नवी दिल्ली : गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ वैविध्यासाठी सोने कालसुसंगत घटक ठरत आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याचे गुंतवणूक म्हणून महत्त्व वाढेल, असा अंदाज मुख्य आर्थिक सल्लागार व्ही.अनंत नागेश्वरन यांनी सोमवारी वर्तविला.

सोने आणि सोन्याच्या बाजारपेठेविषयी आयोजित परिषदेत नागेश्वरन बोलत होते. ते म्हणाले की, सोने हे केवळ उच्च मूल्य असलेले धातू असण्यासह, सांस्कृतिक व धार्मिक कारणासांठी आगामी काळातही सुसंगत राहणार नाही. शिवाय गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी तो एक महत्त्वाचा घटक बनेल. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतही सुधार होऊन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीप्रणीत व्यवस्था पुनःस्थापित होईल. मात्र तो दिवस कधी येईल मात्र, हे आताच कोणीही सांगू शकणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. आगामी काही वर्षांत सोने हा गुंतवणूक पर्याय बनणार आहे. त्यामुळे भारतात सोने केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांसाठी महत्त्वाचे न राहता उत्पादक गुंतवणूक ठरेल. यात धोरणात्मक आव्हाने आहेत. सोने बँकेत ठेव (सुवर्ण ठेव योजना) म्हणून ठेवून ग्राहकांना पैसे देण्यासाठी भूतकाळात काही योजना आल्या होत्या. या योजनांवर पुन्हा भर देण्याची आवश्यकता आहे, असेही नागेश्वरन यांनी नमूद केले.

शेअर बाजारापेक्षा सोने वरचढ सोन्याचा भाव गेल्या तीन महिन्यांत प्रति औंस २०० डॉलर म्हणजेच ८ टक्क्यांनी वाढून २,८६० डॉलरवर पोहोचला आहे. याच कालावधीत भारतीय शेअर बाजार निर्देशांक ८ टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत. सोन्याचे मूल्य २००२ मधील प्रति औंस २५० ते २९० डॉलरवरून आतापर्यंत दहा पटीने वाढले आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला सध्या ८५ हजार रुपयांवर आहे. तथापि भारत हा सोन्याच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असून, देशांतर्गत सोन्याची उत्पत्ती नगण्य आहे.