज नवे परिपत्रक, रोज नवे बदल येत असतात. या बदलांना सामोरे जाण्यासाठी कॅफे म्युच्युअलसारखी संस्था विनामूल्य विविध सेवा वर्षाचे ३६५ दिवस म्युच्युअल फंड वितरकांना देण्याचे काम करते. आणि म्हणून प्रेम खत्री यांच्यासारख्या अनेक व्यक्ती पुढे यायला हव्यात. ‘सेबी’कडेदेखील भरपूर पैसा आहे. मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार यांच्याकडेसुद्धा गुंतवणूक संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रचंड मोठा निधी उपलब्ध आहे.
सेबीने ज्या गुंतवणूक संघटनांना मान्यता दिलेली आहे अशा संस्था गुंतवणूक जागृती हा विषय घेऊन मेळावे आयोजित करू शकतात. परंतु आता तो एक व्यवसाय झालेला आहे. आणि त्यामुळे ज्या संस्था हे काम करतात त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. प्रेम खत्री यांनी हा मार्ग निवडला तेव्हा त्यांना पैसे कमावण्यासाठी इतर खूप मार्ग उपलब्ध होते. परंतु त्यांनी ही वेगळी वाट शोधली आणि म्हणून गेली १५ वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. अशी ही माणसे या बाजाराच्या विकासासाठी आवश्यकच असतात.