प्रदीप शहा यांची सुरुवातीची कारकीर्द एचडीएफसी लिमिटेड या कंपनीमध्ये झाली. १९७७ ला ते एचडीएफसीमध्ये नोकरी करत होते. चर्चगेट जवळच्या एचडीएफसीच्या कार्यालयातच त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळाली होती. घर बांधणी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांकडून, भागधारकांकडून ठेवी गोळा करण्यास सुरुवात केली होती. ठेवी गोळा करण्यासाठी काम करण्याचे नियुक्ती पत्र त्यांच्याच स्वाक्षरीने मिळाले होते. पत्र घेतल्यानंतर गप्पा सुरू असताना प्रदीप शहा यांनी सांगितले – ‘मी एचडीएफसीतील नोकरीचा राजीनामा देणार आहे. माझ्या डोक्यातली एक संकल्पना मला पूर्णत्वास न्यायची आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनदी लेखापाल (सीए) या परीक्षेत संपूर्ण भारतातून पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला हा माणूस एका नव्या संकल्पनेला जन्म देण्याचा विचार करीत होता. शिक्षण तर अतिशय चांगले झाले होते. सनदी लेखापाल, त्या अगोदर सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉमचे शिक्षण, हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए ही पदवीही त्यांनी मिळविली. त्यांच्या डोक्यात नेमकी काय संकल्पना आहे हे सांगण्यास त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. परंतु भारतीय भांडवली बाजाराच्या प्रगतीसाठी ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणणे हे फार मोठे धाडस होते. परंतु ती काळाची गरज होती. पुढे २९ जानेवारी १९८७ या दिवशी ‘क्रिसिल’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेची एवढी गरज होती की, तिच्यामुळे कंपन्यांच्या विविध आर्थिक उत्पादनांसाठी पतमानांकन करणे हे या संस्थेमुळे शक्य झाले.

आणखी वाचा-बँक बुडवणारा कर्मचारी (भाग १)

यानंतर २१ एप्रिल १९९३ या दिवशी ‘केअर’ ही संस्था, त्या अगोदर १९९१ मध्ये ‘इक्रा लिमिटेड’ अशा आणखी दोन संस्था या क्षेत्रात जन्माला आल्या. तथापि एका वेगळ्या व्यवसायाचा पायंडा ‘क्रिसिल’मुळे निर्माण झाला. आणि ती संस्था स्थापन करणारे प्रदीप शहा यांनी तिच्या जन्मापूर्वी ही संकल्पना आपल्यापुढे कथन केली होती याचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही. वेगवेगळ्या कारणामुळे त्या काळात प्रदीप शहा हे नाव प्रसारमाध्यमात नेहमी दिसायचे. मग कधी इंडिया टुडे या पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर ‘एक कोटी रुपये पगार घेणारा भारतीय माणूस’ असा उल्लेख असायचा. त्या नंतर शहा फारसे प्रकाशझोतात राहिले नाहीत.

अचानकपणे जेव्हा स्वतंत्र संचालक म्हणून नाव वाचायला मिळाले तेव्हा मग अनेक घटनांचा पुन्हा एकदा माग घेतला. १९९४ ला इंडो ओसिअन फंड या फंडाशी प्रदीप शहा संबंधित होते. हा फंड चेस कॅपिटल पार्टनर आणि सोरोस फंड मॅनेजमेंट यांच्याशी संबधित होता. एप्रिल १९९८ मध्ये प्रदीप शहा यांनी इंड आसिया कॉर्पोरेट फायनान्स प्रायव्हेट इक्विटी ॲडव्हायझरी बिझनेस अशी जबाबदारी सांभाळली. तर यूएस एड, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलोपमेंट बँक या संस्थाचे सल्लागार म्हणून काम केले.

