जुलै २९, १९४२ ला जन्मलेले आणि ९ मार्च २०२१ ला निधन पावलेले रिचर्ड ड्रिहॉस यांचा आज जन्म दिवस आहे. अमेरिकी व्यावसायिक, गुंतवणूकदार, दानशूर, परोपकारी ते हेज फंडाचे संस्थापक, मुख्य गुंतवणूक अधिकारी अशा अनेक विशेषणांनी त्यांचा परिचय करून देता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्तंभात परिचय करून देण्यापाठीमागे वेगळे कारण आहे. आपल्याकडे म्युच्युअल फंड उद्योगात एका फंड घराण्याच्या विविध योजनासंबंधी काही गोष्टी चुकीच्या घडल्या असे ‘सेबी’ला वाटले. आणि त्यानंतर मग सेबीने योग्य ती पावले उचलली. हे प्रकरण सेबी योग्यप्रकारे हाताळेल याबद्दल काहीही संशय नाही. परंतु ते फंड घराणे, त्यांच्या विविध योजना ज्या गुंतवणूक पद्धतीमुळे इतर म्युच्युअल फंडापेक्षा अनोख्या आणि वेगाने वाढल्या, त्या गुंतवणूक पद्धतीचे नाव आहे – ‘मोमेन्टम इन्व्हेस्टिंग’. याचे मराठी भाषांतर शेअर बाजाराच्या भाषेत करायचे ठरविले तर लाटांवर स्वार होणारी गुंतवणूक पद्धती असे चपखल होईल. या बाजारात प्रत्येकजण आपापल्या संकल्पना घेऊन येतो. त्यामुळे या संकल्पनेचा जन्मदाता रिचर्ड ड्रिहॉस हा फारसा परिचित नसलेला गुंतवणूकदार अमेरिकन भांडवली बाजारात होऊन गेला. त्यासंबंधी थोडक्यात माहिती द्यावी केवळ याच हेतूने हा लेख.

हेही वाचा – ‘सेन्सेक्स’ची फेरमुसंडी; अमेरिकी ‘जीडीपी’ वाढीने १,२९२ अंशांची कमाई

रिचर्ड ड्रिहॉस हा ड्रिहॉस कॅपिटल मॅनेजमेंट शिकागो या हेज फंडाचा अध्यक्ष होता. त्याने त्या अगोदर १९६८ ला संस्थाच्या गुंतवणुकीची जबाबदारी सांभाळणारा तरुण पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून नाव कमावले होते. १९७३ ते १९७९ या कालावधीत वेगवेगळ्या दलालांच्या पेढ्यांमध्ये त्याने नोकरी केली. आणि त्यानंतर मग १९८२ ला स्वतःचा हेज फंड सुरू केला. १९६५ ला तो बीएस्सी झाला. १९७० ला एमबीए पदवी मिळवली, तर २००२ ला त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली. २००० साली अमेरिकेतल्या बेरॉन या संस्थेने १०० वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या २५ व्यक्तींच्या नावात यांच्या नावाचा समावेश केला. त्यामुळे हा वॉरेन बफेट, सर जॉन टेम्पलटन, बेन ग्रॅहम अशा मोठ्या लोकांच्या नावाबरोबर याचे नाव जोडले गेले. जगातले ९९ सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार या पुस्तकाचा लेखक मॅग्नेस अँगेनफेल्ट या माणसानेसुद्धा ड्रिहॉस यांचा उल्लेख केला.

ड्रिहॉस यांची गुंतवणूक विचारसरणी हा आपला मुख्य विषय आहे. त्याने जे विचार मांडले आहेत ते विचार हे अफलातून आहेत. तुमच्याकडे असलेला प्रत्येक शेअर हा रणांगणावरील रणगाडा आहे. रणांगणावर राहणे किंवा टिकून राहणे हे आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे बाजारालाही हाच न्याय लागू होतो. रणगाडाच नष्ट केला जाऊ नये म्हणून वेळप्रसंगी मागे यायची तयारी ठेवा. एखाद्या घटनेचा काय परिणाम होईल याचा अंदाज करणे, इतरांच्या अगोदर निर्णय घेऊन मोकळे होणे, हे करता आले पाहिजे. काही वेळा ही पद्धत चुकीची ठरते. परंतु तरी ड्रिहॉस आपले विचार ठामपणे मांडायचे.

स्वस्त शेअर खरेदी करा आणि शेअर वाढला की विका हे गुंतवणुकीतले मूलतत्त्व अनेकांनी वापरले. परंतु हा नियम मान्य करायची ड्रिहॉस यांची तयारी नव्हती. याउलट ते असे म्हणायचे की, ज्या शेअरनी गती घेतली आहे जो शेअर वाढू लागला आहे, तो शेअर खरेदी करा आणि त्यानंतर तो आणखी वाढू शकतो. कारण त्याने गती घेतलेली असते तरच प्रगती म्हणजे आणखी वेगाने वाढणारी गती तो शेअर घेऊ शकतो. त्यामुळे असा शेअर खरेदी करा. वाढला की विका. लाटेवर स्वार व्हा. ते आणखी एक धक्कादायक विधान करतात, ते म्हणजे- शेअरचा अमुक एक पीई रेशो योग्य आहे की अयोग्य आहे असे कधीच नसते. शेअर जास्तीत जास्त किती वाढू शकेल. किंवा जास्तीत जास्त किती खाली येईल हे कोणालाही सांगता येत नाही हेच बाजाराचे वैशिष्ट्य आहे.

