-अजय वाळिंबे
वेलस्पन लिव्हिंग लिमिटेड (बीएसई कोड ५१४१६२)
प्रवर्तक: वेलस्पन समूह
वेबसाइट: http://www.welspunindia.com
बाजारभाव: रु. १३८/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: होम टेक्सटाइल/ फ्लोअरिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९७.१८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७०.५०
परदेशी गुंतवणूकदार ७.१४
बँकस्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार ५.४४
इतर/ जनता १६.९२
पुस्तकी मूल्य: रु. ४६.५
दर्शनी मूल्य: रु.१/-
लाभांश: १०%
प्रति समभाग उत्पन्न: रु.७.०१
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.९
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.५८
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १६.१
बीटा : १.१
बाजार भांडवल: रु. १३,३४३ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७२ / ९१
वेलस्पन लिव्हिंग लिमिटेड ही वेलस्पन समूहाची एक महत्त्वाची कंपनी असून जगातील सर्वात मोठ्या कापड उत्पादकांपैकी एक आहे. कंपनी होम आणि टेक्निकल टेक्सटाइल उत्पादने आणि फ्लोअरिंग सोल्युशन्सचा विस्तृत पोर्टफोलियो प्रस्तुत करते. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये होम टेक्सटाइलमध्ये एक आघाडीची मॉडर्न कंपनी म्हणून यशस्वीरीत्या नाव स्थापित केले आहे. नवोन्मेष, ब्रँडिंग आणि शाश्वतता हे घटक तिच्या नेतृत्व-स्थितीला मजबूत करण्यासाठी उपकारक ठरले.
आणखी वाचा-बाजारातली माणसं : डेव्हिड सोलोमन- वाहक… समृद्धी अन् मंदीचेही!
कंपनी टॉवेल्स, बाथ कपड्यांपासून ते चादरी, टोब आणि मूलभूत आणि फॅशन बेडिंगपर्यंतच्या घरगुती कापड उत्पादनांची विस्तृत श्रेणी तयार करते. वेलस्पनने अलीकडेच कार्पेट्स फ्लोअरिंग सोल्युशन्सच्या व्यवसायातही प्रवेश केला आहे. कंपनीचा गेल्या काही वर्षांत विस्तारलेला वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलियो पुढीलप्रमाणे आहे :
- बेड लिनन – बेडशीट्स, कम्फर्टर्स, डोहर, पिलो कव्हर, गाद्या
- बाथ लिनन – टॉवेल, बाथ मॅट्स, बाथ रोब्स
- रग्ज – डोअरमॅट्स, योगा मॅट्स, बेडसाइडरनर, ग्रासमॅट्स.
- पडदे आणि अपहोल्स्ट्री – कुशन कव्हर, पडदे, पट्ट्या, वॉलपेपर.
- फ्लोअरिंग सोल्युशन्स- क्लिक आणि लॉक टाइल्स, कार्पेट टाइल्स, कार्पेट ग्रीन्स.
कंपनीकडे आपल्या संपूर्ण उत्पादन शृंखलेसाठी अंतर्गत पायाभूत सुविधा आहेत. कापूस खरेदी करण्यापासून ग्राहकांना अंतिम उत्पादने पाठविण्यापर्यंत कंपनीने एकात्मिक मूल्य साखळी तयार केली आहे. वेलस्पनचे गुजरातेत वापी आणि अंजार येथे टॉप-ऑफ-द-लाइन होम टेक्सटाइल उत्पादन प्रकल्प असून, तेलंगणामध्ये फ्लोअरिंग सुविधा आहे. या विविध उत्पादनांमध्ये फार्म-टू-फिनिश धाटणीची जगातील सर्वात मोठी पूर्णपणे इंटिग्रेटेड उत्पादन सुविधा तिच्याकडे आहे.
आणखी वाचा-‘इक्सिगो’ची बाजाराला धडक; ‘आयपीओ’ १० जूनपासून
कंपनीचे मजबूत वितरण नेटवर्क असून भारतभरातील ३८० शहरात, १२५ हून अधिक वितरक आणि १५,५०० हून अधिक विक्री दालने आहेत. ही खऱ्या अर्थाने ग्लोबल कंपनी असून, कंपनीचे वितरण जाळे ५० हून अधिक देशांमध्ये पसरलेले आहे. वेलस्पन आज होम टेक्सटाइल उत्पादनांची सर्वात मोठी निर्यातदार आहे. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून वॉलमार्ट स्टोअर्स, कॉस्टको, कोहल्स, बेड बाथ अँड बियॉन्ड, आयकिया, मेसीज इत्यादीसारख्या आघाडीच्या रिटेल चेनसाठी नियमित पुरवठादार आहे.
कंपनीची यूएसए आणि युरोपमध्ये मजबूत उपस्थिती असून कंपनीचा जवळजवळ ८४ टक्के महसूल अमेरिका आणि युरोपीय देशातील निर्यातीतून येतो. कंपनीच्या विक्रीत अमेरिकेचा वाटा सुमारे ६७ टक्के असून युरोपीय महासंघाचा १७ टक्के वाटा आहे.
कंपनी जगभरातील परवानाकृत आणि मालकीचा ब्रँड पोर्टफोलिओ मजबूत करत आहे. क्रिस्टी, वेललिव्हिंग होम, स्पेसेस, लिव्हिंग, वेलस्पन इत्यादीसारख्या अनेक लक्झरी आणि मोठ्या ब्रँडची मालकी अमेरिका, युरोप आणि भारतात तिच्याकडे आहे. मार्व्हल, द चॅम्पियन्स, स्कॉट लिव्हिंग, गुडफुल, अमेरिकन कॉटन इ.सारख्या अनेक परवानाधारक ब्रँड्सचीही मालकी आहे. कंपनीच्या ब्रँडेड उत्पादनांचा महसूल वाटा मागील पाच वर्षांत ११ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
आणखी वाचा-अदानी समूहाला पडझडीत ४.०७ लाख कोटींची झळ
मार्च २०२४ साठी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत १९.६ टक्क्यांनी वाढ होऊन ती ९,८२५ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल २४२.६ टक्के वाढ होऊन तो ६८१ कोटीवर गेला आहे. कंपनी कर्जमुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे, गेल्या तीन वर्षांत कंपनीने निव्वळ कर्ज ४८ टक्क्यांनी कमी केले आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या भांडवली खर्चाचे आणि विस्तारीकरणाचे अपेक्षित परिणाम आगामी कालावधीत दिसून येतील, तसेच कंपनी ५६ कोटी रुपये गुंतवणूक करून अंजार ऑपरेशन्ससाठी ४७ मेगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रकल्प सुरू करत आहे, यामुळे कंपनीचे अंजार युनिट येत्या दोन वर्षांत सुमारे ८० टक्क्यांनी आपला वीज खर्च कमी करेल. सध्या १३५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरू शकेल. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
stocksandwealth@gmail.com