इंडियन मर्चंट चेंबर या संस्थेमध्ये कॅपिटल मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. या नंतर मात्र वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर त्यांचे नाव दिसण्यास सुरुवात झाली. जानेवारी २००० पासून बीएएसएफ संचालक, फायझर संचालक, ७ डिसेंबर १९९९ ला चेअरमन, केन्साई नेरोलॅक संचालक, १ एप्रिल २०१९ संचालक बजाज ऑटो, २५ मे २०२० संचालक बजाज होल्डिंग या अशा अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. परंतु पहिली महत्त्वाची जबाबदारी होती ती म्हणजे देशातली पहिली क्रेडिट रेटिंग एजन्सी स्थापन करणे आणि त्या संस्थेचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम करणे.

आणखी वाचा-निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा

थोडेसे विषयांतर होईल, परंतु राकेश झुनझुनवाला यांच्यावर लिहिलेल्या लेखात (अर्थवृत्तान्त, १५ जुलै २०२४) क्रिसिल या कंपनीचा उल्लेख केला होता. या कंपनीचे महत्त्व झुनझुनवाला यांना अगोदर समजले त्यामुळे त्यांनी या कंपनीत गुंतवणूक करून प्रचंड पैसा कमावला. क्रिसिल ही संस्था पुढे अतिशय मोठी बनली. एवढी मोठी होत आली की, स्टँडर्ड ॲण्ड पुअर या अमेरिकन संस्थेला क्रिसिलबरोबर सहकार्याचा करार करावा लागला आणि या दोन्ही संस्थाचे अनेक फायनाशियल प्रॉडक्टस बाजारात उपलब्ध आहेत. कंपन्यांचे पतमानांकन करण्यात आजसुद्धा या संस्थेचे कौशल्य वादातीत आहे.

भांडवल बाजार कसा प्रगत होतो, कोणामुळे प्रगत होतो हा विषय वर्षानुवर्षे चर्चिला जाणारा आहे. म्हणून बाजारात नवनवीन संकल्पना यशस्वी होईलच असे मात्र अजिबात नाही. परंतु १० संकल्पना जरी अयशस्वी झाल्या तरी एखादी यशस्वी झालेली संकल्पना बाजाराचा कायापालट करू शकते.

आणखी वाचा-बेन्जामिन ग्रॅहम आणि आधुनिक मूल्य-गुंतवणुकीतील दुवा

सर्वात शेवटी स्वतंत्र संचालक याबद्दल काही लिहिणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच उल्लेख केला त्या फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने स्वतंत्र संचालक म्हणून प्रदीप शहा यांना ट्रस्टीशिप कंपनीवर संचालक म्हणून २०१९ मध्ये घेतले. इतर म्युच्युअल फंडांच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि त्याचबरोबर ट्रस्टीशिप कंपन्या यांच्यावर स्वतंत्र संचालक म्हणून कोण असावेत आणि कोण नसावेत यासंबधी विचारमंथन झाले पाहिजे. जर छोट्या गुंतवणूकदारांचा प्रतिनिधी म्हणून बीएसई लिमिटेड या संस्थेवर कधी दीपक पारिख, तर कधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचे अध्यक्ष एस. रामदुरई संचालक मंडळात प्रतिनिधित्व करतात. तर मग म्युच्युअल फंडासाठी गुंतवणूकदारांचे विश्वस्त म्हणून या फंडाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूकदार असलेले स्वतंत्र संचालक म्हणून घेतले तर तो एक नवा पायंडा निर्माण होऊ शकेल. म्युच्युअल फंडस् वितरकांपैकी एखाद्या वितरकाला एखाद्या म्युच्युअल फंडाने स्वतंत्र संचालक म्हणून संचालक मंडळात काम करण्याची संधी दिली तर म्युच्युअल फंड व्यवसाय आणखी वेगाने वाढू शकेल. कारण बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांच्या गरजा काय आहेत. हेच वरिष्ठ मंडळींना समजत नाही. किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. स्वतंत्र संचालक हा खरोखर स्वतंत्र संचालक असावा असे वाटते.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Franklin templeton india asset management company independent director pradeep shah print eco news mrj