मुंबईः  सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडने सोमवारी डिसेंबरअखेर समाप्त तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा १७.४ टक्क्यांच्या घसरणीसह, ८,४९१.२२ कोटी रुपये नोंदवला गेल्याचे घोषित केले. कोळशाची कमी झालेली विक्री याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तथापि भागधारकांसाठी दिलासादायी बाब म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग ५.६० रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

कोळसा क्षेत्रातील महाकाय कंपनी असलेल्या कोल इंडियाने मागील वर्षीच्या याच ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत १०,२९१.७१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. यंदाच्या तिमाही दरम्यान कंपनीची विक्री गेल्या वर्षीच्या ३३,०११.११ कोटी रुपयांवरून, ३२,३५८.९८ कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. तर कंपनीचा एकूण खर्च देखील गेल्या वर्षीच्या २५,१३२.८७ कोटी रुपयांवरून, यंदा २६,२०१.५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नफ्यात घसरणीमागे हेच प्रमुख कारण आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीकडून कोळशाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ५३१.८९ दशलक्ष टनाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ५४३.३६ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. देशांतर्गत कोळशाच्या उत्पादनात कोल इंडियाचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे.चालू आर्थिक वर्षासाठी तिने उत्पादनाचे लक्ष्य ८३८ दशलक्ष टनांवरून कमी करून ८०६-८१० दशलक्ष टन निर्धारीत केले आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत कंपनीचे उत्पादन २.२ टक्क्यांनी वाढून ५४३ दशलक्ष टन झाले आहे. आर्थिक वर्षाच्या उर्वरित दिवसांमध्ये उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने, सुमारे ४-५ टक्के वाढ साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कंपनीचे अध्यक्ष पीएम प्रसाद यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दुसरा अंतरिम लाभांश

कोल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ५.६० रुपये या दुसऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली. या लाभांश प्राप्तीसाठी ३१ जानेवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ त्या तारखेला अथवा त्या आधीपासून खातेपुस्तकात शेअरधारक म्हणून नाव असलेले हा लाभांश मिळविण्यास पात्र ठरतील. कंपनीने या आधी पहिला अंतरिम लाभांश प्रति शेअर १५.७५ रुपये दराने नोव्हेंबर २०२४ मध्ये दिला आहे. आर्थिक वर्षातील तिसरा व अंतिम लाभांश कंपनीकडून चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर जाहीर होईल, जो ऑगस्टमध्ये देय असेल. सोमवारी बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर, तिमाही निकाल आले. तथापि बीएसईवर कोल इंडियाचा शेअर २.०४ टक्के घसरणीसह ३७५.४० रुपयांवर बंद झाला.

Story img Loader