सक्रियपणे व्यवस्थापित लार्ज-कॅप इक्विटी फंडांची त्यांच्या मानदंडांसापेक्ष मागील एका वर्षातील कामगिरी समाधानकारक नाही. मागील एका वर्षात निफ्टी १०० आणि बीएसई १०० सारख्या मानदंडांपेक्षा सरस कामगिरी करणे केवळ चार फंडांना शक्य झाले आहे. ३ वर्षे आणि ५ वर्षे कालावधीत केवळ २२ आणि २७ टक्के फंडांनी मानदंडसापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे.
गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओतील मानदंडसापेक्ष खराब कामगिरी करणाऱ्या या ७५ टक्के लार्जकॅप फंडांची जागा फोकस्ड इक्विटी फंड घेऊ शकतात. कारण बहुतांश फोकस्ड इक्विटी फंड हे लार्जकॅप केंद्रित फंड आहेत. फोकस्ड इक्विटी फंडांपैकी ९५ टक्के फंडांनी दोनतृतीयांश मालमत्ता लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. भांडवली बाजार नियामक सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फोकस्ड इक्विटी फंड हा एक फंड गट असून, या फंडांना ३० पेक्षा जास्त कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणुकीची मुभा नसते. निधी व्यवस्थापकाच्या इच्छेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समभागांना या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान दिले जाते. फोकस्ड इक्विटी फंडांच्या पोर्टफोलिओत समभागांचे ध्रुवीकरण झालेले असल्याने हे फंड ‘हाय रिक्स हाय रिटर्न’ प्रकारात मोडतात.
महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाला १९ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या फंडाची दखल घेणे उचित ठरते. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास हा फंड सातत्याने ‘टॉप’ किंवा ‘अपर मिडल क्वारटाइल’ मध्ये राहिला आहे. या फंडात १९ नोव्हेंबर २०२० मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,९०,३९६ (वार्षिक लाभ २४.०४ टक्के) झाले होते आणि १९ नोव्हेंबर २०२० रोजी पाच हजार रुपयांची ‘एसआयपी’ सुरू केलेल्या १,०८,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २,३६,७३४ झाले (वार्षिक लाभ १८.६६ टक्के) आहेत. मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षांनंतर ‘स्टार रेटिंग’ बहाल करते. फंडाच्या चमकदार कामगिरीमुळे या फंडाला चार तारांकित (‘फोर स्टार’) किंवा पंचतारांकित (‘फाइव्ह स्टार रेटिंग’) मिळण्याची शक्यता आहे. या फंडाला जर ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळाले तर पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणाऱ्या १५ टक्के फंडात या फंडाची गणना होईल. पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणे म्हणजे पदार्पण केलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकवण्यासारखे आहे.
हेही वाचा… माझा पोर्टफोलिओ : कृषीरसायनांतील पुढारलेपण
या फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ८७९.०५ कोटी रुपये आहे. रेग्युलर प्लानचा व्यवस्थापकीय खर्च २.२ टक्के असून फंडाचा मानदंड (बेंचमार्क ) ‘निफ्टी ५०० टीआरआय’ आहे. या फंडाचे कृष्णा संघवी हे मुख्य निधी व्यवस्थापक तर फातिमा पाचा या सहनिधी व्यवस्थापिका आहेत. काही गुंतवणूकदारांचा (यूट्यूब पाहून गुंतवणूक करणाऱ्या) असा गैरसमज आहे की, फोकस्ड फंड हे थीमॅटिक किंवा सेक्टर फंड्सइतकेच धोकादायक असतात. परंतु महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाने १३ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्याने, जोखीम कमी केली आहे. तथापि, अधिक वैविध्यपूर्ण फंडांच्या तुलनेत फोकस्ड फंडांमध्ये कंपन्यांच्या ध्रुवीकरणाचा धोका किंचित जास्त असतो. महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ३० कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या ५ उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक ४५ टक्के आहे. आघाडीच्या ५ कंपन्यांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्के आहे. या फंडाची शिफारस करण्यामागे फंडाच्या कामगिरीतील सातत्य हे कारण आहे. ‘पॉइंट टू पॉइंट’ किंवा ‘ट्रेलिंग रिटर्न’ अनकेदा दिशाभूल करणारे असू शकतात, विशेषतः सध्याची बाजार परिस्थिती फंड व्यवस्थापकाला अनुकूल आहे.
विश्लेषकांनी बाजारातील घसरणीच्या तिमाहीतील कामगिरीचा अभ्यास केला असता फंडाचा ‘डाऊनसाइड कॅप्चर रेशो’ भांडवलाची सुरक्षितता जोपासल्याची ग्वाही देतो. फंड घराण्याच्या गुंतवणूक परिघात ३५० कंपन्या असून यापैकी ३० कंपन्यांची निवड या फंडाच्या गुंतवणुकीसाठी होते. निधी व्यवस्थापक ‘टॉप डाऊन ॲप्रोच’ गुंतवणूक परिघातील कंपन्या निश्चित करण्यासाठी तर ‘बॉटम अप ॲप्रोच’ या कंपन्यांना चाळणी लावण्यासाठी वापरला जातो. कंपन्यांची शाश्वत कमाईतील वाढीची क्षमता, विश्वासार्ह व्यवस्थापन आणि चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धती असलेल्या कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान दिले जाते. समभागाची निवड हे टॉप-डाउन जोखीमसंबंधित निकष, कंपन्यांची रोकड सुलभता आणि अंतर्गत अस्थिरता विचारात घेऊन कंपन्यांची निवड केली जाते. फंड घराण्याचा संशोधन चमू मूलत: त्यांच्या सर्वोत्तम कल्पनांचे संयोजन फोकस्ड इक्विटी फंडासाठी करीत असतो.
निधी व्यवस्थापक गुंतवणुकीच्या मूळ शैलीमुळे ‘निफ्टी ५०० टीआरआय इंडेक्स’शी पूर्णत: भिन्नता राखलेला पोर्टफोलिओ तयार केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, इन्फोसिस आणि ग्रासिम या पाच आघाडीच्या कंपन्या आहेत. वित्तपुरवठा आणि आर्थिक सेवा, इंधन, तंत्रज्ञान, विवेकाधीन वस्तू (कन्झ्युमर गुड्स) जिन्नस, ही आघाडीची गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. उच्च दर्जाचा ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ असलेल्या कंपन्यांचा समावेश असल्याने समस्याग्रस्त कंपन्या गुंतवणुकीत दिसत नाहीत. फंडाची मालमत्ता मर्यादित असल्याने बाजारातील चढ-उतार निधी व्यवस्थापक व्यवस्थित व्यवस्थापित करीत आलेले दिसत आहेत. याचे प्रतिबिंब फंडाचा तीन वर्षांचा ‘अपसाइड कॅप्चर रेशो’ ८८.४५ आणि तीन वर्षांचा ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो’ १०८.९२ असून हे दोन्ही आकडे फंड गटाच्या सरासरीशी तुलना करता उजवे वाटतात. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे संभाव्य अस्थिरतेचा विचार करून पोर्टफोलिओतील लार्जकॅप फंडांची जागा घेण्यास हा एक सक्षम पर्याय दिसत आहे.