सर्वोच्च न्यायालयाच्या एका समितीने गुरुवारी संध्याकाळी दिलेल्या निर्णयामुळे गौतम अदाणी यांचे नशीब पालटले आहे. गौतम अदाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी अवघ्या ३ दिवसांत १.८ लाख कोटी रुपये कमावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने हिंडेनबर्गच्या आरोपांप्रकरणी गौतम अदाणी समूहाला दिलासा दिला आहे. यानंतर गौतम अदाणी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये १.८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने गौतम अदाणी समूहाला दिलासा दिला. अदाणी एंटरप्रायझेसच्या समभागांच्या बंद किंमतीनुसार तो आतापर्यंत ३८ टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याचे बाजारमूल्य ७६,००० कोटी रुपयांनी वाढले आहे. गौतम अदाणी यांच्या अदाणी पोर्टच्या शेअरने बाजारमूल्याच्या दृष्टीने ३ दिवसांत २५००० कोटी उभारले आहेत. अदाणी विल्मर, अंबुजा सिमेंट, अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी टोटल गॅस यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचाः २००० रुपयांच्या नोटा आजपासून बदलण्यास सुरुवात, जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
अदाणी पॉवरचा शेअर गुरुवारपासून ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडकला. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदाणी टोटल गॅसच्या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम झाला होता, आतापर्यंत त्याचे बाजारमूल्य केवळ २० टक्क्यांनी वाढले आहे. शेअर मार्केट तज्ज्ञ देवेन चोक्सी म्हणतात की, अदाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही अजूनही २० ते २५ टक्के नफा कमावू शकता. गौतम अदाणी समूहाच्या कंपन्यांची सेबीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येऊ शकते, असे चोक्सीने म्हटले आहे.