Stock Market roundup : सोमवारी (३ फेब्रुवारी) शेअर बाजारातील सप्ताहारंभीच्या व्यवहारात, मोठ्या पडझडीतून प्रमुख निर्देशांकांनी सावरत चांगली कलाटणी दर्शविली. परिणामी घसरणीचे प्रमाण लक्षणीय कमी होऊन, बीएसई सेन्सेक्सला ७७ हजारांची पातळी राखता आली, तर एनएसई निफ्टी २३,३५० पुढे स्थिरावला.
प्रतिकूल जागतिक घडामोडीमुळे, जगभरातील भांडवली बाजारातील पडझडीचे अनुकरण भारतीय बाजारांनीही केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ७०० अंशांनी गडगडला आणि निफ्टी निर्देशांक २३,२५० अंशांखाली रोडावल्याचे दिसून आले. शेअर्स विक्रीच्या माऱ्यामुळे काही क्षणांच्या अवधीत तब्बल ५ लाख कोटी रुपयांनी त्यांच्या मत्तेत नुकसानीचा घाव गुंतवणूकदारांवर बसला. दिवसअखेर मात्र या नुकसानीला आवर घालत निफ्टी निर्देशांक १२१.१० अंशांच्या (०.५२%) नुकसानीने २३,३६१.०५ पातळीवर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स ३१९.२२ अंशांच्या (०.४१%) तोट्यासह ७७,१८६.७४ वर स्थिरावला.
व्यापक बाजारावर शेअर्स विक्री आणि घसरणीचा मोठा ताण राहिला. याचे प्रतिबिंब म्हणून बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक तब्बल १.७७% तर बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८९% असे मोठ्या फरकाने गडगडले. उल्लेखनीय म्हणजे बाजाराचा कल अस्थिर आणि प्रचंड नकारात्मक असतानाही, निफ्टी आयटी Nifty IT निर्देशांकाने ०.६८% अशी उत्साही वाढ साधली.
शेअर बाजारात उत्तरार्धात निवडक आघाडीच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना, तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या पातळ्यांच्या वर डोके काढण्यासाठी बळ मिळू शकले. केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारच्या भांडवली खर्चात – Capex अपेक्षेप्रमाणे वाढ नसल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि या तरतुदीचे लाभार्थी ठरू शकणाऱ्या ऊर्जा, सार्वजनिक उपक्रम, भांडवली वस्तू, तेल आणि वायू निर्देशांकांतील शेअर्समध्ये सोमवारी विक्रीवाल्यांचा जोर राहिला. त्या उलट, ग्राहकोपयोगी वस्तू, आयटी निर्देशांकांतील शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याचे आढळून आले.
शेअर बाजारावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख चार घडामोडी –
१. प्रतिकूल जागतिक वारे
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर नव्याने कर लादण्याच्या निर्णयाची घोषणा करून, व्यापार युद्धाची शक्यता पटलावर आणली. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये या निर्णयाच्या परिणामी भीती निर्माण झाली.
२. जगभरात सर्वत्र पडझड
सोमवारच्या सर्वच उभरत्या अर्थव्यवस्थेतील शेअर बाजारांमध्ये कोलाहलाची स्थिती राहिली. आशियाई बाजारांमध्ये सोल (कोरिया), टोक्यो (जपान), हँगसेंग (हाँगकाँग) या प्रमुख बाजारांमध्ये मोठ्या पडझडीचे पडसाद उमटले. मध्यान्हानंतर खुले झालेल्या युरोपीय बाजारातही मोठ्या घसरगुंडीचा प्रत्यय दिला. शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारही घसरले. तेखील एस अँड पी ५०० या प्रमुख निर्देशांकात ४% घसरण झाली, जी मागील चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे.
३. डॉलरमागे ८७ पुढे ढासळलेला रुपया
जागतिक प्रतिकूलतेपायी रुपया सोमवारच्या सत्रात तब्बल ०.७% गडगडून प्रति डॉलर ८७.२८ वर ढासळला. रुपयातील तीव्र घसरण पाहता, भारतीय बाजारांकडे पाठ करून माघारी परतत असलेल्या परकीय गुंतवणूकदार पुन्हा लवकर परततील अशी आशा धूसर बनत चालली आहे.
४. भारताच्या उत्पादन क्षेत्राचा पीएमआय:
देशाच्या कारखानदारी क्षेत्रातील सक्रियतेचे मापन असलेल्या एचएसबीसी इंडिया उत्पादन पीएमआयची जानेवारीची आकडेवारी सोमवारी (३ फेब्रुवारी) जाहीर झाली. भारतीय कंपन्यांनी चांगले निर्यात कार्यादेश मिळविल्याने जानेवारी २०२५ मध्ये हा निर्देशांक ५७.७ गुणांवर, म्हणजेच सहा महिन्यांच्या उच्चांकावर नोंदवला गेला. या आकड्यांचे बाजारातही सकारात्मक प्रतिबिंब उमटले. ज्या कारणाने बाजाराला मोठी घसरण टाळणे शक्य झाले.