वॉरेन बफे यांची विचारसरणी चुकीची आहे हे सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. गुंतवणुकीचे ज्ञान त्याने कसे मिळविले हे स्पष्ट करताना, आर्थिक वर्तमानपत्रे वाचणे असे ड्रिहॉस सांगतात. त्यांच्या मते, हा सर्वात चांगला मार्ग असतो. त्यांना दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि इन्व्हेस्टर बिझनेस डेली या दोन वर्तमानपत्रांचे वाचन करायला आवडायचे आणि या वाचनामुळेच ते भरपूर पैसा कमावू शकले. २०१७ ला त्याने सीएफए इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान दिले होते आणि त्या व्याख्यानाचा विषय होता – डार्विन, बाजार आणि मी. ते एक नाणी संग्रहक होते. आयुष्यात त्यांनी भरपूर पैसा कमावला. म्युच्युअल फंडांना गुंतवणुकीच्या विविध संकल्पना मिळवून देणारे ते एक शेअर दलाल होते. त्यांनी २० वर्षे हे काम नेटाने केले. आश्चर्याची गोष्ट अशी की म्युच्युअल फंड्स त्यांना सांगायचे, जर तू मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आलास, तर आम्ही तुझ्याशी असलेले संबंध तोडून टाकू. भारतात असे अनेक गुंतवणूक सल्लागार आहेत की जे प्रसिद्धीचा हव्यास करीत नाहीत. परंतु त्यांचे कामच हळूहळू प्रचंड प्रसिद्धी मिळवू लागते.

हेही वाचा – दीडशे वर्षांची चिरतरुण मिनीरत्न बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड

आयुष्यात प्रचंड पैसा कमावल्यानंतर त्यांनी एक वेगळाच उपक्रम हाती घेतला आणि तो म्हणजे आर्थिक साक्षरता मोहीम. कमी उत्पन्न गटातल्या व्यक्तींसाठी संपत्तीची निर्मिती आणि त्या संपत्तीचा सांभाळ याचे त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी ध्यासाने केले. हे काम करत असतानाच जुन्या वास्तूंना नवे रूप देणे यासाठी त्यांनी पैसा खर्च करणे सुरू केले. म्युझियम म्हणून त्या वास्तू नावारूपास आणणे यासाठी प्रयत्न सुरू केले. अमेरिकेत त्यांनी अनेक संस्था उभारल्या. कारण त्यांना वास्तुशास्त्राचीसुद्धा आवड होती. या बाबतीत त्यांनी काय काय केले याची भरपूर माहिती उपलब्ध आहे. परंतु जागेच्या अभावी विस्तृत माहिती देणे शक्य नाही हे एक कारण आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बाजारासंबंधी आवश्यक असलेली माहिती देणे हा मुख्य विषय आहे.

या बाजारात फक्त ५ टक्के मॅथ्स लागते आणि ९५ टक्के माणसांच्या वागणुकीचे शास्त्र हे आवश्यक असते. म्हणून २००२ ला यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. पुन्हा ‘मोमेन्टम इन्व्हेस्टिंग’ किंवा लाटांवर स्वार होणारा गुंतवणूकदार या मुख्य विषयाकडे वळूया. या संकल्पनेवर काही म्युच्युअल फंडांनी योजना आणल्या होत्या, काही म्युच्युअल फंडांनी निर्देशांकातल्या एकूण शेअर्सपैकी काही शेअर्समध्ये जास्त चढ-उतार होतात म्हणून योजना आणल्या. यूटीआय म्युच्युअल फंडाने यूटीआय निफ्टी २०० मोमेन्टम ३० इंडेक्स फंड अशी योजना १० मार्च २०२१ ला आणली होती. आज फंडाद्वारे ६ हजार कोटींची मालमत्ता व्यवस्थापित केली जात आहे. अशा अनेक फंडाची नावे देता येतील. त्यामुळे गुंतवणुकीची मुख्य संकल्पना मोमेन्टम इन्व्हेस्टिंग चुकीची नाही. हे स्पष्ट केलेच पाहिजे. पण त्याचबरोबर काय चुकीचे घडले हेसुद्धा बाजाराचा एक अभ्यासक म्हणून लिहिले पाहिजे. ते म्हणजे, अलीकडे अर्धवट माहिती असलेले अनेक गुंतवणूकदार बाजारात येऊ लागले आहेत आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ॲप्सवरील चुकीची माहिती प्रसिद्ध होते. आणि त्यामुळे अमुक एका योजनेने ७० टक्के भांडवलवृद्धी दिली. किंवा ८० टक्के भांडवलवृद्धी दिली अशा आकडेवारीमुळे गुंतवणूक वाढू लागते. आणि मग काही चुकीचे घडते. महिन्याला जर १० टक्के वाढ झाली तर त्याचा अर्थ वर्षाची १२० टक्के वाढ होत नाही हे जेव्हा कळेल तेव्हा नवीन गुंतवणूकदार व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीऐवजी गुंतवणूक सल्लागाराकडे जातील.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Founder of momentum investing richard driehaus print eco news ssb